आशिर्वाद... ❤️🩹🫂
प्रत्येक वर्षी कॅलेंडरचं ते एक पान समोर येतं, आणि मला कळून चुकतं की आता पुन्हा एकदा त्या आठवणी आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार.
इतरांसाठी तो दिवस इतर दिवसांसारखाच असतो. ऑफिस सुरू असतं, रस्त्यांवरची गर्दी तशीच धावत असते, चहाच्या टपऱ्यांवर तेच हशे तसेच ऐकू येत असतात. पण माझ्या आत मात्र सगळं काही थांबलेलं असतं.
त्या दिवशी मी जगत नाही, फक्त श्वास घेत असतो.
मी स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करतो की एवढी वर्षं झाली, आता सवय व्हायला हवी. पण काही तारखा सवयीच्या होत नाहीत, त्या फक्त एखाद्या जुनाट जखमेवरची खपली नकळतपणे काढून टाकतात.
आठवणींचंही एक विचित्र गणित असतं. त्या कधीच पूर्णपणे सोडून जात नाहीत. वर्षभर कुठेतरी शांत पडून राहतात आणि मग नेमक्या त्या दिवशी दार ठोठावतात, अगदी हक्कानं. मी त्या दाराला कुलूप लावण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला. पण आठवणींना दार नसतं, त्या थेट मनातून आत येतात.
त्या दिवशी पुन्हा तुझा आवाज ऐकू यायला लागतो. पुन्हा तेच रस्ते, तीच गल्ली, तीच ठिकाणं, तेच क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. आणि सगळ्यात जास्त त्रास देतं ते म्हणजे, त्या सगळ्यात, त्या सगळ्या ठिकाणी मी तुला शोधणं आणि तिथं प्रत्येक ठिकाणी मला तुझ्यासोबत पाहणं.
काळ पुढे सरकतो म्हणे...
पण काही माणसं मात्र काळाच्या पुढे जातच नाहीत. ती एका दिवसात अडकून राहतात. शरीर वर्तमानात जगतं, पण मन वर्षानुवर्षं त्याच तारखेला उभं असतं.
लोक विचारतात, "अजून विसरला नाहीस?"
मी फक्त हसतो.
कारण विसरणं हा निर्णय नसतो, तो नशिबाने दिलेला आशीर्वाद असतो. आणि तो प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही.
त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर दिसणारं शांत हास्य अनेकांना खरं वाटतं. पण त्या हसण्याच्या मागे किती किंकाळ्या गुदमरून पडलेल्या असतात, हे फक्त माझं मन जाणतं. रात्र होते. सगळे झोपतात. आणि मी पुन्हा एकदा त्या जुन्या दिवसासमोर बसतो. स्वतःशीच बोलतो, स्वतःलाच दोष देतो, स्वतःच स्वतःला सावरतो.
जेव्हा सकाळ होते तेव्हा आरशातला चेहरा तोच असतो, पण आतला माणूस पुन्हा एकदा मरून गेलेला असतो.
म्हणूनच कदाचित प्रत्येक वर्षी, त्या एका दिवशी मी वयाने मोठा होत नाही, फक्त दुःखाने थोडासा अधिक जुना होऊन जातो. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीसारखा जगायला बाहेर पडतो. जणू काही काल काहीच घडलं नव्हतं. पण मला माहीत असतं, माझ्या आयुष्यात काही दिवस संपतच नाहीत. ते फक्त दरवर्षी पुन्हा जन्म घेतात, आणि त्या दिवसांसोबत मीही पुन्हा एकदा शांतपणे मरून जातो.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂