चूक बरोबर योग्य अयोग्य... ❤️‍🩹🫂

घराबाहेर पडताना आपण कपडे घालतो, खिशात चावी टाकतो, सोबतीला मोबाईल घेतो, आणि अगदी कळत नकळत आणखी एक गोष्ट संगतीला घेतो, ती म्हणजे आपल्या मनात उसळणारा गोंधळ, एखाद्या गोष्टीबद्दलचा राग, किंवा घरातून बाहेर पडताना घरातल्या माणसांशी झालेला किरकोळ वाद. कुणी अपमानाची राख मनात घेऊन निघालेला असतो, कुणी कर्जाच्या चिंतेने पोखरलेला असतो, कुणी नात्यांच्या तुटलेल्या धाग्यांनी आतून रक्तबंबाळ झालेला असतो, तर कुणी आयुष्यभराच्या अपयशाचा राग स्वतःवरच धरून फिरत असतो. बाहेरून पाहिलं तर सगळे अगदी नेहमीसारखेच दिसतात. चेहऱ्यावर हसूही असतं, ओठांवर बोलणंही अगदी नॉर्मल असं असतं, पण आतल्या आत किती वादळं धुमसत असतात, याचा अंदाज समोरच्या माणसाला येणं शक्यच नसतं. म्हणूनच कधीकधी अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला एखादा वाद अचानक पेट घेतो. एका शब्दाला दुसरा शब्द भिडतो. अहंकार विवेकाला मागे सारतो. राग डोळ्यांवर पडदा टाकतो. आणि पुढच्या काही क्षणांत आयुष्यभर भरून न निघणारी पोकळी निर्माण होते. कारण रागाला फक्त एक क्षण पुरेसा असतो, पण त्या क्षणाची शिक्षा मात्र अनेक आयुष्यं आजन्म भोगत राहतात. त्या दिवशीही कदाचित असंच काहीसं घडलं असेल. कोणाच्या मनात आधीपासूनच साचलेला राग, कोणाची न बोललेली घुसमट, कोणाचा दुखावलेला स्वाभिमान आणि त्यावर एका क्षुल्लक कारणाची ठिणगी, इतकंच. पण त्या ठिणगीने एका घराचा दिवाच विझवला. मयंक लोहार या नावामागे फक्त एक व्यक्ती नव्हती. कोणाचा मुलगा होता, कोणाचा भाऊ होता, कोणाच्या आयुष्याचा आधार होता. त्याच्या एका श्वासावर अनेक स्वप्नं उभी होती. पण एका अनियंत्रित क्षणाने ती सगळी स्वप्नं कायमची उद्ध्वस्त झाली. नंतर उरतात फक्त पोलीस पंचनामे, न्यायालयीन प्रक्रिया, वर्तमानपत्रातील मथळे आणि सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या हळहळी. पण त्या सगळ्यांपलीकडे, एखाद्या घरात मात्र रोज एक ताट कमी वाढलं जातं, एखादी आई अजूनही संध्याकाळच्या वेळी दाराकडे पाहत बसते, एखाद्या वडिलांच्या डोळ्यांतलं पाणी आतल्या आत सुकत राहतं, आणि एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात वेळ कायमचा थांबून जातो. म्हणून प्रत्येक वेळी जिंकण्यापेक्षा, कधीतरी शांत राहणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण समोरचा माणूस कोणत्या वेदनेशी झुंज देतोय, हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्या मनात नेमकं काय चाललंय आपल्याला माहीत नसतं. एखाद्या किरकोळ गोष्टींवर तो कसा रिऍक्ट होईल हे ही आपल्याला माहीत नसतं. त्याचं पर्यावसान आपला जीव जाण्यापर्यंत होऊ शकतू, हे ही माहीत नसतं. आणि हे असं सगळं काही चुकीचं घडत असतानाही माणूस समाज म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून कमी पडतो आणि जे काही घडत आहे ते थांबवण्याची, प्रतिकार करण्याची क्षमता असूनही षंढ होऊन उभा राहतो, आणि दररोजच एखादा मयंक लोहार शेकडो माणसांच्या गर्दीत तडफडत आपला जीव सोडतो.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट