१४ मे,२०२१ ❤️
१४ मे २०२१. हा दिवस माझ्या आयुष्यातील एक सोनेरी पान बनून आला होता, ज्याने माझ्या आयुष्याच्या उजाड वाळवंटात सुखाची पहिली सर आणली होती. या दिवशी ती स्वतःहून माझ्या आयुष्यात आली होती, आणि बघता बघता तिच्यामुळे माझे संपूर्ण जगच बदलून गेले होते. त्यानंतरची ती दीड-दोन वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदी असा काळ होता. तेव्हा एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा आमचे बोलणे झाले नाही किंवा आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. याच वर्षीची २०२१ ची ती दिवाळी तर तिने माझ्यासाठी कायमची संस्मरणीय करून ठेवली. तेव्हा ती दिवाळीसाठी माहेरी आली होती, आणि आम्हा दोघांचं फोनवर बोलणं सुरु असतानाच अचानक तिचे वडील तिच्यासमोर आल्यावर जवळपास अर्धा पाऊण तास तिने माझ्याशी 'अहो' म्हणून बोलणं सुरूच ठेवलं होतं. त्यावेळी तिने मला 'अहो' म्हणून मारलेली ती हाक माझ्या काळजात कायमची कोरली गेली आहे. तिची ती जवळीक, ते कौतुक आणि तिचे माझ्याशी प्रेमळ, खट्याळ वागणे मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले होते. पण मला हे हवंहवंसं वाटणारं सुख इतक्या लवकर संपेल, असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कालांतराने काळाच्या ओघात सगळच बदललं, आणि तिच्या ज्या प्रेमाने मला जगवले, त्याच प्रेमाने मला अचानक एकाएकी परके करून टाकलं. तिने जाणूनबुजून, मुद्दामहून मला स्वतःपासून दूर केलं आणि नंतर तिने तशी कबुलीही दिली.
आज ती तिच्या नव्या जगात, नव्या माणसांमध्ये अगदी सुखाने आणि आनंदाने हरवून गेली आहे, आणि या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे. कारण ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली होती, तेव्हा ती खूप एकाकी पडल्याचं आणि उदास असल्याचं मला जाणवलं होतं. पण आता ती माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिला कदाचित तिने मागे सोडलेल्या वादळाची तिला पुसटशी जाणीवही नसावीच बहुतेक. पण मी? मी मात्र ती माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी जितका एकटा आणि उद्ध्वस्त होतो, आज त्याच्या कैकपटीने अधिक उद्ध्वस्त झालो आहे. मन अगदी छिन्नविच्छिन्न झाले आहे. ती माझ्या आयुष्यात आली तेव्हाची वेळ आणि आत्ताची वेळ यात तसा काहीच बदल झालेला नाहीये, पण का कुणास ठाऊक, आता मात्र सतत तिच्या बोलण्यात असुरक्षितता वाटत असल्याची जाणीव होत होती. आणि कधीकधी तर ती स्वतः तसं बोलूनही दाखवायची. असं अचानक नेमकं काय झालं होतं, ते मात्र ती काहीच सांगत नव्हती. का कुणास ठाऊक, पण आता तिला मी अगदी नको नकोसा झालो आहे, माझी सावलीही कदाचित तिला नको असेल, हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. पण तरीही माझं हे वेडं मन मात्र अजूनही तिच्याच प्रेमात आकंठ बुडालेले आहे. ज्या व्यक्तीने मला जगण्याची नवी उमेद दिली, तिनेच आज मला अशा वळणावर आणून सोडलं आहे, जिथे फक्त अंधार आहे. आता पुढे काय होईल, काय होणार, कसं व्हायचं माझं, या प्रश्नांची नेमकी आणि समाधानकारक अशी उत्तरं ही माझ्याकडे नाहीयेत. माझ्या अंतरात आत केवळ तिच्या आठवणींची जळती जखम आणि डोळ्यांत न सुकणारे अश्रू घेऊन मी रोज स्वतःशीच लढतो आहे. मला माझं हे आयुष्य आता फक्त एक ओझं वाटू लागलं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂