या जगाचा एक नियम आहे, माणसाला स्वतःचं मन वाचता येत नाही आणि समोरच्याला ते कधी कळत नाही. तिने मला जेव्हा तो प्रश्न विचारला ना, तेव्हा काही क्षणांसाठी माझा श्वास काळजात अडकून पडल्यासारखं वाटलं मला. तिचा तो प्रश्न अगदी साधा होता, असा कसा रे तू..? वर्षानुवर्षे इतका कसा काय अगदी साचेबद्ध जगत आला आहेस..? तुझी काही स्वप्नं, महत्त्वाकांक्षा वगैरे आहेत की नाही रे..? हा प्रश्न ऐकताना चेहऱ्यावर हसू आणणं, हे या जगातलं सगळ्यात कठीण काम असावं. माणूस स्वतःचे अश्रू लपवू शकतो, पण स्वतःची शून्य अवस्था लपवू शकत नाही. माझी नेमकी तीच अवस्था झाली होती.
मी किती दुर्दैवी ना..? ज्या व्यक्तीला मी माझ्या जगण्याचं केंद्र मानलं, जिच्या अस्तित्वाभोवती माझ्या आयुष्याचा आख्खा परिघ फिरत राहिला, तीच मला माझ्या महत्त्वाकांक्षेबद्दल विचारत होती. ज्या डोळ्यांत मी माझं संपूर्ण आयुष्य पाहिलं, त्याच डोळ्यांना माझ्यातली स्वप्नं दिसली नाहीत.
माझं चुकलं कुठे..? मी तिलाच माझं एकमेव स्वप्न मानलं, हीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली काय..? तिला वाटलं की मी साचेबद्ध जगतोय. सकाळी उठणे, कामावर जाणे, संध्याकाळी परतणे हा दिनक्रम तिला साचेबद्ध वाटला. पण तिला कसं सांगू की, या रोजच्या रहाटगाडग्यातून तावूनसुलाखून निघताना, माझं मन फक्त तिच्या एका सुहास्य चेहऱ्यासाठी धडपडत होतं. माझी महत्त्वाकांक्षा काय होती..? तर तिच्या आयुष्यातला प्रत्येक कठीण प्रसंग सोपा करणे. माझं स्वप्न काय होतं..? तर तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही सुटू नये, एवढंच. पण प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी जास्त झाली की लोकांना तिची किंमत उरत नाही. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना, तसंच काहीसं होतं हे.
मी तिच्यासाठी उपलब्ध राहिलो, म्हणून मी साचेबद्ध झालो. मी तिच्या सुखाचा विचार केला, म्हणून मी महत्त्वाकांक्षाहीन झालो. कधी कधी वाटतं, माणसाने स्वतःसाठी जगावं. पण ज्याला स्वतःची वेगळी ओळखच निर्माण करायची नव्हती, ज्याला फक्त कुणाच्या तरी हसण्याचं कारण व्हायचं होतं, त्याने आता कुठे जावं..? तिच्या या प्रश्नाने मला आरशासमोर उभं केलं. पण त्या आरशात मला माझा चेहराच दिसला नाही, कारण तिथेही तिचीच प्रतिमा उमटली होती. तिच्या या प्रश्नावर मी गप्प राहिलो. कारण काही प्रश्नांची उत्तरं नसतात, आणि असली तरी ती शब्दांत मांडता येत नाहीत.
काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशी भांडताही येत नाही आणि ज्यांच्याशिवाय जगताही येत नाही. तिला वाटलं मी गप्प बसलो कारण माझ्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. पण तिला काय माहीत, मी त्या क्षणी माझ्या आतल्या आत कोसळत चाललेल्या एका साम्राज्याचा शांत प्रेक्षक होतो. माझं ते साम्राज्य, ती स्वतःच होती. आजवर वाटायचं की प्रेम माणसाला पूर्ण करतं. पण आज कळलं, अतिप्रेम माणसाला इतकं रिकामं करून टाकतं की, समोरचा माणूस जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करतो, तेव्हा तुमच्याकडे स्वतःचा बचाव करायला साधे शब्दही उरत नाहीत.
तिने विचारलेली ती स्वप्नं, त्या महत्त्वाकांक्षा... आता मी कुठून आणू..? माझं जे काही होतं, ते तर तिच्याच नावावर लिहून मोकळा झालो होतो ना मी..! आता शिल्लक उरला आहे तो फक्त हा कोरडा साचा, आणि त्यात कोंडलेला फक्त आणि फक्त तिच्याचसाठी वेडा असणारा एक श्वास.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂