"असणं" आणि "दिसणं" ❤️‍🩹🫂

अचानक आलेल्या त्या एका बातमीने आज माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रोज ज्याच्यासोबत उठणे-बसणे होते, ज्याच्या सोबत प्रत्येक सुख-दुःख शेअर केले, तो माझा मित्र आज या जगात नाही आणि त्याने स्वतःचे आयुष्य संपवले, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मन सुन्नं झाले आहे आणि डोक्यात विचारांचे काहूर माजले आहे. सतत एकच प्रश्न मनाला टोचतो आहे की, त्याच्या मनात अशी कोणती खदखद चालू होती जी तो आमच्यासारख्या जवळच्या मित्रांशीही व्यक्त करू शकला नाही. त्याचे कुटुंबीय आणि आम्ही त्याचा इतका मोठा मित्रपरिवार असूनही त्याची ती मानसिक अवस्था ओळखायला इतके कसे काय कमी पडलो.? हा प्रश्न आता आम्हाला आयुष्यभर छळत राहणार आहे. तो अंतरंगातून पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे हे आम्हाला माहीत असलं तरी त्यानं त्या सर्व गोष्टींतून स्वतःला सावरलं होतं हे आम्हाला तो सतत सांगत असायचा, आणि तसं दाखवायचा ही. पण आता वाटते आहे की, ते सगळं काही तो फक्त आम्हा सर्वांच्या मनाच्या समाधानासाठी वागायचा, बोलयचा. त्याच्या मनात मात्र वेगळीच चक्र ना जाणे कधीपासून फिरतच होती, आणि मग कुठे तो या भीषण निर्णयाप्रत पोहोचला असावा. पण आता आयुष्यभर सगळ्यात जास्त वेदना या गोष्टीची होत राहणार आहे की, आत्महत्या करायच्या अगदी आदल्या रात्री तो खूप उशिरापर्यंत आमच्यासोबतच होता. नेहमीपेक्षा जास्त वेळ तो आमच्यात रमला होता. खूप हसत होता, खूप गप्पा मारत होता आणि जुन्या आठवणींना उजाळा देत होता, अधेमध्ये सतत कुठेतरी हरवत होता, आणि आम्ही हाक मारल्यावर अचानक भानावर येत होता. पण आम्हांला काय माहीत की आमचं हे असं हाका मारून त्याला भानावर आणणं हे बहुतेक शेवटचचं असेल. ते त्याचे आमच्यासोबतचे शेवटचे हसणे असेल. कसं काय आणि का कुणास ठाऊक पण त्याच्या त्या हसण्यामागे लपलेलं त्याचं ते रडू आणि वेदना आम्हांला का दिसल्या नाहीत.? त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे 'आत्महत्या' नावाचा इतका भीषण आणि काळा विचार लपला असेल, याची पुसटशी भणकही आम्हांला कशी बरं लागली नाही.? आम्ही किती अंध होतो की त्याच्या डोळ्यांतील ते शांत वादळ आम्हांला ओळखता आले नाही, अन् रोखता ही आलं नाही. आज असे वाटते आहे की कदाचित तो त्या रात्री, त्या गप्पांमधून आम्हांला शेवटचा निरोप द्यायला, आमच्या सोबतच्या शेवटच्या आठवणी सोबत घेऊन जायलाच आला होता. पण आम्ही मात्र ते समजून घेण्यास पूर्णपणे अपयशी ठरलो. आता कित्तीतरी तास उलटले आहेत. बातमी कळली तशी आजूबाजूचे जमलेले शेजारीपाजारी तर अजूनही या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीयेत, खरंतर त्यांना विश्वासाच बसत नाहीये की याने असं पाऊल उचललंच कसं.? हा असं करेल असं कधी वाटलचं नाही. नेहमी कित्ती आनंदी आणि हसता खेळता दिसायचा. पण बहुतेक इथेच त्यानं आम्हां सर्वांना फसवलं होतं. "आनंदी असणं आणि आनंदी दिसणं" यात खरंच कित्ती मोठ्ठं अंतर असतं ना.! त्याच्या वयोवृद्ध आईबाबांचा तो आक्रोश तर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अक्षरशः इतका ह्रदयद्रावक असा आहे. आणि आम्ही मित्रपरिवार.? या विचारात अडकलो आहोत की, याला आणखी एकदा हाका मारून, पुन्हा एकदा काही क्षणांसाठी भानावर आणता येईल का.? आणि त्यानं हे असं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर आम्हाला मिळेल का.? मित्र म्हणून आमच्या वाट्याला आलेलं हे अपयश आणि हा पश्चात्ताप मात्र आता आमच्या मनाला आजन्म छळत राहणार आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट