काय करावं..? ❤️🩹🫂
बऱ्याच दिवसांपासून त्याच्या डोळ्यांत एक न बोललेली घुसमट मला दिसत होती. तो नेहमीप्रमाणे मंदिरात यायचा, नमस्कार करायचा, दोन-चार शब्द बोलायचा आणि निघून जायचा, पण त्याच्या शांत चेहऱ्यामागे काहीतरी तुटत चाललं आहे, याची जाणीव मला प्रत्येक भेटीत होत होती. आज मात्र तो थांबला. बराच वेळ काही न बोलता उभा राहिला. मग अचानक म्हणाला, "साहेब, तिच्या आठवणी तर मी तिला परत करू शकत नाही, पण तिच्या माझ्याकडे असलेल्या काही वस्तू आणि आमच्या लग्नाच्या अल्बमचं आता मी काय करू...?"
त्याचा प्रश्न ऐकून मी क्षणभर निःशब्द झालो. कारण त्याने विचारलेला प्रश्न वस्तूंचा नव्हता, तो त्याच्या मनात अडकून पडलेल्या आयुष्याचा होता. त्या अल्बमच्या पानांमध्ये फक्त छायाचित्रं नव्हती, तर त्याची स्वप्नं होती. त्या वस्तूंमध्ये फक्त आठवणी नव्हत्या, तर त्याने जपलेला एक संपूर्ण संसार होता. त्याची सोडचिठ्ठी होऊन जवळपास वर्ष उलटलं होतं. काळ पुढे सरकत होता, ऋतू बदलत होते, त्या मंदिराच्या घंटाही रोज त्याच स्वरात वाजत होत्या, पण त्याच्या मनात मात्र वेळ जणू एका ठिकाणी येऊन थांबली होती. तो अजूनही त्या जुन्याच वळणावर उभा होता, जिथून त्याच्या आयुष्याने अचानक वेगळी दिशा घेतली होती.
खरं तर त्याला या सगळ्या गुंत्यात पडायचंच नव्हतं. त्याने संसाराला खेळ समजलं नव्हतं, तर जबाबदारी समजली होती. म्हणूनच नातं टिकवण्यासाठी त्याने स्वतःच्या इच्छा, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःच्या भावना कितीतरी वेळा बाजूला ठेवल्या. प्रत्येक वेळी तडजोड केली. प्रत्येक वेळी स्वतःलाच समजावत राहिला. कदाचित पुढे सगळं ठीक होईल, या आशेवर तो जगत राहिला. पण काही नाती अशी असतात की, त्यांना वाचवण्यासाठी एकट्याने केलेले प्रयत्न अपुरे पडतात. आज तो ज्या वेदनेत जगतो आहे, ती वेदना त्याला मिळालेल्या जखमेची नाही, ती त्याने दिलेल्या प्रेमाची आहे. कारण जिथे प्रेम जास्त असतं, तिथे विरहही खोलवर जाऊन बसतो. तो अजूनही जुन्या आठवणी कुरवाळतो. जुन्या संदेशांमध्ये हरवतो. एखादं गाणं ऐकलं की थांबून जातो. एखादी जागा पाहिली की भूतकाळ त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मी त्याला अनेकदा सांगितलं की, आयुष्य थांबत नाही. माणसांनी सोडलं तरी दिवस उगवणं थांबत नाही. पण काही सत्यं अशी असतात की ती समजून घ्यायला मनाला वेळ लागतो. आणि काही जखमा अशा असतात की त्यांच्यावर औषधापेक्षा स्वीकार जास्त काम करतो. त्याने विचारलेला प्रश्न आजही माझ्या मनात घुमतो आहे. त्या वस्तूंचं काय करावं, हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या आठवणींचं काय करावं..? ज्या स्वप्नांसाठी आयुष्य पणाला लावलं, त्यांच्या राखेचं काय करावं..? आणि खरं सांगायचं तर, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. कारण काही आठवणी जाळता येत नाहीत, फेकता येत नाहीत, परत करता येत नाहीत. त्या फक्त मनाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे ठेवाव्या लागतात. काळाच्या स्वाधीन कराव्या लागतात. कदाचित एक दिवस तोही त्या अल्बमकडे बघेल आणि डोळे पाणावणार नाहीत. कदाचित त्या वस्तूंना हात लावताना त्याच्या छातीत कळ उठणार नाही. पण तो दिवस येईपर्यंत, तो एका अशा प्रवासावर आहे जिथे सोबत फक्त आठवणींची आहे आणि समोर दिसणारा रस्ता अजूनही धूसर आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂