एक कधीही न संपणारा प्रवास.... "मूव्ह ऑन" ❤️‍🩹🫂

"मूव्ह ऑन कर" हे दोन शब्द ऐकायला जितके सोपे वाटतात, तितके ते प्रत्यक्षात जगायला मात्र सोपे नसतात. लोक सहज म्हणतात, "आता विसरून जा", "पुढे बघ", "नवीन सुरुवात कर". पण आपल्या मनाला सांगितलेलं, आपलं मन प्रत्येक वेळी ऐकतंच असं नसतं. मी अनेकदा प्रयत्न केला आहे स्वतःला समजावण्याचा. स्वतःलाच सांगितलं आहे की जे गेलं ते गेलं, जे तुटलं ते तुटलं, जे मागे सुटलं, ते सुटलं. पण आठवणींचं काय..? त्या तर नकळत माझ्या मनाच्या कोपऱ्यात बसून राहतात. काही चेहरे, काही शब्द, काही क्षण आणि काही न बोललेली, तर काही बोललेली वाक्यं सतत सोबत चालत राहतात. तसं बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आत मात्र एक वेगळीच लढाई सुरू असते. प्रत्येक दिवस स्वतःला सावरण्याचा असतो आणि प्रत्येक रात्र पुन्हा जुन्या जखमांशी सामना करण्याची. लोकांना फक्त माझं हसणं दिसतं, पण त्या हास्यामागे दडलेली वेदना कुणालाच दिसत नाही. कधी कधी वाटतं की वेळ सर्व काही भरून काढते. पण काही जखमा अशा असतात की त्या भरत नाहीत, फक्त त्यांच्यासोबत जगायची सवय होते. वेदना कमी झाली असं वाटतं, पण एखादी आठवण पुन्हा सगळं ताजं करून जाते. ज्यांनी कधी मनापासून कोणाला जपलं आहे, ज्यांनी कोणासाठी स्वतःचा एक भाग गमावला आहे, त्यांनाच या फरफटीचा खरा अर्थ समजू शकतो. कारण इथे प्रश्न फक्त एखाद्या व्यक्तीला विसरण्याचा नसतो, तर त्या व्यक्तीसोबत जोडलेल्या स्वतःच्या एका भागाला मागे सोडण्याचा असतो. मी आजही चालतोय, जगतोय, हसतोय. पण याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे पुढे निघून गेलो आहे. काही प्रवास असे असतात की त्यांचा शेवट नसतो. आपण फक्त चालत राहतो, आठवणींचं ओझं घेऊन. म्हणूनच आता कुणी "मूव्ह ऑन कर" असं म्हणालं की मला राग येत नाही. कारण त्यांना माझ्या मनातलं युद्ध दिसत नाही. ते फक्त निकाल पाहतात, संघर्ष नाही. आयुष्याच्या काही कथा अशा असतात की त्यांना पूर्णविराम नसतो. त्या फक्त स्वल्पविराम घेत पुढे सरकत राहतात. आणि कधी कधी तर, त्या "एका कथेतून" बाहेर पडण्यासाठी अख्खं आयुष्यही अपुरं पडतं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट