पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली माणसं

बाळा, असं नसतं रे. आपली जीभ जेव्हा चुकून आपल्याच दाताखाली सापडते, तेव्हा तक्रार करायची तरी कुणाकडे.? सर्वस्वी जबाबदार तर आपणच, बरोबर ना.? अगदी असंच कधी कधी ज्यांना आपण आपलं मानतो, सर्वस्व मानतो, तीच आपली माणसं कळत नकळत आपल्याला दुखावत असतात. पण निदान त्यांच्या सुखासाठी का होईना, आपल्याला आपल्या चेह-यावर हसू कायम ठेवावचं लागतं.!🎭 #आई_म्हणे  #आयुष्य_वगैरे 

कुलूप

बाळा, ऐक माझं. तू पुन्हा चुकतो आहेस. अरे, दरवाजा ठोठावण्याआधी आत कुणी आहे की नाही, निदान याची तरी खात्री करून घ्यायची रे.  तू कधी पासून दरवाजा ठोठावतो आहेस,  पण दरवाज्याला लावलेलं भलं मोठं कुलूप  तू का बरं दुर्लक्षित करतो आहेस.?  आपण डोळे मिटले म्हणून  सा-या जगात अंधार पसरत नाही रे. तो फक्त आपल्यापुरताच मर्यादित असतो.  अगदी तसंच जे त्रिकालाबाधित सत्य आहे,  तिकडं तू कितीही कानाडोळा केलास तरीही  परिस्थिती आहे तीच राहणार आहे.  जे आडात नाही ते पोह-यात कसं काय येईल.?  बाळा, शहाणा हो, डोळसपणे बघ.!🎭 #आई_म्हणे  #आयुष्य_वगैरे 

प्रारब्ध वगैरे

"बाबुमोशाय,  जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है.  उसे ना तो आप बदल सकते है, ना मैं.  हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है,  जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी है.  कब, कौन‌, कैसे उठेगा? ये कोई नहीं बता सकता." राजेश खन्ना यांच्या आनंद चित्रपटातील  फक्त एका डायलॉग मध्ये आपलं जगणं मरणं  सगळं काही सामावलं आहे,‌ आणि आपण  कसं जगलं पाहिजे, हे सुद्धा सांगितलं आहे.  आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आधीपासूनच प्लॅनड असतो. तो क्षण कधी आपल्याला मनासारखा वाटतो, तर कधी मनाविरुद्ध.  मग याला अनुसरून चांगलं वाईट काहीही घडलं की  अशा प्रत्येक वेळी आपण नशीबालाच जबाबदार धरत असतो. पण खरंतर हा आपला प्रारब्ध आहे,  हे आपल्या लक्षातच येत नसतं. पहा विचार करून,  एखाद्याचा अचानक  अकाली मृत्यू झाला की आपल्या जीवाला चटका बसून जातो, तर कधी कुणी, साधी ओळखपाळख नसतानाही, आपल्याला जीव लावून, आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून जातो. हे असं सगळं चांगलं वाईट उगाचच तर घडत नाही. बरोबर ना.? कुठल्यातरी जन्मातलं देणं घेणं लागत असावं आपलं त्यांच्याशी ...

टपाल

बाळा, ऐक माझं.  उगाच जीवाला लावून घेऊ नकोस. आठवतंय काय? एकदा तूच तर म्हणाला होतास की,  "खरंतर पत्रांचीच दुनिया बरी होती, भावनांची जाण तेव्हा खरी होती.!" कधी कधी आपले फक्त शब्दच पोहोचतात रे, पण त्या शब्दांमागची भावना पोहोचायची मात्र राहूनच जाते.! बाळा, Text message पाठवत असताना  आपल्या रडण्याला काहीच अर्थ नसतो.‌‌  कारण फक्त मेसेजच send होतो,  आणि मोबाईलच्या स्क्रीनवर पडलेला अश्रूंचा थेंब,  तिथल्या तिथेच आपल्या नजरेसमोर हरवून जातो.!🎭 #आई_म्हणे  #आयुष्य_वगैरे 

कॅलेंडर

घरी काही किरकोळ वादविवाद वगैरे झाले, किंवा माझा सख्खा काका नेहमीप्रमाणे दारू पिऊन वगैरे घरी धांगडधिंगा घातला, किंवा माझ्या वडिलांशी, आजोबांशी शिवागीळ वगैरे केला की आई खूप दुःखात असायची. त्यावेळी रात्री ती सगळ्यांना जेवू घालायची, पण स्वतः मात्र उपाशीपोटी झोपायची. पुढचा दिवस उजाडला की पुन्हा सगळं काही नेहमीप्रमाणेच सुरळीत पार पडायचं. पण भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर कडे सहज नजर गेली की, तिथं कालच्या तारखेला निळ्या रंगाच्या बॉलपेनने गोल गोल गोल असं भरपूर गिरवलेलं दिसायचं. तेव्हा या गोष्टी फक्त नजरेला दिसायच्या, पण त्यामागचं कारण मात्र कधीच लक्षात येत नसायचं. नंतर काही वर्षांनी एकदा सहज म्हणून आईला विचारलं असता तिनं सांगितलं, तेव्हा मला सगळं काही कळून चुकलं. पण आश्चर्य ही वाटलं की, आईचं तत्वज्ञान कित्ती साधं, सोपं, आणि सुंदर आहे. ती शक्यतो वाईटसाईट काहीच लक्षात ठेवत नाही. त्या आठवणी ती लगेचच त्याच दिवशी पुसून टाकते, आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात दररोज नव्याने करते. पण प्रत्येक वर्षाकाठी जेव्हा घरात नवीन कॅलेंडर यायचं, तेव्हा मी अगदी गुपचूप जुन्या कॅलेंडर मधे आईने अशा खोडलेल्या तारखा मोजायचो. त...

मी आणि माझा काका...

माझं नाव रिया.  मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक.  मी आणि आईबाबा वरच्या मजल्यावर राहतो.  खालच्या मजल्यावर आजी-आजोबा आणि माझा काका.!  #काका हा शब्द ऐकला की माझ्या मनात नेहमीच नुसता गोंधळ माजतो. मला माझ्या काकांबद्दल खूप कुतूहल वाटतं. माझ्या लहानपणी वगैरे मला त्यांनी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळवलं ही असेल बहुतेक, पण मला त्यातलं काहीच ठाऊक ही नाही, आणि तसं काही आठवत ही नाही. माझे आईवडील काकांशी बोलत नाहीत. काकाही आईवडिलांशी बोलत नाही. याच कारण काय ते मला तर अजिबात ठाऊक नाही. काकाच्या माघारी ही घरी कुणी काकांबद्दल बोलत असल्याचं मला आठवत नाही. खाली आजी आजोबा ही नेहमी आपापल्या नादात असतात. मी तर काकाला कधी फोनवर बोलताना ही ऐकलं नाही. कधी कधी तर माझ्या मनात विचार येऊन जातो की, बहुतेक आपला काका मूकबधिर वगैरे असावा. पण निदान काकाला पाहून तरी तसं काहीच वाटत नाही. ब-यापैकी देखणा, सावळा रंग, उंची साडेपाच फुटांपेक्षा किंचित जास्तच, भरपूर वाढलेली आणि काळी पांढरी दाढी, त्या दाढीशी अगदी तुल्यबळ स्पर्धा करणारे काळे पांढरे केस, नेहमी अंगात कुर्ता शर्ट आणि बहुतेक काकांच्या आवडत्या रंगाची...

मी... की आणखी कुणी.??

मिस्टर, आठवतंय काय हो तुम्हाला.?कधी कधी तुम्ही ना उगाचच मला प्रेमळ हाका मारत असायचा. त्यावेळी मी किचनमध्ये वगैरे किंवा इतर किरकोळ कामात मग्न असायचे.  हो.. आले आले., मी असा प्रतिसाद दिला, तरीही तुमचं ते एकसारखं हाका मारणं सुरुच असायचं. मग नाईलाजाने मी माझं ते हातातलं काम टाकून, तुमच्यासमोर येऊन उभी रहायचे. त्यावेळी हां, बोला.. काय काम आहे हो मिस्टर.?  माझ्या या प्रश्नाला तुमच्याकडे नेहमीप्रमाणेच काहीच उत्तर नसायचं. तुम्ही फक्त माझ्याकडे एकटक पाहत रहायचा, आणि काही वेळाने म्हणायचा की, काही नाही गं, सहज हाक मारत होतो. मग आपला काही वेळ तसाच हसण्यात निघून जायचा, आणि आपण पुन्हा आपापल्या कामात मग्न व्हायचो.! पण त्यावेळी मी तुमच्या समोरून निघून आले, तरीही मनाने तिथेच उभी असायची. कारण अशावेळी मला नेहमीच वाटून जायचं की, तुमच्या समोर तर मी उभी आहे, पण तुमची नजर मात्र काहीतरी वेगळंच शोधते आहे. ते नेमकं काय.!? हे मात्र मला‌ अजूनही उमगलं नाही. 🎭 #Miss_You_मिस्टर  #गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

वास्तू तथास्तु..

मिस्टर, आठवतंय का हो.?  मी तुम्हाला नेहमीच सांगायचे की, शुभ शुभ बोला हो.  उगाच चेष्टा मस्करीत ही असं वाईट वंगाळ बोलत जाऊ नका हो. पण तुम्ही माझं ते बोलणं कधीच गांभीर्याने घेत नसायचा. मिस्टर, वास्तू तथास्तु म्हणत असते हो. कित्ती वेळा समजावलं मी तुम्हाला, पण तुमचं आपलं नेहमीप्रमाणे एकच वाक्य, माणसाचे विचार हेच त्याचा वर्तमान असतात, व हे विचारच त्याचा भविष्यकाळ घडवत असतात. मिस्टर, तुम्ही अगदी सहजपणे बोलून गेलेल्या गोष्टी कित्ती पटापट घडत गेल्या हो. बहुतेक आत्तातरी तुम्हाला ही पटल असेलच की, वास्तू तथास्तु म्हणत असते.!🎭 #अडगळ  #गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔