चिनू ताई...
कधी कधी संध्याकाळचा एखादा निवांत क्षण मनाला कुठल्याशा जुन्या वाटेवर घेऊन जातो ना. त्या वाटेवर ना कुठली घाई असते, ना वर्तमानाचं ओझं. तिथे फक्त आठवणी असतात, धूसर होत चाललेल्या, पण मनाच्या गाभाऱ्यात अजूनही तितक्याच जिवंत असलेल्या. अशाच एका संध्याकाळी मी घरात बसलो होतो. समोर खेळणाऱ्या छोट्याशा रिया राणीच्या खळखळून हसण्याने अचानक मनात कुठेतरी एक जुना दरवाजा उघडला. आणि त्या दरवाजातून तू बाहेर आलीस... अगदी लहानशी, चिमुकली, निरागस. आमची चिनू... चिनू ताई...
"ए विन्या काकू...!" "ओ काका...!" "ए श-या दादा...!"
तुझ्या त्या हाका अजूनही कानात तशाच घुमतात. घराच्या उंबरठ्यावरून आत येताना तुझ्या पावलांमध्ये एक वेगळाच उत्साह असायचा. जणू संपूर्ण घर हे तुझंच राज्य होतं आणि आम्ही सगळे तुझ्या त्या छोट्याशा राज्यातील प्रजा. त्या काळात दिवस कधी उगवायचा आणि कधी मावळायचा ते कळायचंच नाही. कारण घरात तुमच्या दोघा भावंडांचा सतत वावर असायचा. कधी भांडणं, कधी खेळ, कधी हट्ट, कधी रडणं, तर कधी निष्पाप हसणं. त्या सगळ्याने आपल्या घराच्या भिंती आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा जिवंत झालेला असायचा. आज विचार केला तर वाटतं, त्या दिवसांत आमचं घर हे फक्त घर नव्हतं, ते खरंच एक छोटंसं गोकुळ होतं.
माणसाच्या आयुष्यात काही चेहरे असे असतात की, ते काळाच्या पडद्यामागे कधीच जात नाहीत. वर्षे उलटतात, कॅलेंडरची पानं बदलतात, ऋतू बदलतात, केस पांढरे होतात, आठवणी धूसर होतात, पण काही चेहरे मात्र मनाच्या पटलावर अगदी जसेच्या तसे राहतात. चिनू ताई.., तुझा चेहरा त्यापैकीच एक. मला आजही आठवतंय, तू आजारी होतीस. तुला एक कडू औषध दिलं होतं. ते पिणं तुला अजिबात पसंत नव्हतं. ते औषध तसंच तोंडात घेऊन तू बराच वेळ रडत बसली होतीस. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण औषध गिळायचं नाही हा तुझा निर्धारही तितकाच पक्का होता. त्या क्षणी आम्ही सगळे हसत होतो, पण आज त्या आठवणीकडे पाहिलं की मन नकळत जड होतं आणि डोळ्यांची कडा ओलावून जाते.
आता या मधल्या काळात माझ्या आयुष्यात इतकी प्रचंड उलथापालथ होऊन गेली आहे की, त्यामुळे कधी कधी मनात असा विचार येऊन जातो की, तुम्हा दोघा भावंडांच्या बालपणाचं सुख नियतीने काही उगाचच माझ्या वाट्याला लिहिलं नव्हतं. बहुतेक नियतीला ही माझ्या वाट्याला पुढे काय काय लिहून ठेवलं आहे, हे चांगलंच ठाऊक होतं. म्हणून माझ्या आयुष्यात, भविष्यात माझ्या वाट्याला येणारी ती उणीव नियतीने तुम्हा भावंडांच्या बालपणीच्या रुपाने भरून काढली. आणि तुम्हा दोन्ही भावंडांनी ही आम्हाला जीव लावायला काही कसर बाकी ठेवली नव्हती. अक्षरशः तुमच्या मायबापाच्या जागेवर तुम्ही भावंडं आम्हाला पाहत असायचा.
काळाचं एक वैशिष्ट्य असतं. तो कुणासाठीही थांबत नाही आणि कुणाला मागे टाकून पुढे निघून जात नाही. तो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे पुढे जातच राहतो. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं की ज्या चिमुकल्या हातांनी आपलंही बोट धरून चालायला शिकलं होतं, ते हात आता स्वतः स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवू लागले आहेत. तुझ्याबाबतही तसंच झालं, आणि ते काही चुकीचं नाही. पंखात बळ आलं की घरट्याची कितीही ओढ वाटत असली तरीही पाखरांना घरटं हे सोडावंच लागतं. तू मोठी झालीस. तुझं जग बदललं. आमचंही बदललं. भेटीगाठी कमी झाल्या. गप्पाही कमी झाल्या. पूर्वीसारखा रोजच्या गाठीभेटी, तो सहवास राहिला नाही. पण काही नाती अशी असतात की त्यांना सततच्या भेटींची गरज नसते. ती मनातल्या एका कोपऱ्यात कायमस्वरूपी आहे तशीच त्याच जागेवर राहतात. आणि म्हणूनच आज जेव्हा आपली रिया राणी खेळताना, बागडताना , हसताना, रडताना, रूसताना दिसते तेव्हा माझं मन तिच्यात तुला शोधायला लागतं. तिच्या खोड्यांमध्ये, तिच्या हसण्यात, तिच्या रुसण्यात मला पुन्हा एकदा आमची तीच जुनी चिनू... चिनू ताई मला दिसते. जणू काळाने पूर्ण वर्तुळ पूर्ण केलं आहे की काय, असं वाटू लागतं.
कधी कधी तर मनात विचार येतो की, जर या काळचक्राला मागे फिरवता आलं असतं तर.? जर त्या दिवसांना पुन्हा एकदा स्पर्श करता आला असता तर.? जर तुम्ही दोघं भावंडं पुन्हा एकदा तितकीच लहान झाला असता आणि आम्हीही त्या दिवसांत परत गेलो असतो तर.? पण तितक्यात 'वास्तव' हळूच खांद्यावर हात ठेवतं आणि सांगतं की शरदराव... आयुष्य हे फक्त पुढे जाण्यासाठीच असतं. बालपण परत येत नाही. ते क्षण परत येत नाहीत. परत सतत फिरून येतात, त्या फक्त आठवणी. आणि कदाचित म्हणूनच त्या इतक्या मौल्यवान असतात. आजच्या बदललेल्या जगात माणसं पूर्वीसारखी राहिली नाहीत, नात्यांची उबही काहीशी कमी झाली आहे. तरीही काही भावना अशा असतात की त्यांच्यावर काळाचा परिणाम होत नाही. त्या वर्षानुवर्षं तशाच राहतात. तुझ्याबद्दलची आमची भावना ही त्यापैकीच एक.
चिनू ताई... तू आमच्यासाठी फक्त एक व्यक्ती नाहीस. तू आमच्या आयुष्यातील एका सुंदर काळाचं नाव आहेस. तू त्या दिवसांची आठवण आहेस, जेव्हा आपल्या गल्लीत, घरात निरागसतेचं राज्य होतं. तू त्या हसण्याचा आवाज आहेस, जो अजूनही आमच्या मनाच्या आणि घराच्या कोपऱ्यात घुमतो. आणि म्हणूनच, काळ कितीही पुढे गेला तरी, आयुष्य कितीही बदललं तरीही, आमच्या मनाच्या आकाशात तुझं स्थान त्या ध्रुवताऱ्यासारखंच राहणार आहे. स्थिर, अढळ आणि सदैव आठवणींचा प्रकाश देणारं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂