काळ.. ❤️🩹🫂
असं म्हणतात की काळ बदलतो तशी माणसंही बदलतात, पण कालच्या त्या छोट्याशा प्रवासात मला त्याचं जे काही रूप पाहायला मिळालं, त्याने अक्षरशः माझ्या मनाचा थरकाप उडाला. कितीतरी वर्षांनी तो मला अचानक भेटला. त्याला पाहताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. कधीकाळी अत्यंत टापटीप राहणारा, स्वतःच्या अस्तित्वाबाबत कमालीचा सजग असणारा तो रुबाबदार माणूस आज अक्षरशः ओळखताही येत नव्हता. त्याचा तो निस्तेज चेहरा, विस्कटलेले पुर्ण पांढरे झालेले केस, ती भरमसाठ वाढलेली दाढी आणि अगदीच शून्य डोळे पाहून मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एखाद्या नात्यात अतिप्रामाणिक असणं आणि गरजेपेक्षा जास्त चांगलं वागणं माणसाचं किती भयानक नुकसान करू शकतं, याचं तो एक जिवंत उदाहरण बनून माझ्या समोर उभा होता. पण खरंच तो आता जिवंत आहे का..? हाच प्रश्न माझ्या मनात राहून राहून राहून येत होता. कारण त्याच्या शरीरात जीव तर होता, पण आत्म्याचा पार चक्काचूर झाला होता. बहुतेक केवळ एक चालता-बोलता निर्जीव देह माझ्या शेजारी बसला होता. त्याला त्या अवस्थेत पाहून माझं मन नकळतपणे त्याच्या भूतकाळात हरवून गेलं. त्याचं ते हसरं घर, त्याची ती स्वप्नं आणि त्याचं ते निरागस मन सगळं काही एका क्षणात माझ्या डोळ्यांसमोरून सरकून गेलं, आणि वाटलं की, खरंच... लग्न हा एखाद्या माणसाच्या आयुष्यातील किती महत्त्वाचा आणि नाजूक निर्णय असतो. आणि याच गोष्टीची जाणीव मला काल त्याला खूप बघून प्रकर्षाने झाली. लग्न हा एकच निर्णय माणसाला एकतर स्वर्गाचं सुख देतो किंवा नरकाच्या खाईत लोटतो. त्याच्या वाट्याला दुर्दैवाने लग्नाच्या नावाखाली झालेली फसवणूक आणि क्रूर विश्वासघात आला. ज्या नात्यावर त्याने स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच नात्याने त्याला असं काही ओरबाडलं की त्याच्याकडे आता स्वतःचं असं काहीच उरलं नव्हतं. लग्न चुकलं की केवळ एक नातं तुटत नाही, तर माणसाचा माणसांवरचा आणि स्वतःवरचा विश्वासच उडून जातो. जेव्हा हक्काच्या माणसाकडूनच फसवणूक होते, तेव्हा माणूस आतून पार उध्वस्त होऊन जातो. काल त्याला त्या अवस्थेत पाहताना माझ्या मनाला एक अनामिक वेदना होत होती आणि मी त्याच्या त्या भूतकाळात आणखी जास्त खोलवर खेचला जात होतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂