नियती निमित्त... ❤️
आयुष्याच्या वाटेवर काही नाती अशी अचानक भेटतात, की ज्यांचा प्रवास तर खूप छोटा असतो, पण मनावर उमटलेला त्यांचा ठसा मात्र कधीच न मिटणारा असतो. आपल्या दोघांमधील तो प्रवास ही इतका घाईघाईत संपला की, आपल्याला नीट सावरताही आलं नाही. नियतीने किंवा परिस्थितीने खेळलेला तो खेळ इतका अजब होता की, आपण एकत्र चाललो खरं, पण तो रस्ता कधी संपला हे कळलंच नाही. आज मागे वळून पाहताना सगळ्यात जास्त काय सलत असेल, तर ते म्हणजे आपल्याकडे आपली हक्काची अशी एकही आठवण आपण डिजिटल पडद्यावर जतन केलेली नाही. सगळे म्हणतात आजकालच्या जगात फोटोशिवाय आठवणींना काय अर्थ.? पण त्यांना काय माहीत, कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये जे कैद होऊ शकलं नाही, ते माझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमचं कोरलं गेलंय. आपण दोघं एकदाच भेटलो, एकत्र फिरलो, एकत्र हसलो, एकत्र बोललो, तो प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यांसमोर अगदी आजही जसाच्या तसा जिवंत आहे. कधी कधी वाटतं, आपल्या त्या भेटीचा आपण एखादा फोटो घेतला असता तर निदान जगाला दाखवायला किंवा स्वतःचं मन रमवायला तरी तो कामी आला असता. पण आता तर फक्त आणि फक्त तुझा चेहरा, तुझा आवाज माझ्या शांत रात्रींचा सोबती बनून राहिला आहे. आपला हा प्रवास अधुरा राहिला, आपलं नातं अपूर्ण राहिलं आणि आता त्या अपूर्णतेमध्येच मी आपल्या दोघांचा शोध घेत असतो. आपल्या दोघांचा एकत्र असा एक फोटोही नसणं, ही कदाचित त्या विधात्याचीच एक युक्ती असेल, जेणेकरून मी तुला कधीच विसरू शकणार नाही आणि तुझी उणीव नेहमीच जाणवत राहील. शेवटी एक गोष्ट मात्र खरी की, हे #आयुष्य_वगैरे असंच असतं. इथं नेहमीच आपल्या मनासारखं घडत नाही, इथं सगळंच पूर्ण मिळत नाही. बहुतेक काही गोष्टी अशा अधुऱ्या राहण्यातच त्यांचं खरं सौंदर्य दडलेलं असतं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂