जूनचे दोन पाऊस... ❤️‍🩹🫂

जून महिना उजाडला की ब-यापैकी सर्वांच्या मनात एक अनामिक आनंद आणि उत्साह दाटून येतो. मातीचा तो पहिला सुवास, तो गारवा, रखरखत्या उन्हाळ्यानंतर मिळणारा तो दिलासा. प्रत्येका साठीच जूनचा पाऊस काहीतरी सुखनैव घेऊन येतो. माझ्याही आयुष्यात जूनचे दोन पाऊस आले. पण माझं नशीब असं की, यातल्या एकाही पावसात मला आनंदाने, मनसोक्त भिजता आलं नाही, रमता आलं नाही. नियतीने माझ्या आयुष्याचा असा काही खेळ मांडला की, त्या पावसाच्या सरी फक्त माझ्या डोळ्यांतील अश्रू बनून राहिल्या आहेत. यातला जो पहिला पाऊस आला, तो माझ्या आवडीचा, अगदी मला हवाहवासा असा होता. तेव्हा माझ्या वेड्या मनात कुठेतरी एक आशेचा किरण होता की, कदाचित हा माझा आवडता पाऊसच बहुतेक माझ्या जखमांवर फुंकर घालेल. माझं वेड कदाचित हा पाऊसच सांभाळेल, माझ्या मनाला पुन्हा उभारी द्यायला मला मदत करेल. मी आस लावून त्या आभाळाकडे पाहत राहिलो. पण हा पहिला पाऊस मात्र कमालीचा निष्ठुर निघाला. अक्षरशः दगड होता तो. तो आला, सोबतीला आभाळात काळेकुट्ट ढगही घेऊन आला, पण एक थेंबही न पाडता, तो तसाच कोरडाठाक निघून गेला. तो फक्त एक भास ठरला. मनातली तृष्णा भागवायची तर दूरच, पण तो मला आणि माझ्या आयुष्याला आणखीन अधिकच कोरडं करून गेला. त्यानंतर कालांतराने आणि नाईलाजाने मला पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागली. तो माझ्या वाट्याला आला की मी स्वतः त्याला माझ्या वाट्याला आणला, हे मात्र मला आजही न उलगडलेले कोडे आहे.हा दुसरा पाऊस नुसता पाऊस नव्हता. ते एक असं वादळ होतं ज्याने माझं सगळं काही हिरावून घेतलं. त्या पावसाच्या रौद्ररूपाने माझं उर्वरित हसतं-खेळतं आयुष्यही उद्ध्वस्त करून टाकलं. मी माझ्या मनात सजवलेलं घरदारं, संसार, त्याजोडीने पाहिलेली माझी सारी स्वप्नं आणि माझी आपली माणसं, हे सगळं काही त्या वादळी पावसाच्या पाशवी प्रवाहाने वाहून नेलं. मी फक्त पाहत राहिलो, हताश होऊन, हतबल होऊन. तो पाऊस अंगावर झेलताना आनंद नव्हता, तर सुन्न करणारी एक वेदना होती. मी माझं सर्वस्व गमावल्याची ती जाणीव मला आजही आतून पोखरून काढते आहे. त्या पावसाने मला भिजवलं नाही, तर माझ्या अस्तित्वाच्या अक्षरशः चिंध्या चिंध्या केल्या. असे हे जूनचे दोन पाऊस माझ्या वाट्याला आले. एकाने माझं सर्वस्व ओरबाडून नेऊन मला उध्वस्त केलं, तर दुसऱ्याने मला आशेच्या उंबरठ्यावर आणून तसंच तहानलेलं सोडलं. आता आज मी इथे उभा आहे, पूर्णपणे रिता होऊन. मनात ना कोणती आशा आहे, ना स्वप्नं, ना पुन्हा कोणत्या नव्या पावसाची, पावसाळ्याची आस.! तशी या पावसाची आस सगळ्यांनाच असते, पण माझ्यासाठी मात्र पाऊस म्हणजे एक न संपणारं दुःख आणि एकाकीपण बनून बाकी राहिला आहे. आणि म्हणूनच प्रत्येकवर्षी या जून महिन्यात, ही न संपणारी घुसमट, तगमग, तळमळ, तडफड ना माझ्या मनात लपून राहते, ना माझ्या या किरकोळ शब्दांत सामावते..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट