शब्दांचा हा खेळ मांडला... ❤️🩹🫂
काही दिवस असेही असतात, जेव्हा संपूर्ण दिवस मी माणसांनी वेढलेलो असूनही संध्याकाळी मात्र स्वतःलाच अनोळखी वाटू लागतो. मला बोलावंसं तर खूप वाटत असतं, पण ऐकून घेण्यासाठी नेहमीप्रमाणेच एकही खांदा आसपास कुठेही दिसत नाही. मग शब्द घशातच अडकून राहतात आणि डोळे शांतपणे मनाचं ओझं वाहत राहतात. अशा वेळी हा कागदच एकमेव माणूस बनून माझ्या समोर येतो आणि माझा हात हातात घेऊन विनाअट, विनातक्रार माझ्या सोबतीला बसतो. तो मला मध्येच अडवत नाही, न्याय करत नाही, सल्ले देत नाही. तो फक्त शांतपणे माझी प्रत्येक वेदना, माझी प्रत्येक आठवण आणि मी न बोललेलं प्रत्येक वाक्य त्याच्या मिठीत सामावून घेत राहतो. कदाचित म्हणूनच मी लिहितो. लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी. मी लिहिलेल्या या प्रत्येक ओळीत माझा थोडासा श्वास असतो, प्रत्येक शब्दात एखादं मी न सांगितलेलं दुःख, आणि प्रत्येक विरामात कुणीतरी कधीतरी समजून घेईल, अशी अजूनही जिवंत असलेली एक छोटीशी भाबडी आशा. काही माणसं बोलून हलकी होतात, आणि काही माणसं लिहून जगत राहतात. हो.... मी बहुतेक त्या दुसऱ्या प्रकारातला आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
( सौजन्य :- शरदबुवा महाराज मिरजकर )