शर्यत... ❤️‍🩹

रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आयुष्याची एक न संपणारी शर्यत सुरू असते. ऑफिसचे टार्गेट्स, कामाचा अवाढव्य लोड, वेळेत पोहोचण्याची घाई आणि त्याअनुषंगाने होणारी प्रचंड चिडचिड. आणि हे सगळं काही बाकी सर्वांच्या प्रमाणे माझ्याही पाचवीला पुजलेलं आहे. मी काही मोकळा किंवा सर्व सुखांनी न्हाऊन निघालेला 'वेल सेटल्ड' वगैरे माणूस नाहीये. तर याच व्यवस्थेत रोज चहूबाजूंनी भरडला जाणारा एक अतिशय सामान्य नोकरदार आहे. रोजच्या प्रवासातील तो जीवघेणा गोंगाट, लोकांची ती निरर्थक, विनाकारण चाललेली बडबड ऐकून माझेही डोके भणभणून जाते. त्यात भर म्हणून कधीकधी कोणतीही चूक नसताना, केवळ समोरच्याच्या अहंकारापोटी होणारा अपमान काळजाला आतपर्यंत खोलवर जखम करून जातो, ते वेगळंच. या सगळ्याचा एक सुप्त राग, एक अस्वस्थता माझ्याही मनात धुमसत असते. पण, जेव्हा मी लिहायला बसतो, तेव्हा हे संपूर्ण जग मागे सुटते. हे लेखन म्हणजे माझ्यासाठी कोणती हौस किंवा टाईमपास नाही, तर तो माझ्या मनाचा श्वास आहे. दिवसभराच्या कोलाहलात हरवलेला 'मी' मला या कोरड्या कागदावर किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर पुन्हा सापडतो. जगाने मला कितीही नाकारले, अपमानित केले, तरी माझे शब्द मला कधीच झिडकारत नाहीत. उलट, ते मला अत्यंत प्रेमाने जवळ घेतात, मला कुरवळतात, माझ्यावर जीवापाड प्रेम करतात, आणि मी जसा आहे, अगदी तसाच ते माझा स्वीकार करतात. लेखनाच्या या काही क्षणांमध्ये मला ती शांतता आणि आनंद मिळतो, जो मला संपूर्ण जगात कुठेच शोधून सापडत नाही. म्हणूनच, कितीही थकलो, कितीही उद्विग्न झालो, तरी मी लिहीत राहतो. कारण हीच ती एकमेव जागा आहे जिथे मी खऱ्या अर्थाने जगत असतो, आणि मुक्तपणे श्वास घेऊ शकतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट