"बाप" झाल्याशिवाय "बाप" कळत नाही.. ❤️🩹🫂
जो तो नेहमीच आईच्या मायेचं गाणं गातो, आणि ते योग्यच आहे. पण घराच्या कोपऱ्यात शांतपणे उभा असलेला एक माणूस मात्र कायम शब्दांच्या बाहेर राहतो. तो म्हणजे बाप. घराच्या भिंतींना जर स्मरणशक्ती आणि वाचा असती, तर त्यांनी सांगितलं असतं की या घरात सर्वांत जास्त घाम कोणाचा सांडला. दाराच्या उंबरठ्याने सांगितलं असतं की पहाटे सर्वांत आधी बाहेर पडणारा आणि रात्री सर्वांत शेवटी परतणारा माणूस कोण होता. पण भिंती बोलत नाहीत, उंबरठे साक्ष देत नाहीत, म्हणून बापाची कहाणी नेहमीच अबोल राहून जाते. तो आयुष्यभर स्वतःला खर्च करत राहतो. अगदी मेणबत्तीसारखा. प्रकाश मात्र दुसऱ्यांच्या वाट्याला देतो. त्याच्या हातांवर पडलेल्या घट्टे कुणाला दिसत नाहीत, कारण लोकांचं लक्ष नेहमी त्याने उभ्या केलेल्या सुखाकडे, सुखी प्रपंचाकडे असतं. त्या सुखामागची झीज मात्र कुणी मोजत नाही, समजून घेत नाही. त्याच्या इच्छा, स्वप्नं फार मोठी नसतात. खरं तर कालांतराने त्याला स्वतःच्या इच्छाच उरत नाहीत. मुलाला चांगली शाळा मिळावी, मुलीच्या चेहऱ्यावर हसू असावं, घरात कुणी उपाशी झोपू नये, एवढ्याच काही गोष्टी त्याच्या स्वप्नांच्या यादीत राहतात. बाकी सगळं तो शांतपणे बाजूला ठेवत जातो. कधी त्याच्या शर्टाची कॉलर झिजलेली असते, कधी चप्पल तुटलेली असते, कधी चष्म्याची फ्रेम जुनी झालेली असते. पण नवीन वस्तू घेण्याचा विषय निघाला की त्याचा पहिला प्रश्न नेहमी एकच असतो, माझ्या मुलांना काही हवं आहे का.? त्याला त्याचा वाढदिवस साजरा करण्याची सवय नसते, आणि आवडही नसते. स्वतःसाठी भेटवस्तू मागण्याची इच्छा आणि हिंमत ही नसते. स्वतःच कौतुक ऐकण्याची अपेक्षा नसते. कारण त्याने आयुष्यभर जबाबदाऱ्यांवर प्रेम केलं असतं, अधिकारांवर नाही. कधी कधी तो थकतोही. खूप थकतो. पण त्याच्या थकव्याला वाचा नसतात. कारण त्याला शिकवलं गेलेलं असतं की पुरुषांनी रडायचं नसतं. त्यामुळे डोळ्यांत साचलेलं पाणी तो अनेकदा हसण्यात लपवतो आणि उरातील काळजी शांत एकांतात गिळून टाकतो.
मुलं मोठी होतात, आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात. त्यांच्या यशाच्या कथा रंगू लागतात. त्या कथांमध्ये अनेकदा बापाचं नाव नसतं. पण त्या प्रत्येक यशाच्या पायथ्याशी त्याच्या त्यागाची माती मिसळलेली असते.
आणि मग एक दिवस अचानक जाणवतं की घरातला तो खंबीर आधार आता थकायला लागला आहे. चालण्याचा वेग मंदावला आहे. केसांवरची पांढरट चांदी आता भरपूर वाढली आहे. आवाजातला दम कमी झाला आहे. तेव्हा समजतं की जो माणूस आपल्यासाठी आयुष्यभर पर्वतासारखा उभा होता, तोही खरंतर हाडामांसाचाच होता.
बाप प्रेम व्यक्त करत नाही, तो प्रेम जगतो. तो काळजी बोलून दाखवत नाही, ती आपल्या कृतीतून दाखवतो. म्हणूनच कदाचित त्याचं महत्त्व उशिरा कळतं. आयुष्याच्या शेवटी जर कुणी त्याला विचारलं की, "तुझ्यासाठी तू काय कमावलंस?" तर कदाचित तो हसून आपल्या लेकरांकडे बोट दाखवेल. कारण स्वतःसाठी जगण्याची संधी त्याला फारशी मिळाली नसली, तरी आपल्या माणसांसाठी जगण्यातच त्याने संपूर्ण आयुष्याचं समाधान शोधलेलं असतं. आणि म्हणूनच बाप हा घरातील सर्वात शांत, सर्वात साधा, आणि तरीही सर्वात मोठा नायक असतो. त्याच्या त्यागाला आवाज नसतो, पण त्याच्याशिवाय कोणत्याही घराच्या सुखाची कहाणी पूर्ण होत नाही. खरंतर बापाचा कोणताही दिवस नसतोच, कारण त्या बापामुळेच आपला प्रत्येक दिवस असतो. तरीही कधी कधी एखाद्या विशेष दिवसाचं औचित्य वगैरे साधून या आपल्या बाप माणसाचं कौतुक करायला काही हरकत नसावीच ना.!🎭
#FathersDay ❤️
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂