"साहेब, घरी जायचं आहे की नाही..?" ❤️🩹🫂
काटा पाचवर येऊन स्थिरावला की ऑफिस सुटतं. बाकी सगळ्यांसाठी तो दिवस संपल्याची वेळ असते, पण माझ्यासाठी मात्र त्या क्षणापासून एका वेगळ्याच दिवसाची सुरुवात होते. कामाच्या व्यापात मनाला गुंतवून ठेवणारे तास संपतात आणि मनाला स्वतःशी झुंज द्यावी लागणारी संध्याकाळ सुरू होते.
त्या दिवशीही ऑफिसमधला शिपाई नेहमीप्रमाणे सहज म्हणाला, "साहेब, घरी जायचं आहे की नाही..?" त्याचा प्रश्न साधाच होता, पण त्या शब्दांनी माझ्या मनाच्या अतिशय खोल कप्प्यात दडवून ठेवलेल्या रिकामेपणाला स्पर्श केला. माझ्या चेहऱ्यावर उमटलेला क्षणिक बदल त्यालाही जाणवला असावा. त्याने पुढे काहीच बोलणं टाळलं. पण त्याच्या त्या एका प्रश्नाने माझ्या आत विचारांचं एक अखंड वादळ उठवलं होतं.
मी यंत्रवत संगणक बंद केला, टेबलावरची कागदपत्रं नीट लावली, बॅग खांद्यावर अडकवली आणि ऑफिसबाहेर पडलो. मागे शटर खाली ओढल्याचा खडखडाट झाला, कुलूप लागलं आणि दिवस संपल्याची अधिकृत नोंद झाली. शिपाई लगेचच आपल्या घरी निघून गेला. मी मात्र ऑफिस बाहेरच्या त्या माझ्या नेहमीच्या त्या कट्ट्यावर काही क्षण तसाच उभा राहिलो.
आता माझ्या समोरचा रस्ता माणसांनी आणि वाहनांनी भरलेला होता. प्रत्येकजण कुठल्यातरी ओढीने धावत होता. त्या धावण्यात एक आगतिक वेग होता. कारण त्या प्रत्येकाच्या प्रवासाच्या शेवटी कुणीतरी त्यांची वाट पाहत होतं. कुणासाठी गरमागरम चहा तयार असेल, कुणाच्या स्वागताला लेकरांचे हसरे चेहरे असतील, तर कुणाला उशीर झाल्याबद्दल हक्काने रागावणारं एखादं आपलं माणूस असेल.
आणि मी...?
मी ज्या घराकडे निघालो होतो, तिथे माझी वाट पाहत होत्या फक्त चार भिंती आणि एक असह्य शांतता. दारावरची बेल वाजवण्याची गरजच नव्हती, कारण आतून दरवाजा उघडायला कोणी नव्हतंच. स्वतःच कुलूप उघडायचं, अंधारात घरात प्रवेश करायचा आणि पुन्हा एकदा त्या शांततेला सामोरं जायचं., हा माझ्या आयुष्याचा रोजचा ठरलेला क्रम झाला होता.
माणूस घरासाठी आयुष्यभर झटत असतो, पण घर हे फक्त विटा, सिमेंट आणि छपराचं नाव नसतं. त्या भिंतींना जिवंत करणारी माणसं, त्यांचे आवाज, त्यांचा सहवास आणि त्यांच्या अस्तित्वाचा दरवळ यांमुळेच एखादी वास्तू खरं घर बनत असते. माझ्या घरात भौतिक सुखाच्या जवळजवळ सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या घराचा आत्माच कुठेतरी हरवून गेला आहे.
घरी परतल्यावर "आलात का..?" असं प्रेमाने विचारणारं कोणी नाही. "आज एवढा उशीर का झाला..?" असं हक्काने रागावणारंही कोणी नाही. दिवसभर बाहेर कितीही लोकांच्या गराड्यात वावरलो, तरी दिवसाच्या शेवटी आपली वाट पाहणारं एकही हक्काचं माणूस नसणं, ही आयुष्यातली सर्वात मोठी पोकळी असते. ती पोकळी शब्दांत मांडता येत नाही, ती फक्त जगावी लागते.
हात पाय धुवून, धूप दीप लावून, कपडे बदलून सोफ्यावर बसल्यावर मी टीव्हीचा आवाज मुद्दामहून मोठा करतो. कदाचित त्या आवाजात घरातली शांतता विरघळेल, अशी एक निष्फळ आशा माझ्या मनात असते. पण उलट त्या कृत्रिम आवाजाच्या पलीकडे ती शांतता आणखी गडद होत जाते. ती हळूहळू मनात शिरते, आठवणी जाग्या करते आणि नकळत आत्म्यालाच कुरतडत राहते.
ऑफिसमध्ये कामामुळे दिवस कसा संपतो ते कळत नाही. जबाबदाऱ्या मनाला थकवतात, पण त्या मनाला व्यस्तही ठेवतात. मात्र संध्याकाळी पाच वाजल्यानंतर वेळेचं गणितच बदलून जातं. प्रत्येक मिनिट जड होत जातो, आणि प्रत्येक क्षण एखाद्या युगासारखा भासू लागतो.
ज्या घरासाठी माणूस दिवसभर कष्ट करतो, त्याच घराची पायरी चढताना जर पाय जड होत असतील, तर त्याहून मोठी शोकांतिका दुसरी कोणती असू शकते..? कारण त्या घरात माझी वाट पाहतं ते फक्त माझंच घर, माझ्यासाठी जिवंत असलेलं एकही माणूस नाही.
हे वास्तव स्वीकारताना दररोज माझ्यातला एक भाग शांतपणे मरत असतो. तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होते. मी उठतो, ऑफिसला जातो, खुर्चीवर बसतो, कामाला सुरुवात करतो आणि जगासमोर पुन्हा एकदा हसतमुख 'साहेब' म्हणून उभा राहतो. कदाचित जगणं म्हणजे हाच रोजचा अभिनय असावा. आतून तुटत राहायचं आणि बाहेरून सावरल्याचा आव आणत पुढे चालत राहायचं.
आणि मग पुन्हा एकदा संध्याकाळ होते... काटा पाचवर येतो... आणि माझ्या एकाकीपणाचा नवा अध्याय पुन्हा सुरू होतो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂