मुक्ती.. ❤️‍🩹🫂

आज अगदी सहजच मोबाईलची 'कॉन्टॅक्ट लिस्ट' स्क्रोल करताना अचानक एका नावावर माझे बोट रेंगाळले. काही क्षण विचार केला आणि एक दीर्घ श्वास घेऊन मी ते नाव, तो नंबर मोबाईलमधून 'डिलीट' करून टाकला. स्क्रीनवर 'कॉन्टॅक्ट डिलीटेड' असा मेसेज आला आणि स्क्रीन एकदम कोरी झाली. पण खरंच..? त्या एका क्लिकने माझ्या मनातील त्या व्यक्तीच्या आठवणीही डिलीट झाल्या का..? या प्रश्नाने मला अंतर्मुख केले आणि मला जाणीव झाली की, मॅच्युरिटी किंवा परिपक्वता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे कटू सत्ये स्वीकारणे होय. आपण मोबाईल स्क्रीनवरून एखादा नंबर सहज पुसून टाकू शकतो, पण हृदयाच्या पाटीवर कोरलेली माणसं आणि त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण इतक्या सहज आपण कसे विसरणार..? आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला असं वाटतं की, एखाद्या व्यक्तीशी संबंध तोडायचे असतील, त्यांच्यावर राग व्यक्त करायचा असेल, तर त्यांचा नंबर ब्लॉक किंवा डिलीट करणे हाच सर्वात सोपा मार्ग आहे. आपण स्वतःशीच एक खोटा आव आणतो की, आता तो नंबर माझ्या फोनमध्ये नाही, म्हणजेच ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून वजा झाली आहे. पण हा निव्वळ एक भास असतो. रात्रीच्या शांततेत जेव्हा जुन्या आठवणींची वादळं मनात उठतात, तेव्हा तो नंबर मनात जसाच्या तसा जिवंत असतो. त्याचे डिजिट्स आपल्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे फिरू लागतात. मग लक्षात येते की, मोबाईलची मेमरी रिकामी करणे सोपे आहे, पण मनाची मेमरी कशी फॉरमॅट करणार..? खरं सांगायचे तर, माणसांना विसरणे एवढं सोप्पं नसतं. ज्यांच्यासोबत आपण आपल्या सुख-दुःखाचे क्षण वाटले, ज्यांच्या हसण्यात आपले जग होते, ती माणसं फक्त एक तांत्रिक प्रक्रिया करून मनातून कशी कायमची डिलीट होऊ शकतात..? नंबर डिलीट करणे हा केवळ एक तात्पुरता राग किंवा पलायनवाद असू शकतो, पण ते काही कायमस्वरूपी उत्तर नाही. उलट, नंबर डिलीट केल्यानंतरही जेव्हा त्या व्यक्तीची आठवण आल्यावर मन व्याकुळ होते, तेव्हा आपल्या स्वतःच्या हतबलतेची जाणीव अधिक तीव्रतेने होते. खरंतर खरी परिपक्वता तेव्हाच येते, जेव्हा आपल्याला हे समजते की माणसांना विसरण्यासाठी नंबर डिलीट करण्याची गरज नसते. खरी मॅच्युरिटी यात आहे की, तो नंबर समोर असूनही, त्या व्यक्तीचे नाव स्क्रीनवर चमकत असूनही, आपल्या मनात कोणतीही अस्वस्थता निर्माण होऊ नये. त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने आपल्या मनाचा ताबा सुटू नये. भूतकाळात जे काही घडले, ते आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकारून शांतपणे पुढे जाता येणे, यातच खरे शहाणपण आहे. #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 हे शेवटी अशाच अनेक चांगल्या-वाईट अनुभवांची गोळाबेरीज आहे. इथे प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही माणसं कायमची सोबत राहतात, तर काही जण फक्त काही अंतरापुरतेच सहप्रवासी असतात. जे सोडून गेले, त्यांच्या आठवणींना मनात ठेवून, पण त्यांच्या नंबरचा, त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा अट्टाहास न धरता जगणे शिकले पाहिजे. म्हणूनच, आता मी नंबर डिलीट करण्याच्या फंदात पडत नाही. कारण मला कळून चुकले आहे की, नाती आणि माणसं मोबाईलच्या गॅलरीत किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसतात, ती मनात असतात. आणि मनातून त्यांना मुक्त करणे, हेच खऱ्या परिपक्वतेचे लक्षण आहे.!🎭

लोकप्रिय पोस्ट