खरं सांगायचं तर गळ्यात आधीच शेकडो पिढ्यांचे सुतळीचे तोडे बांधून फिरणाऱ्या या समाजात, माणसाने स्वतःच्या मनस्थितीनुसार लिहिणं हाच एक मोठा गुन्हा ठरवला गेलाय. पण मला त्याची पर्वा नाही. जशी मनस्थिती असेल, तसंच मी लिहित जातो. समोर कागद दिसला की मनातली जी काही तळमळ, जशी आहे तशीच्या तशी, कधी सुसाट तर कधी अगदीच संथ पण जिवंतपणे उतरवणं एवढंच मला ठाऊक आहे. आता या माझ्या लिहिण्याला कोणी निगेटिव्ह म्हणतं, कोणी पॉझिटिव्ह म्हणतं, कोणी फालतुगिरी म्हणतं, तर कुणी रिकामटेकड्याचे बिनकामी उद्योग असंही म्हणतं. कुणी कुणीतरी तर आपापल्या सिद्धांतांची मोजपट्टी लावून फुटकळ समीक्षाही करून टाकतं. कुणाला ते कमालीचं आवडतं, तर कुणाच्या सुशिक्षित, पांढरपेशा अभिरुचीला ते अजिबात आवडत नाही. परंतु मला या दोन्ही टोकांच्या माझ्या गालावर धडाधड पडणा-या थपडांशी काहीही देणंघेणं नसतं. या असल्या पोकळ शिक्क्यांनी लेखकाचं मूळ देशी संचित कधीच बदलत नसतं. आपल्याकडे ही जी एक सोकावलेली मध्यमवर्गीय अभिरुची आहे ना, तिला सगळं काही कसं अगदी गुळगुळीत, शिस्तबद्ध आणि नजरेला आणि कानाला रूचेल असं त्यांच्या सोयीचं पाहायची, ऐकायची सवय झाली आहे. थोडे जरी खरेखुरे, उघडेबंब शब्द आले की यांची संस्कृती धोक्यात येते. पण लेखक म्हणजे काही कोणाच्या दिवाणखान्यातली शोभेची बाहुली नाही, की जिने लोकांच्या आवडीनिवडीनुसारच स्वतःचे सूर लावावेत. मी लिहितो कारण मला माझं मन हलकं करायचं असतं. ही जी काही रोजची जगण्याची फरपट आहे, अवतीभवतीचा हा जो विद्रूप काळ आहे, त्यातून येणारी घुसमट कुठेतरी प्रसवली पाहिजे म्हणून मी व्यक्त होतो. हा म्हणजे माझा एक निव्वळ आत्मशोध आहे, एक प्रकारचा जगण्याचा, जगणं शोधण्याचा, जगण्याचा आनंद शोधण्याचा खटाटोप आहे. कोणाचे रंजन करण्यासाठी किंवा कोणाकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी हा प्रयत्न नाहीच मुळी. आता एखाद्याला वाटेल की, काय मुर्ख माणूस आहे हा, किती हा याचा विक्षिप्तपणा. पण हा विक्षिप्तपणा नाहीये, हा माझा खरेपणा आहे, माझा स्वभाव आहे. मनात जे आलं ते आहे तसंच, कोणतीही रंगरंगोटी न करता आहे तसं जगासमोर मांडणं यातच खरी हिंमत असते. लोक आपापल्या पूर्वग्रहांचे चष्मे लावून तुमच्या लेखनाचे अर्थ लावत बसतात. ज्याचा चष्मा जसा, त्याला तसा रंग दिसणार. त्यामुळे, जग काय म्हणतं याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहणं हेच लेखकाचं खरं कर्तव्य ठरतं. मन हलकं करण्यासाठी लिहिलेली एक साधी ओळही, एखाद्या पुरस्कारप्राप्त जाडजूड कादंबरीपेक्षा कैक पटीने श्रेष्ठ असते. कारण तिच्यात जिवंत माणसाच्या रक्ताचा आणि कष्टाचा वास असतो, पोकळ शब्दांचा बडेजाव नसतो. म्हणून जमेल तसं व्यक्त होत रहावं, आपल्याच अटींवर, आपल्याच भाषेत.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂