वाळवी
सुट्टीचा दिवस. मनसोक्त झोप घेऊन, दहा बाराच्या सुमारास आंघोळ, त्यानंतर भरपेट जेवण वगैरे करून, अंगणात खुर्ची टाकून, मी निवांत बसून होतो. बहुतेक दोन वाजायला आले होते. आता संध्याकाळ पर्यंत काय करायचं, हे कोडं पडलं होतं. आजूबाजूला हवेच्या नाजूक झोक्यावर डुलणारी बाभळीची झाडं, चिमण्यांचा चिवचिवाट, काही अंतरावरून वाहत जाणाऱ्या गावच्या त्या नाल्याचा, अगदी सवयीचा झालेला तो उग्र दर्प आणि माझ्या विचारात हरवलेला मी. बाजूलाच ठेवलेला मोबाईल हातात घेऊन, मी सहज त्यातील नोट्स चाळू लागलो. अजूनही कित्ती काय काय लिहायचं अपुरं राहिलं आहे, ते आठवून गेलं, आणि एके ठिकाणी येऊन अचानक माझा हात थांबला. त्याची आठवण आली. आता बरेच दिवस झाले, त्याची माझी भेट झाली नव्हती. आजही सुट्टीचा दिवस त्यामुळे कोर्ट परिसरात भेट घडेलच, याची काही हमी नव्हती. म्हणून मग थेट त्याच्या घरीच जाण्याचा मी निर्णय घेतला. पण तेव्हाच हा विचार ही मनात येऊन गेला की, तो घरात नसलाच तर. पण आता काही केल्या मन ऐकत नव्हतं. थोड्याच वेळात मी त्याच्या घराचा रस्ता धरला. त्यांच घर जवळ येईल तसतसं माझं मन त्याच्या घरात डोकावून पाहत होतं. मागच्या वेळच्या भेटी...