पुन्हा सासरे बुवा..
टाळ, मृदंग आणि तबल्याची जुगलबंदी एकसारखी सुरूच होती. सोबतीला ढगांचा ढोलही ताल धरू लागला होता. या सर्वांच्या तालावर वीज आणि वारा सुसाट वेगाने बेभान होऊन नाचत होते. पावसाच्या सरीही मोठमोठ्या टपो-या थेंबांच्या साह्याने ताशा वाजवू लागली होती. आणि इकडं आत हळूहळू सगळी मंडळी भजनात दंग होऊन गेली होती. मी अधेमधे समोर एका ओळीत असलेल्या महापुरुषांच्या चित्राकडे पाहत होतो, तर कधी टाळ आणि तबल्याची नाद अनुभवत होतो. आजूबाजूला जमलेल्या मोजक्याच पण भजनात पुर्णपणे तल्लीन झालेल्यांची मुर्ती न्याहाळत होतो. समोर एकूण चार महापुरुषांची चित्रं आहेत. त्यांच्याकडे एकेक करून पाहत असताना तुझ्याशी आणि बालपणाशी निगडित एकेक गोष्टी अगदी सहज आठवून जात होत्या. पंत महाराजांच्या हातातील छडी पाहून तुझ्या आजोबांच्या हातातील आधाराची छडी आठवली. त्यांना लागूनच आणखी एक महाराज एका लाकडी खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांची ती खुर्ची पाहून आपल्या मोहरमच्या लाकडी गाड्याची आठवण आली, जो नेहमीच आपल्या गल्लीत एका दगडी भिंतीला टेकून उभा असायचा. त्यापुढील स्वामी समर्थांच्या फोटो मागील गाय वासरू आणि इतर प्राणी पाहून आपल्या परड्यातील जनावर...