जोडवी... ❤️‍🩹🫂

कित्येक वर्षांनंतर तिने स्वतःहून पुढाकार घेतला, तेव्हा कुठे आमच्या आजवर कधीही न जुळलेल्या नात्याला पुन्हा एकदा नवे धुमारे फुटले आणि आमची अगदी नव्याने ओळख झाली. त्या पुनर्भेटणीच्या आनंदात तिला काय भेट द्यावी..? या मोठ्या कोड्यात मी पडलो होतो. पण नेहमीप्रमाणे तिनेच मला त्यातून मार्ग दाखवला. 'पहिली आणि शेवटची भेट, आणि ही भेटवस्तू' असं म्हणून तिने तिच्या हक्काने आणि आवडीने माझ्याकडे तिच्या सर्वात जास्त आवडीच्या चांदीच्या जोडव्यांची मागणी केली. मी त्या जोडव्या तिला दिल्या, आणि त्या क्षणापासून त्या केवळ वस्तू न राहता आमच्या नात्याचे एक जिवंत प्रतीक बनल्या. ती त्या जोडव्यांची जीवापाड काळजी घ्यायची. पायात त्या जोडव्या घालून जेव्हा ती घराच्या फरशीवर चालायची, तेव्हा होणारा तो नाजूक 'छम-छम' आवाज ऐकण्यात ती तासनतास हरवून जायची. तो आवाज ऐकण्यासाठी ती उगाचच घरात इकडून तिकडे फिरत राहायची आणि कधीकधी तोच गोड आवाज रेकॉर्ड करून मला मोबाईलवर पाठवायची. त्या आवाजात एक अनामिक आनंद असायचा, जो माझ्याही मनाला स्पर्श करून जायचा. काही वर्षांनंतर एके दिवशी अंगणात फिरताना तिच्या पायातील एक जोडवी अनावधानाने अंगणात कुठेतरी हरवली. ती नंतर सापडली हा भाग वेगळा, पण ती सापडेपर्यंत मात्र तिच्या जीवाला अजिबात चैन पडली नव्हती. ती जोडवी हरवल्याचे मला सांगताना तिचा कंठ दाटून आला होता, तिचा आवाज थरथरत होता. जणू तिच्या आयुष्यातले खूप मोठे काहीतरी हरवले होते. पुढे जेव्हा ती जोडवी पुन्हा सापडली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या आनंदात तिच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले होते. एका छोट्याशा निर्जीव वस्तूसाठी तिच्या मनात एवढी प्रचंड माया आणि ओढ होती, हे पाहून मी भारावून गेलो होतो. माझ्या बाबतीत एक अनुभव मला नेहमीच येत राहिलाय की माझ्या वाट्याला आलेलं कोणतंही सुख फार काळ टिकतच नाही. आज काळ बदलला आहे आणि परिस्थितीही. आता मी तिच्या आयुष्यातून कायमचा दूर चाललो आहे, जवळपास झालोच आहे. पण आता मात्र मला या गोष्टीचे खूप खूप आश्चर्य वाटते की, ज्या जोडवीसाठी ती एवढी रडली होती, त्याचं निमित्त ठरलेला मी आज माझ्या जाण्याने तिला काहीच फरक पडत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यांत कोणतीही विषण्णता किंवा दुःख दिसत नाहीये. एका निर्जीव वस्तूच्या हरवण्याने व्याकूळ होणारी ती, आज एका जिवंत माणसाच्या, तिच्या हक्काच्या माणसाच्या जाण्याने एवढी शांत आणि निर्विकार कशी काय राहू शकते..? हा प्रश्न माझ्या मनाला आतून पोखरत आहे. कधीकधी तर या अस्वस्थतेत माझ्या मनात असा वेडा विचार येतो की, मी ती "जोडवी" असतो तर कित्ती बरं झालं असतं ना..! कमीत कमी माझ्या हरवण्याचे दुःख तर तिच्या चेहऱ्यावर दिसले असते, माझ्यासाठी तिच्या डोळ्यांत अश्रू तरी आले असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट