वेड माणसांचे हे... ❤️‍🩹🫂

त्या दिवशी तिच्याशी बोलत असताना ती अगदी सहजपणे मला म्हणाली की, "या देवानेही माझं कसलं नशीब लिहिलं आहे कुणास ठाऊक.?  ना कुणाची मैत्री मिळाली, ना कुणाचं प्रेम." तिच्या तोंडून निघालेले ते शब्द माझ्या कानांवर पडले आणि क्षणभरासाठी वेळ थांबून गेल्यासारखं वाटलं. तिचं बोलणं सुरू होतं, पण माझं मन मात्र कित्येक वर्षं मागे गेलं होतं, आणि त्या जुन्या आठवणींच्या गर्दीत मी स्वतःला शोधत होतो. मनात एकच विचार पुन्हा पुन्हा डोकावत होता की, खरंच तिला कधी कुणाची मैत्री मिळाली नव्हती.? खरंच तिच्यावर कुणी प्रेम केलं नव्हतं.? मग मी कोण होतो.? माझ्या भावना काय होत्या.? माझं तिला ते निस्वार्थ जपणं, तिच्यासाठी मनापासून झुरणं, तिच्या प्रत्येक आनंदात आनंदी होणं आणि तिच्या प्रत्येक दुःखाने आतून तुटून जाणं, हे सगळं नेमकं काय होतं.? बालपणापासून तिच्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर अप्रत्यक्षपणे मी कुठे ना कुठे होतोच, पण या गोष्टीकडे तिचं कधीच जरासं ही लक्ष नव्हतंच. तिला लपून छपून पाहण्यात, तिच्या हसण्यात, तिच्या असण्यात माझं समाधान दडलं होतं. कधी कधी जेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू आलेले पहायचो, तेव्हा माझ्याही मनात वेदनांचं वादळ उठायचं. पण या सगळ्याची तिला कधी जाणीव झालीच नाही. कदाचित मीच माझ्या भावना व्यक्त करण्यात कमी पडलो असेन. कदाचित तिच्या आयुष्यात माझं स्थान इतकं साधं आणि सहज होतं की, त्यामागे दडलेलं माझं प्रेम तिच्या नजरेत कधी आलंच नाही. पण आज तिच्या त्या एका वाक्याने मात्र माझ्या मनात कितीतरी न बोललेल्या गोष्टी जाग्या झाल्या. मला तिचा राग आला नाही, उलट तिच्यासाठी वाईट वाटलं. कारण ती ज्या प्रेमाच्या शोधात होती, ते प्रेम अगदी बालपणापासूनच, तिच्या अगदी जवळ उभं होतं. ती ज्या मैत्रीची उणीव सांगत होती, ती मैत्रीही अगदी बालपणापासूनच तिच्या प्रत्येक सुख-दुःखात तिच्यासोबत चालत आली होती. बाकी आयुष्याचा हा किती विचित्र खेळ असतो ना. काही लोक आपल्या आयुष्यात इतके जवळ असतात की त्यांचं महत्त्वच लक्षात येत नाही. सूर्य रोज उगवतो म्हणून त्याचं कौतुक राहत नाही, पण तो एक दिवस दिसला नाही तर त्याची किंमत कळते. काहीसं तसंच माझ्या आणि तिच्या नात्याचं होतं. आजही तिचं ते वाक्य आठवलं की मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हलकीशी वेदना जागी होते. कारण मी कधी तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा केली नव्हती, पण तिने किमान माझ्या भावनांचं अस्तित्व तरी ओळखावं, एवढी एक छोटीशी इच्छा मात्र मनात कायम होती. पण कदाचित प्रत्येक प्रेमकहाणीला पूर्णत्व लाभावं असं काही नसतं. बहुतेक प्रेमं हे फक्त मनात जपण्यासाठीच असतं. त्याला नाव नसतं, हक्क नसतो, अपेक्षाही नसतात. फक्त एक निस्वार्थ जिव्हाळा असतो आणि आयुष्यभर मनात राहणारी एक हळवी जाणीव की, ज्याला आपण सर्वस्व मानलं, त्याला आपल्या प्रेमाची खबर नव्हतीच. आणि म्हणूनच आजही तिने अगदी सहजपणे बोललेले ते शब्द आठवले की, मनात नकळत एकच विचार धुमाकूळ घालू लागतो की, "तू म्हणालीस तुला मैत्री मिळाली नाही, प्रेम मिळालं नाही, पण तू कधी मागे वळून पाहिलं आहेस का.? तसा विचार तरी कधी केला आहेस का..? कदाचित तू जे काही शोधत होतीस, ते सगळं काही तुझ्या अगदी जवळच उभं होतं गं..!" 🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट