रात्र झालीय.. आजूबाजूला थोडाफार उजेड आहे.. आज का कुणास ठाऊक, पण अधूनमधून कानावर पडणारी रातकिड्यांची किरकिर मला फार भयावह वाटते आहे.. आणि मी माझ्या पायला बांधलेल्या एका दोरीकडे पाहण्यात हरवून गेलेली आहे. होय, मी माधुरी. लोक मला प्रेमाने, श्रद्धेने महादेवी म्हणतात. काल मध्यरात्री माझं कोल्हापुरात, माझ्या जुन्या नांदणी मठात परत स्वागत झालं. फुलांचा वर्षाव झाला, आरत्या ओवाळल्या गेल्या, फटाके वाजले आणि शेकडो लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. माणसांचा हा उत्सव पाहून मला एकाच वेळी हसूही येत होतं आणि डोळ्यांतलं पाणी लपवावंसंही वाटत होतं. कारण या माणसांना वाटतंय की माझी घरवापसी वगैरे झाली आहे, पण मला माहिती आहे की माझं पुन्हा एकदा भयाण बंदीवासात आणि पर्यायाने जीवघेण्या एकाकी आयुष्यात रूपांतर झालं आहे.
वनतारा मध्ये जाण्यापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं..? तब्बल तीन दशकं मी एकाच सिमेंटच्या गोठ्यात, एका जागी साखळदंडाने बांधलेली उभी होते. पायात किरकोळ जखमा, वेदनांनी शरीर पोखरलं होतं. सणासुदीला, मिरवणुकीत पाठीवर अंबाऱ्या ठेवून चालताना माणसांना फक्त माझं वैभव दिसत होतं, पण माझ्या मनाला शरीराला होणा-या अदृश्य वेदना मात्र कोणालाही दिसत नव्हत्या. मी एक जिवंत प्राणी असूनही त्या मठात केवळ एक धार्मिक वस्तू बनून राहिले होते. एकाकीपण काय असतं, हे मला त्या अंधाऱ्या खोलीने शिकवलं होतं. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने मला गुजरातच्या वनतारा मध्ये नेण्यात आलं. तिथं गेल्यावर पहिल्यांदा मला कळलं की, पायात साखळदंड किंवा एखादी जाडजूड दोरी बांधलेली नसणं म्हणजे काय असतं.! तिथे मातीचा स्पर्श माझ्या पायांना झाला. आजूबाजूला हिरवेगार वृक्ष, पाण्याचे मोठे तलाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारखेच इतर सवंगडी मला भेटले. तिथल्या डॉक्टरांनीही नांदणी मठाप्रमाणेच माझ्या जखमांवर मलम लावला, माझ्या पायांवर उपचार केले. पण का कुणास ठाऊक, उपचार घेत असताना इथं फार फार वेगळा अनुभव येत होता, मनाला पर्यायाने शरीराला फार फार बरं वाटत होतं. मोकळं आकाश कसं असतं आणि हवेतली झुळूक अंगावर घेताना किती आनंद होतो, हे मला तिथे उमगलं. मी विसरूनच गेले होते की निसर्गाने मला जंगलाचा राजा बनवलं आहे, माणसांच्या मठातली शोभेची बाहुली नाही. तिथला तो बदल मला हवाहवासा वाटत होता, कारण तिथं माझ्या अस्तित्वाला आदर होता, वासना नव्हती.
पण माणसाचं मन फार विचित्र असतं. त्याला दुसऱ्याचं सुख बघवत नाही, विशेषतः तेव्हा, जेव्हा त्या सुखावर त्याचा ताबा नसतो. मी नांदणी मठात सुखी नव्हते असं काही नाही, पण आता मात्र मला इथं वनतारा मध्येच राहावंसं वाटू लागलं होतं. पण माझ्या या मनस्थितीची, माझ्या मताशी कोणालाही काहीही देणंघेणं नव्हतं. मग राजकारण म्हणा किंवा आणखी काही म्हणा, मला त्या मोकळ्या वातावरणातून पुन्हा त्या बंदीवासात आणण्यासाठी इकडे कोल्हापुरात आंदोलने सुरू झाली. मोर्चे निघाले, उपोषणं झाली. कुणी याला अस्मितेचा प्रश्न बनवला, तर कुणी याला राजकीय रंग दिला, तर कुणी याला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव म्हणून मोकळं झालं. मला माणसासारखं बोलता येत नसल्याने मी हा सगळा पोरखेळ शांतपणे पाहत होते. आमची हत्तीण आम्हाला परत द्या, म्हणून घोषणाबाजी ही झाली. मला सांगा, मी तुमची मालमत्ता कधीपासून झाले..? निसर्गाने मला जन्माला घालताना तुमच्या नावाचा सातबारा माझ्या कपाळावर लिहिला होता का..?
तब्बल ४०९ दिवसांनंतर कोर्टाच्या आणि कमिटीच्या आदेशाने मला परत आणण्यात आलं. राजकारण्यांनी याचे श्रेय लाटायला सुरुवात केली. मठात माझ्यासाठी स्विमिंग पूल बांधला, सोयी केल्या असं सांगितलं जातंय. पण खरं सांगू..? त्या सोयी माझ्या सुखासाठी नाही, तर माणसांनी स्वतःचा हट्ट पूर्ण केल्याच्या समाधानासाठी आणि दाखवण्यासाठी केल्या आहेत. खरंच... जर मला बोलता आलं असतं, तर मी त्या मिरवणुकीत, त्या गर्दीत ओरडून विचारलं असतं की, का आणलंत मला परत..? तुमच्या देवाच्या दर्शनाला माझ्या पायातल्या बेड्यांची गरज का लागते..? तुमची भक्ती माझ्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी कशी आणि कधी झाली..? पण मी बोलू शकत नाही. मी मुकी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा गुपचूप उभी आहे. पाठीवर फुलांचा वर्षाव झेलत, पायात पुन्हा तोच अदृश्य धागा बांधून. माणसाने मला मठाची #महादेवी तर बनवलं, पण माझं हत्ती असण्याचं जिवंतपण , मला हवंहवंसं वाटणारं माझं स्वातंत्र्य मात्र कायमचं हिरावून घेतलं.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂