आपलेच दात आणि आपलेच ओठ... ❤️‍🩹🫂

कधी कधी आपण आपल्याच भावनांच्या चक्रव्यूहात असे काही अडकतो की, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतच नाही. समोरच्या व्यक्तीची चूक असते, यात तीळमात्र शंका नसते. पण त्या क्षणी आपल्या डोक्यात संतापाचा जो काही आगडोंब उसळलेला असतो, तो आपल्याला हतबल करून सोडतो. रागाच्या भरात आपल्या तोंडून शब्दांचे असे काही बाण सुटतात, जे नंतर आपल्यालाच जखमी करत राहतात. कालांतराने जेव्हा वाद संपतो, वातावरण शांत होतं आणि मुख्य म्हणजे आपला तो अनावर झालेला राग विरून जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने ख-या यातना सुरू होतात. मनात एक अनामिक हुरहूर दाटून येते आणि मन विचारू लागते की, खरंच इतकं बोलायची गरज होती का..? आता समोरची व्यक्ती कदाचित त्या सर्व गोष्टी विसरून, अगदी सहजपणे आपल्या आयुष्यात पुढे निघून गेलेली असते, तिच्या चेहऱ्यावर एक निवांतपणा असतो. पण आपण मात्र, आपणच रचलेल्या त्या शब्दांच्या ढिगाऱ्याखाली दबले जातो. आपली आंतरिक संवेदनशीलता आपल्याला शांत बसू देत नाही. आतल्या आत एक कासावीसपणा, एक बोचणारी टोचणी आपला जीव गुदमरवून टाकते. ज्याने चूक केली तो सुखाने झोपला आहे, आणि ज्याने केवळ संताप व्यक्त केला, तो पश्चात्तापाच्या आगीत होरपळतोय, हा विरोधाभास आपल्या मनाला फार वेदना देत असतो. शब्द हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात, हे त्रिकालाबाधित सत्य अशा वेळी काळजात फार फार खोलवर रुततं. आपण स्वतःलाच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करतो, स्वतःवरच चिडतो, आणि मनातल्या मनात त्या व्यक्तीची माफी मागू लागतो. आपली ही अवस्था, हा कासावीसपणा दुसऱ्या कोणामुळे नाही, तर आपल्याच चांगुलपणामुळे आणि अति संवेदनशील मनामुळे निर्माण झालेला असतो, जो समोरच्याला कधीच दिसत नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट