मी आकाशात हरवलेला पाऊस बोलतोय... ❤️‍🩹🫂

आज कित्येक दिवसांनी मी स्वतःशीच बोलायला थांबलो आहे. आकाशाच्या अथांग पोकळीत तरंगत असताना खाली नजर टाकली, आणि मनात एक अनामिक वेदना दाटून आली. धरती माझी वाट पाहते आहे, अगदी एखाद्या आईने परदेशी गेलेल्या आपल्या लेकराची वाट पाहावी तशी. दूरवरच्या शेतांमध्ये काळीभोर माती निपचित पडली आहे. तिच्या अंगावर भेगांची जाळी पसरली आहे. त्या भेगा फक्त जमिनीवर नाहीत, तर माझ्या मनावरही उमटल्या आहेत. प्रत्येक भेग मला विचारते आहे, "अरे.... कधी येणार रे तू..?" पण माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. गेल्या वर्षी याच दिवसांत मी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गेल्यावर्षी या दिवसात मी किती आनंदात होतो.! ढगांच्या खांद्यावर बसून गावोगावी फिरत होतो. माझ्या प्रत्येक सरीवर मोर थुईथुई नाचत होते. लेकरं अंगणात भिजत होती. शेतकरी आकाशाकडे पाहून हसत होता. आणि मी.? मीही तेव्हा मनसोक्त बरसत होतो. पण यंदा... यंदा काहीतरी हरवलं आहे. मी रोज ढगांची सभा भरवतो. त्यांना सांगतो, "चला, निघूया. आता वेळ आली आहे, आपली माणसं आपली वाट वाट पाहत आहेत." पण ढग शांत राहतात. वारे काहीतरी कुजबुजतात आणि पुन्हा दिशा बदलून निघून जातात. मी त्यांच्यामागे धावतो. त्यांना समजावतो, प्रसंगी रागावतोही. पण माझं ऐकणार कोण.? खाली एका गावात एक म्हातारा शेतकरी रोज सकाळी घराबाहेर येतो. आकाशाकडे पाहतो. डोळ्यांवर हाताची सावली धरतो. क्षणभर माझा शोध घेतो. मग निराश होऊन परत घरात जातो. त्याच्या त्या नजरेपासून मी स्वतःला लपवू शकत नाही. एका शिवारात नुकतंच पेरलेलं बीज मातीखाली पडून आहे. त्याला वाटत असेल, "आज येईल... उद्या येईल..." पण दिवसामागून दिवस सरत आहेत. एका लहान मुलाने शाळेच्या वहीचं पान फाडून होडी बनवून ठेवली आहे. मागच्या वर्षी जिथे पाणी वाहत होतं, तिथेच तो उभा राहून माझी वाट पाहतो आहे. मला त्याच्याजवळ जायचं आहे. त्या होडीला पाण्याचा रस्ता द्यायचा आहे. पण माझेच पाय जड झाले आहेत. रात्री कधी कधी मी काळ्या ढगांच्या आड लपून रडतो. माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत. कारण ते जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. मध्येच कुठेतरी हरवून जातात. लोक म्हणतात, पाऊस दगा देतोय. पण खरं सांगू? दगा मी कुणाला दिलेला नाही. दगा तर माझ्या स्वप्नांनाच मिळाला आहे. मीही तितकाच अस्वस्थ आहे, जितकी ही तहानलेली धरती आहे, ही माणसं आहेत. आणि म्हणूनच आज मी आकाशाच्या काठावर उभा राहून स्वतःलाच एक वचन दिलं आहे, जेव्हा येईन, तेव्हा फक्त थेंब घेऊन येणार नाही. सोबत मातीचा सुगंध आणीन. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू आणीन. लेकरांच्या होड्यांसाठी वाहणारं पाणी आणीन. आणि या प्रतीक्षेने थकलेल्या पृथ्वीच्या कुशीत असा विसावेन की तिला पुन्हा माझी उणीव भासणार नाही. तोपर्यंत... मी आकाशात हरवलेला, स्वतःच्या असहाय्यतेशी झुंजणारा, आणि प्रत्येक तहानलेल्या नजरेचं ओझं छातीत घेऊन भटकणारा पाऊस बोलतोय....

प्लीज... माझी मनस्थिती, माझी झालेली अडचण, पर्यायाने माझी बाजू ही समजून घ्या, आणि मला दोष देऊ नका.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट