नियती निमित्त... ❤️‍🩹🫂

२०१६ च्या जून महिन्याचा शेवटचा आठवडा नुकताच सुरू झाला होता. पावसाने अजून मनासारखा मुक्काम केला नव्हता, पण माझ्या मनात मात्र आठवणींचे ढग आधीच दाटून आले होते. तुझा वाढदिवस अगदी दारात येऊन ठेपला होता. म्हणूनच त्या दिवशी दुसऱ्या एका मुलीला पाहायला जात असतानाही माझ्या मनात कुठेतरी तूच होतीस. शरीर त्या घराच्या दिशेने चाललं होतं, पण मन मात्र अजूनही तुझ्याच वाटेवर भटकत होतं. तसं त्याआधी दोन-तीन स्थळं पाहून आलो होतो. नेहमीसारखाच लगेचच जागेवरच होकार कळविला होता. पण कुठे गुण जुळले नाहीत, तर कुठे ग्रह नक्षत्रांनी आडवं येण्याचा हट्ट धरला. प्रत्येक वेळी काहीतरी कारण पुढे आलं आणि गोष्ट अर्धवट राहिली. यावेळी मात्र सगळंच वेगळं घडत होतं. याआधीही मी माझ्याबद्दल कधीच काहीही लपवलं नव्हतं, आणि आजही तेच केलं. जसा होतो तसा स्वतःला त्यांच्या समोर उभा केला. "भाकरी सोडली तर बाकी सगळा स्वयंपाक येतो," हेही सहज सांगून टाकलं. त्यावर तिचे आजोबा मनापासून हसले. "अहो, आमच्या मुलीलाही सगळा स्वयंपाक येतो... फक्त थोड्या संथगतीने करते. तेवढं सांभाळून घ्या," असं म्हणत त्यांनी वातावरण हलकं करून टाकलं. क्षणभर मला वाटलं, आयुष्य इतकं साधं आणि सहज असू शकतं का..? माझ्या पगाराबद्दल कुणी विचारलं नव्हतं. तरीही मी स्वतःहून तो विषय काढला. पुढे जाऊन "हे आधी सांगितलं नव्हतं," अशी कुणाची तक्रार राहू नये, एवढाच उद्देश होता. कारण नातं उभं राहत असेल तर ते सत्याच्या पायावरच उभं राहावं, ही माझी साधी अपेक्षा होती. मग अचानक तिच्या आजोबांनी आम्हा दोघांना अगदी शेजारी शेजारी उभं केलं. "जरा पाहूया, नेमकं उंच कोण?" म्हणत त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं. काही क्षणांनी ते हसले आणि म्हणाले, "दोघांची उंची तर जवळजवळ सारखीच आहे." ती माझ्या इतकी जवळ उभी होती... पण त्या क्षणीही माझ्या डोळ्यांना तिचा चेहरा दिसत नव्हता. नकळत माझ्या मनाने तिच्या जागी तुझीच प्रतिमा उभी केली होती. काही क्षणांसाठी मला खरंच वाटलं... माझ्या शेजारी उभी असलेली व्यक्ती ही ती नसून तूच आहेस. काही भ्रमही कधी कधी किती जिवंत असतात ना..?

तिची लहान भावंडं माझ्याकडे कुतूहलाने पाहत होती. कुणी माझ्या शर्टाकडे पाहत होतं, कुणी चेहऱ्याकडे, तर कुणी उंचीकडे. एका कोपऱ्यात तिची आजी आणि तीन माम्या उभ्या राहून हळू आवाजात काहीतरी कुजबुजत होत्या. त्या घरात जवळजवळ प्रत्येक नजर माझ्यावर स्थिरावली होती. पण त्या सगळ्या नजरा माझ्याकडे असल्या, तरी माझं अस्तित्व मात्र तिथे नव्हतंच. मी कुठेतरी फार दूर... तुझ्या आठवणींच्या प्रदेशात हरवून गेलो होतो. अचानक माझ्या मोठ्या भावाने खांद्यावर हात ठेवला आणि मी भानावर आलो. तो शांतपणे म्हणाला, "त्यांनीही लगेचच होकार दिलाय... पण मला वाटतंय, तू आणि ते दोघेही थोडी घाई करताय. अजून एखादं-दुसरं स्थळ पाहूया का..? मला मुलगी खूपच नाजूक वाटतेय रे." त्याच्या शब्दांत विरोध नव्हता... फक्त काळजी होती.

माझ्या आयुष्याबद्दलची, माझ्या उद्याबद्दलची. पण मी मात्र नेहमीप्रमाणेच आतून निर्णय घेऊनच तिथे आलो होतो. यंदा काहीही झालं तरी लग्न करायचंच. आई-बाबांच्या खांद्यावरची ही मोठी जबाबदारी आता संपवायचीच. त्या दिवशी मला वाटत होतं की मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेत आहे. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं...

निर्णय माझा असला, तरी पटकथा कुणीतरी दुसराच लिहित होता, आणि त्या पटकथाकाराचं नाव होतं....., नियती.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट