घुसमट... ❤️
होय, मला वेडा होण्याची ही मुभा नाहीये. कारण माझं वेडेपण तिच्यासाठी तिच्या बदनामीचं निमित्त बनून जाईल. होय, मला भीती वाटते त्या क्षणाची, जेव्हा माझा माझ्या मनावरचा ताबा सुटेल आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीचे सगळे बांध फुटून जातील. जर मी खरोखरच कधीतरी वेडा झालो, तर माझ्या या बेभान ओठांवर सर्वात आधी आणि फक्त तिचेच नाव येईल. माझ्या अवखळ जिभेला मग जगाच्या चौकटींचं आणि रीतीरिवाजांचं काहीच भान उरणार नाही. मी भरचौकात, गर्दीत किंवा शांततेतही फक्त तिच्याच नावाचा जप करायला लागेन. आणि हे जग..? हे जग तर अत्यंत क्रूर आहे. जे माझ्या वेडेपणाची, माझ्या वेड्या प्रेमाची किंमत तिच्या चारित्र्याकडून वसूल करेल. माझ्या वेड्या मनातलं माझ्या सर्वात जास्त आवडीचं तिचं नाव जेव्हा समाजातील लोकांच्या कानांवर पडेल, तेव्हा ते तिच्याकडे संशयाने आणि कुत्सितपणे पाहू लागतील. आणि तिच्या निष्पाप अस्तित्वावर माझ्या वेड्या प्रेमाचे शिंतोडे उडालेले मला कधीच सहन होणार नाही. तिच्या शांत आणि सुंदर आयुष्यात माझ्यामुळे वादळ यावं, असं मला स्वप्नातही वाटत नाही. म्हणूनच, मला स्वतःला सांभाळावं लागेल, प्रत्येक क्षणी शहाणपणाचा आव आणावा लागेल. माझ्या आत भावनांचा कितीही मोठा कल्लोळ उसळला, तरी चेहऱ्यावर एक खोटं हसू ठेवून मला जगावं लागेल. माझं तिच्यावरचं प्रेम एवढं ही स्वार्थी नाही की जे तिच्या सन्मानाला ठेच पोहोचवेल. तिच्या नावाभोवती मी माझ्या मौनाचा एक मजबूत तट उभारला आहे, जेणेकरून जगाची नजर तिथपर्यंत कधीच पोहोचू नये. मला माझ्या भावनांना दाबून ठेवावं लागेल, माझ्या अश्रूंना डोळ्यांच्या कडांआडच अडवून ठेवावं लागेल. मी वेडा होऊ शकत नाही, कारण माझं शहाणं राहणंच तिच्या सुरक्षिततेची हमी आहे. मी हे दुःख, ही घुसमट आणि हा विरह हसतमुखानं सहन करेन. तिच्या नावाचं रक्षण करण्यासाठी मला आयुष्यभर या शहाणपणाचा मुखवटा घालूनच जगावं लागेल, कारण तिची बदनामी होण्यापेक्षा माझं आतल्या आत मरणं मला मंजूर आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂