काय केलंस हे कृष्णा.. 🫂
रात्री अपरात्री फोन वाजला की आता हात नकळत थरथरतात. स्क्रीनवरचं नाव दिसण्याआधीच मनात शंभर शंका गर्दी करून उभ्या राहतात. कारण काही फोन आयुष्यभरासाठी माणसाच्या मनात भीतीचा एक कायमचा आवाज ठेवून जातात.
महिनाभरापूर्वी एका जिवलग मित्राच्या जाण्याची बातमी अशाच एका फोनने दिली होती. त्या धक्क्यातून मन अजून बाहेर पडलंही नव्हतं. आणि आज पुन्हा पहाटेच्या अंधारात फोन वाजला... दुसऱ्या टोकाला शब्द कमी होते, पण शांततेचा आवाज खूप मोठा होता.
"कृष्णा गेला..." एवढंच ऐकलं... आणि क्षणभर सगळंच स्तब्ध झालं.
वयाच्या अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी एखादा माणूस आयुष्याला इतका कंटाळतो, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी असते. दोन मुलं... दोघांचीही लग्नं झालेली... नुकतंच नवीन घर बांधलेलं... वरकरणी सगळं व्यवस्थित दिसणारं आयुष्य... पण माणसाच्या मनात कोणतं वादळ सुरू असतं, हे बाहेरून दिसत नाही. घरात पोहोचलो तेव्हा रडण्याचे आवाज सगळीकडे पसरले होते. पण त्या सगळ्या आवाजांमध्ये एक आवाज सतत कानावर आदळत होता.
"कृष्णा... मी पुन्हा काहीच बोलणार नाही रे... फक्त परत ये..."
तो हंबरडा कृष्णाच्या आईचा होता.
कृष्णाच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केला होता. आणि नातवंडांनी घेतलेल्या या निर्णयांचा दोष आईच्या शब्दांतून सतत कृष्णाच्याच वाट्याला येत राहिला. ज्या शब्दांनी कदाचित त्याला रोज थोडं थोडं मोडलं असेल, त्याच शब्दांनी आज स्वतःलाच माफी मागितली होती. पण काही माफ्या खूप उशिरा जन्माला येतात. तेव्हा त्या ऐकण्यासाठी समोरचा माणूसच उरलेला नसतो.
घरापासून थोड्याच अंतरावरच्या ओढ्यालगतच्या झाडाला त्याने आपला शेवटचा आधार बनवला होता. त्याच्या डोक्यावरच्या जखमा पाहताना मन सुन्न झालं. स्वतःला झाडावर लटकवण्यासाठी तो झाडावर चढताना कितीदा पडला असेल..? कितीदा पुन्हा उठला असेल..? प्रत्येक वेळी त्याच्या मनाने त्याला एकदा तरी विचारलं असेल का, "अजूनही परत फिरशील का..?" पण त्याच्या त्या मनाची जगण्याची इच्छा तर बहुतेक फार फार आधीच संपली होती.
आपण म्हणतो, "त्याने एका क्षणात निर्णय घेतला."
पण खरं म्हणजे असा निर्णय एका क्षणात होत नाही. तो अनेक अपमान, अनेक एकटेपणाच्या रात्री, अनेक न बोललेल्या वेदना आणि हजारो नि:शब्द अश्रूंनी तयार होत असतो.
माणूस गळफास एका दिवशी घेतो. पण त्याआधी तो स्वतःला कित्येक दिवस, कित्येक महिने, कधी कधी कित्येक वर्षं मनाने मारत असतो.
शेवटी मरतं ते शरीर नसतं. आधी आशा मरते, मग हसू मरतं, मग बोलणं मरतं, आणि एक दिवस जगण्याची इच्छाच मरून जाते.
तेव्हा उरतो फक्त एक निःशब्द देह...
आणि मागे राहतात आयुष्यभर कानात घुमणारे काही शब्द..
"माझ्या लेकरा... कृष्णा... मी पुन्हा काहीच बोलणार नाही रे...
फक्त एकदा परत ये..!" 🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂