तू माझा सांगाती...
एरव्ही तसा कुणीशीही फारसा न बोलणारा असा मी, पण मनात मात्र खूप सा-या शब्दांचा पसारा घेऊन फिरत राहतो. या मनातल्या पसा-याचं रूपांतर हळूहळू जेव्हा अडगळीत होऊ लागतं, तेव्हा मग नाईलाजाने मनातलं सगळं काही कागदावर रितं करावं लागतं. खरंच.. आपल्या मनातलं जेव्हा कोणाशीही बोलता येत नाही, तेव्हा माणूस स्वतःमध्येच एक जग शोधू लागतो. मनातले शब्द कागदावर उमटू लागतात, आणि त्यातूनच एक नवा 'स्वसंवाद' सुरू होतो. अगदी सुरुवातीच्या काळात जो केवळ माझ्या मनाचा एकांत होता, तो हळूहळू लेखणीच्या रुपाने माझा सोबती बनला आहे. आज माझं हे लिखाण केवळ माझा छंद उरलेला नाही, तर ती माझ्या अस्तित्वाची एक गरज झाली आहे. वाढत्या वयानुसार ही सवय आता माझ्या भावनांना वाट करून देणारा एक सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग बनली आहे. बाहेरच्या जगाने मला दिलेली शांतता, नाकारलेपण, कमीपणाची भावना आता या शब्दांच्या गराड्यात पार हरवून गेली आहे. माझ्या या शब्दांच्या जगात मी स्वतःशीच मांडलेल्या या संवादाने मला केवळ सावरलेच नाही, तर माझ्या भरकटलेल्या, वेड्या मनाला शब्दांची एक अनमोल साथ मिळवून दिली आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂