बे'रंग' अंतरीचे... ❤️🩹
इथं तिथं मी व्यक्त होतो, ते फक्त माझ्या मनाचं ओझं हलकं करण्यासाठी. माझ्या लेखणीला कधीच कोणत्याही टाळ्यांची किंवा प्रसिद्धीची हाव नव्हती आणि कधी असणारही नाही. माझं लिहिणं म्हणजे जगाला दाखवण्यासाठी सजवलेली कोणती कलाकृती नव्हे, तर ती माझ्या अंतरंगाची आर्त हाक आहे. बालपण कसं असतं..? सवंगड्यांनी वेढलेलं, हसणारं, खेळणारं... पण माझ्या वाट्याला आलं ते फक्त एकटेपण आणि उपेक्षित नजरा. त्यानंतर शाळा अन् कॉलेजात ही हेच वाट्याला आलं. कुणी साधी विचारपूस ही करत नसायचं, त्यामुळे समजून सांभाळून घेणं वगैरे तर फारच दूरची गोष्ट. तो काळ सुखाचा नव्हता, पण बहुतेक तोच माझा पाया ठरला. तेव्हा मनात साचणाऱ्या प्रश्नांना वाट नव्हती, म्हणून मी एका कोपऱ्यात बसून असं का..? या एकाच विचारात स्वतःला हरवून बसायचो. काळ बदलला, वय वाढलं, पण अवतीभवतीची परिस्थिती आणि लोकांची वागणूक आजही फारशी बदलली नाही. आजही तीच रीत, तोच एकांत कायम आहे. पण आता एक मोठा फरक पडलाय. आता मी त्या एकांतात रडत किंवा विचार करत बसत नाही, तर त्या शांततेला शब्दांचं रूप देतो. माझं दुःख, माझा आनंद, माझी उपेक्षा आणि माझं जगणं... हे सगळं तेव्हा कागदावर उतरतं. हे सगळं लिहिल्यावर मनावरचा एक प्रचंड भार हलका होतो. माझ्यासाठी हे लिहिणं कोणती मोठी प्रेरणा किंवा छंद नाही, तर ती माझ्या जगण्याची आणि श्वास घेण्याची गरज आहे. शब्दांच्या या विश्वात मी स्वतःला शोधतो, तिथे मला कोणाच्या मान्यतेची गरज नसते, कुणी मला स्वीकारण्याची गरज नसते अथवा सगळ्यांनी मला नाकारलं, झिडकारलं आहे, याची जाणीवही नसते. हे माझे शब्द आहेत, हे माझे मित्र आहेत, हे माझे विश्व आहेत, हे माझं मन आहेत. आणि म्हणूनच हेच माझं संपूर्ण अस्तित्त्व आहेत.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂