घरटं... ❤️
आपल्या लेकरांचं आयुष्य सुखात जावं म्हणून स्वतःचं संपूर्ण आयुष्य हसतमुखानं झिजवणारे आई-वडील, एका ठराविक वयानंतर फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या प्रेमासाठी, त्यांच्या सहवासात राहण्यासाठी आसुसलेले असतात. त्या वयात त्यांना ना पैशाची हाव असते, ना कोणत्या भौतिक सुखाची, त्यांना हवी असते ती फक्त आपल्या मुलांची आश्वासक सोबत. आपल्या लेकरांनी त्यांच्या दिवसभराच्या धावपळीतून त्यांच्यासाठी काढलेला काही वेळ, त्यांच्या खांद्यावर ठेवलेला विश्वासाचा हात, आणि "मी आहे ना" हा एक शब्दही त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठं सुख ठरतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईवडिलांसाठी आपण त्यांची तीच लहान लेकरं असतो. म्हणूनच आपल्याशी रोज गप्पागोष्टी करणं, आपल्यासोबत वेळ घालवणं, आपल्याला प्रेमानं खाऊ घालणं, काय हवं नको ते विचारणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं आणि त्यांच्या दिवसभराच्या गोष्टी सांगणं, आपल्या दिवसभराच्या गोष्टी ऐकणं, यातच त्यांचा जीव रमत असतो. आपल्या पोटापाण्याच्या व्यापातून हे सगळं दररोज करणं आपल्याला शक्य होईल अथवा न होईल, पण जेव्हा कधी असा योग घडून येतो, आणि जेव्हा त्यांच्या सुरकुतलेल्या हातांना आपल्या संवादाची ऊब मिळते, तेव्हा त्यांचं मन तारुण्यासारखं ताजेतवाने होते, रसरसून उठतं. उतारवयात जेव्हा त्यांचं शरीर थकू लागतं, तेव्हा इतर कोणत्याही औषधांपेक्षा आपल्या लेकरांचे दोन गोड शब्द त्यांच्यासाठी संजीवनीसारखे काम करतात. त्यांच्या आयुष्याच्या या संध्याकाळी, आपल्या धावपळीच्या वेळापत्रकातील, आपण त्यांना दिलेला हा वेळ हेच त्यांच्या थकलेल्या शरीराच्या इंजिनाला धावतं करणारं सर्वात मोठं आणि पवित्र इंधन असतं. म्हणूनच, आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगात आपण कितीही व्यस्त असलो तरी आपल्या या हक्काच्या माणसांना कधीही एकटं पाडू नये, कारण त्यांच्या समाधानातच आपल्या आयुष्याचं खरं सार्थक असतं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂