वेड्या मना.. ❤️‍🩹🫂

मी माणूस आहे. मी या पृथ्वीतलावरचा सर्वात विकसित आणि बुध्दीमान प्राणी आहे. पण तरीही कधी कधी मला माझ्या विचार करण्याच्या पध्दतीचं फार नवल वाटतं. खरंच, माणसाचं मन किती विचित्र असतं ना.! एक माणूस म्हणून मला नेहमीच असं वाटत असतं की या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त माझ्याच मनासारखा असावा. माझ्या सुखाच्या कल्पनांनुसारच निसर्गाने आणि आयुष्याने कुस बदलावी, अशी एक सुप्त इच्छा माझ्या मनात नेहमीच डोकावत असते. पण वास्तवाचं भान आलं की समजतं, निसर्गाचा आणि जीवनाचा नियम माझ्या इच्छेभोवती फिरत नाही. आज मी कडक उन्हाळ्याने होरपळून निघत असताना, चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. मनात सारखा एकच विचार चालला आहे की, कधी एकदा तो आभाळातून मुसळधार बरसतो आणि या धरणीला शांत करतो. पण मला माझीच खात्री आहे की, एकदा का तो धो-धो बरसू लागला, चिखल झाला, आणि रोजच्या जगण्यात व्यत्यय यायला लागला की काहीच दिवसांत माझ्याच तोंडून निघणार, "बस्स रे बाबा..! खूप झाला आता हा पाऊस, कधी थांबणार कोण जाणे..!?" माझा हा लहरी स्वभाव फक्त पावसापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक ऋतूच्या बाबतीत मी आजवर फक्त असाच वागत आलो आहे. थंडी आली की मला उन्हाची ऊब हवी असते आणि उन्हाळा आला की पुन्हा थंडीचे दिवस बरे होते असं वाटू लागतात. निसर्गाच्या या सुंदर चक्राचा आनंद घेण्याऐवजी, जे समोर आहे त्याला नाकारण्यात आणि जे नाही त्याची आस धरण्यातच माझा वेळ जातोय. हाच न्याय मी माझ्या वैयक्तिक आयुष्यालाही लावतो. दुःखाच्या काळात सुखाची तीव्र ओढ असणारा मी, सुख मिळालं की लगेच त्यातल्याही त्रुटी शोधू लागतो. एखादी गोष्ट मिळेपर्यंत जी घालमेल मनात असते, ती मिळाल्यानंतर काही दिवसांतच संपून जाते आणि मन पुन्हा नव्या अपूर्णतेच्या मागे धावू लागतं. कधीकधी मला स्वतःचीच गंमत वाटते आणि रागही येतो की, मला नक्की हवं तरी काय..? कोणत्याही परिस्थितीत समाधानी न राहणं आणि सतत 'अति'चा कंटाळा करणं हा माझा जणू स्वभावच बनला आहे. पण आता मला जाणीव होत आहे की, निसर्गाचा समतोल जसा प्रत्येक ऋतूच्या येण्या-जाण्यावर टिकून आहे, तसाच माझ्या #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 चा समतोलही सुख-दुःखाच्या आणि चढ-उतारांच्या चक्रावरच तर अवलंबून आहे.!🎭

लोकप्रिय पोस्ट