बालहट्ट... ❤️‍🩹🫂

या सुट्टीच्या दिवशी मनाला इतर कामात गुंतवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण हे मन काही केल्या ऐकतच नाही. अगदी आपल्या घरातील एखाद्या लहान मुलासारखं हट्टी झालं आहे हे मन. लहान मुलाला आपण एखादी गोष्ट करू नको म्हटली की ते नेमकी तीच गोष्ट करतं, ज्या दिशेला जाऊ नको म्हणावं तिकडेच धाव घेतं. माझं मनही आज अगदी असंच काहीसं वागत आहे. मी त्याला वर्तमानात आणू पाहतोय, पण ते सारखं मागं धावतंय. या मनाच्या अशा बालिश आणि हट्टी वागण्यामुळे कधीकधी खूप त्रास होतो. एरवी सहज निघून जाणारा इनमिन चोवीस तासांचा हा दिवस आज मात्र मला एखाद्या जन्मठेपेच्या शिक्षेसारखा वाटू लागला आहे. वेळेचा एक-एक सेकंद जणू थांबल्यासारखा वाटतोय आणि ही शांतता मला खायला उठते आहे. का कुणास ठाऊक, माझ्या या वेड्या मनाला आज काय झालंय..? त्याला आजच्या वास्तवाचा विसर पडला आहे. या बालिश मनाला काळाच्या पडद्याआड गेलेल्या आणि विस्मृतीत चाललेल्या जुन्या आठवणींना कुरवाळत बसण्यातच फार सुख मिळत आहे. ज्या गोष्टी, जी माणसं आणि जे प्रसंग आता कधीच परत येणार नाहीत, त्यांच्याच विश्वात रेंगाळायला याला आवडतंय. भूतकाळाच्या पाऊलखुणा शोधत हे मन जुन्या आठवणींचे कप्पे उघडत बसले आहे. त्यातल्या काही सुखाच्या तर काही दुःखाच्या छटा पुन्हा जिवंत करत आहे. मनाला आवर घालणं किती कठीण असतं, याचा अनुभव आज मला पावलोपावली येतोय. जितकं मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तितकंच ते अधिक वेगाने भूतकाळाच्या गर्द झाडीत हरवून जातंय. कदाचित मनालाही कधीकधी थकवा येत असावा, आणि म्हणूनच ते विश्रांतीसाठी किंवा सुखाच्या शोधासाठी जुन्या आठवणींचा आसरा घेत असावं. मनाचं हे बालपण सांभाळत आजचा हा दिवस ढकलणं, हेच आता माझ्या हातात उरलं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट