आईबापाची माया

साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या की, कोणतंही आईबाप कधीच आपल्या मुलाबाळांचं वाईट चिंतत नाहीत. पण दुर्दैवं हे की मुलं ही गोष्ट कधीच लक्षात घेत नाहीत. मला दोन मुली आणि एक मुलगा. माझं मुलींवर प्रेम नव्हतं आणि नाही, असं काही नाही. पण त्या दोघींच्या पाठीवर हा जन्माला आला होता, त्यामुळे याच्यावर विशेष जीव होता. पण यानं मात्र कधीच आमचं ऐकलं नाही. पण मुली मात्र आधीपासूनच समजूतदार आणि प्रापंचिक होत्या. नीट राहिल्या, चांगलं शिकल्या आणि कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पुर्ण करुन एक पोलिसांत भरती झालीय, तर एक इंजिनिअर झालीय. पण पोरगा मात्र नेहमीच सगळ्या गोष्टीत मागं राहिला. तरीही आम्ही आईबापानी आशा सोडली नव्हती, आणि प्रयत्न करतच होतो. आपल्या मुलींप्रमाणे आपल्या मुलाचं ही चांगलं रुटीन बसवून द्यावं, असं आम्हाला सतत वाटत होतं. आज ना उद्या कुठंतरी पैसे देऊन तरी याला कुठंतरी चिकटवू आणि याच्या आयुष्याच्या भाकरीची सोय करू, यासाठी आम्ही हळूहळू जमेल तसं एकेक नोट साठवून, फक्त आमच्या झोपायच्या गादीखालीच अडीच लाख रुपये साठवलं होतं. आमचं पोरगं अंगापिंडाने तसं अगदी मजबूत होतं, पण शाळेत वगैरे कधीच नीट लक्ष न दिल्यामुळे सगळं अवघड झालं होतं. आम्हां आईबापांना नेहमीच वाटायचं की, पोरींना शाळा शिकवून काय उपयोग? त्या तर आज ना उद्या सासरी निघून जाणार. तरीही आम्ही त्यांना भरपूर शिकवलं, आणि त्या सत्कर्माची चांगली फळं आत्ता भोगतो आहे. आम्ही जर पोरींना शिकवलं नसतं, तर आम्ही आमच्या जिल्ह्याची हद्द ही कधी ओलांडली नसती. पण आता पोरींनी नाव काढल्यामुळे वरचेवर सारखं मुंबईला येणं जाणं होतं. तिथं तरी पोरीनं असा फ्लॅट घेतला आहे की, चारी बाजूला फक्त गार्डनच गार्डन आहे. बघावं तेव्हा तिथं चार पाच कामगार साफसफाई करतच असतात. पोरगीच ट्रॅव्हल्सच तिकीट बुक करती, न्यायला ही येती, आल्या आल्या धावत येऊन गळ्यात पडती, जाताना डोळ्यांत पाणी आणती. पण साहेब, हे सगळं काही आनंदाश्रू वगैरे. सगळं चांगलं सुरू आहे साहेब. चांगलं दिवस आल्यात, आणि त्या सासरी जाऊनही अजूनही आमचा सगळा प्रपंच पाहण्यात हातभार लावत आहेत. त्यांच्या एकुलत्या एका लहान भावाला ही चांगलं सांभाळलं आहे. कधी कधी वाटतं की, आम्ही जर पोरींना शिकवलं नसतं आणि त्यांनीही जिद्दीने, कष्टाने शिक्षण पूर्ण केलं नसतं, तर एक दोन एकराची पाऊस पाण्यावर अवलंबून असलेली शेती, आम्हां नवराबायकोची मजुरी, आणि आमचं चार खोल्यांचं कौलारू घर, यातच आमचं जगणं गुरफटून राहिलं असतं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट