३० जुलै, २०२३
नुकताच माझा डोळा लागला होता. तितक्यात मला एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून थोडासा सावध झालेलो मी, हे तर दररोजच आहे, असं म्हणून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात तो आवाज मला आणखीनच भेसूर व जास्त प्रमाणात ऐकू येऊ लागला. मग मात्र माझ्या मनात भितीची आणि शंकेची पाल एकत्रच चुकचुकली. कारण मी जिथं राहतो, तिथं फारतर फक्त पाळीव कुत्रीच आहेत, भटक्या कुत्र्यांची संख्या फारच कमी, जवळपास नसल्यागतच. पण आज कानावर एकसारखा पडणारा हा भेसूर आवाज वेगळाच वाटत होता. दोन दिवसांपासून रिमझिम पावसाची एकसारखी रिपरिप सुरूच होती. मस्त गारेगार वातावरणात मी उबदार वाकळ घेऊन झोपलो होतो, पण आज या कुत्र्यांनी का कुणास ठाऊक पण एकच कल्लोळ माजवला होता. म्हणून मग नेमकं झालंय तरी काय, ते पाहण्यासाठी मी नाईलाजाने अथरूणातून बाहेर पडलो. अजूनही पावसाची रिपरिप कानावर येतच होती. चुकून घरात शिरलेला आणि कुठंतरी दडून बसलेला रातकिडा त्याची ड्युटी इमानेइतबारे निभावत होता. त्यातच अधेमध्ये एखाद्या बेडकाचा येणारा आवाज तो बेडूक नेमका किती मोठा असेल, या विचाराने हैराण करून जात होता. अंथरूण सोडल्यावर पहिल्या प्रथम...