माणूस..? 💔
कित्ती विचित्र गोष्ट आहे ना, प्रत्येक वर्षी 'जनावरं' माणसांना कमी आणि 'माणसं' जनावरांना जास्त खातात. नेमकं जनावर आहे तरी कोण.? कधी कधी हा विचार माझ्या मनाला सुन्नं करून जातो की आपण खरंच माणूस आहोत काय.? माणूस म्हणून घेण्याच्या लायक आहोत काय.? खरंच हा विषय जातीपातीच्या, चालीरीती, रूढी परंपरा यांच्या भिंती ओलांडून विचार करण्याजोगा आहे. ज्यांना आपण श्वापदं किंवा हिंस्त्र पशू वगैरे म्हणतो, ते तर फक्त स्वतःची भूक शमवण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी शिकार करतात. पण आपण, ज्यांना निसर्गातील सर्वात बुद्धिमान आणि संवेदनशील प्राणी मानलं जातं, त्यांनी मात्र केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि व्यापारासाठी करोडो निष्पाप मुक्या जीवांना अन्न बनवून ठेवलं आहे. दरवर्षी कोट्यवधी प्राण्यांची कत्तल केली जाते, केवळ माणसाची भूक भागवण्यासाठी. अशावेळी मनात विचार येतो की, निसर्गाने ज्यांना विचार करण्याची ताकद दिली नाही, ती मुकी जनावरं जास्त हिंस्त्र..? की ज्याला बुद्धी, भावना आणि विवेक दिला आहे तो माणूस जास्त क्रूर..? जंगलातले प्राणी कधीही गरजेपेक्षा जास्त शिकार करत नाहीत, की कुणाचा अमानुष छळ करत नाहीत. याउलट, माणूस हा स्वतःला सुसंस्कृत म्हणवतो, पण त्याच्याकडून होणारा प्राण्यांचा संहार हा कोणत्याही राक्षसी वृत्तीपेक्षा कमी नाही. आज माणसाने स्वार्थापोटी पृथ्वीवरील इतर जीवांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला आहे. दया, करुणा आणि संवेदनशीलता हे माणसाचे गुण जर लोप पावत असतील आणि तो केवळ वासनेपोटी, स्वतःच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी, आत्मिक समाधानासाठी व सुखासाठी इतर जीवांचा बळी घेत असेल, तर खऱ्या अर्थाने 'जनावर' कोण हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाचा समतोल बिघडवून स्वतःला श्रेष्ठ समजणारा माणूसच आज सर्वात मोठा हिंस्त्र प्राणी बनला आहे, यात मला तीळमात्र ही शंका नाहीये.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂