करार... ❤️‍🩹

डोळे मिटले की आजही सगळ्यात आधी समोर येतो तो फक्त आणि फक्त तुझाच चेहरा. अगदी लख्ख, हसरा आणि जसा मनात कोरला गेलाय अगदी तसाच. त्या प्रत्येक क्षणी मला असं वाटतं की धावत यावं, तुला घट्ट मिठी मारावी आणि मनामध्ये साठलेलं सगळं काही एका दमात सांगून टाकावं. पण जसे डोळे उघडतात, तसं वास्तवाचं चटके देणारं ऊन अंगावर पडतं. हात नकळत फोनकडे जातो, स्क्रीनवर तुझं नाव टाईप होतं, पण तिथून पुढे बोटं थांबतात. एक मेसेज करून किंवा कॉल करून मन हलकं करावं असं तीव्रतेने वाटतं, पण नेमका त्याच वेळी आपल्या दोघांमधील तो 'अबोल्याचा करार' आडवा येतो. तो अबोला, जो आपण दोघांनी कदाचित परिस्थितीमुळे किंवा एकमेकांच्या स्वाभिमानासाठी स्वीकारला आहे. तो करार जो मला रोज आठवण करून देतो की, आता माझा तुझ्यावर तो जुना हक्क उरलेला नाही. मनात शब्दांचा पूर आलेला असतो, प्रत्येक आठवण डोळ्यांतून वाहून जाण्यासाठी धडपडत असते, पण ओठांवर मात्र एक सक्तीचं मौन बाळगावं लागतं. किती विचित्र आहे ना हे.? ज्या व्यक्तीला आपण स्वतःपेक्षा जास्त ओळखतो, जिच्याशी आपण तासनतास बोलल्याशिवाय कधी दिवस मावळत नव्हता, आज त्याच व्यक्तीला एक साधा Hi असा मेसेज पाठवण्यासाठी हजार वेळा विचार करावा लागतो आहे. हा अबोला फक्त शांतता नाही, तर ती एक अशी शिक्षा आहे जी मी रोज स्वतःलाच देतोय. समोर फोन असतो, तुझं ऑनलाईन असणं दिसत असतं, पण आपल्यातील अंतराची भिंत एवढी मोठी झालीये की, ती ओलांडण्याची हिंमतच होत नाहीये. हृदय सांगतं की मी तुझ्यावर हक्क गाजवावा, पण मन ठामपणे बजावतं की नियमांचे उल्लंघन करू नये. हा कोंडमारा, ही घुसमट आणि या आठवणींमधील जगणं म्हणजेच कदाचित #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 असतं. डोळे मिटून तुला पाहणं जितकं सुखावह आहे, तितकंच डोळे उघडून तुझ्याशी बोलता न येणं हे मरणयातना देणारं आहे. पण तरीही, या अबोल्याच्या करारातही तुझं माझ्या मनात असणं, हेच माझ्या जगण्याचं एकमेव कारण बनलं आहे.!🎭

लोकप्रिय पोस्ट