एकतर्फी.. 💔

प्रेम ही संकल्पना जितकी सुंदर आहे, तितकीच ती कधीकधी जीवघेणी आणि त्रासदायक ठरू शकते, याचा अनुभव मला गेल्या कित्येक वर्षांपासून येतो आहे. माझं तिच्यावर कालही प्रेम होतं, आजही आहे आणि माझ्या श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ते तसंच राहील. कारण ते कोणत्याही अटींशिवाय आणि निस्वार्थीपणे उमललेलं माझं एक खरं भावनाविश्व होतं. पण या संपूर्ण प्रवासात एक कटू सत्य मला नेहमीच डाचत राहिलं की, माझ्या या वेड्या, अथांग प्रेमाची तिला कधी साधी जाणीवही झाली नाही, आणि त्याचं तीळमात्र कौतुकही कधी वाटलंच नाही. आता आज मी वयाच्या चाळीशीच्या उंबरठ्यावर उभा असताना, मागे वळून पाहताना जाणवतं की, या प्रदीर्घ प्रवासात मी तिला विसरण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, आणि बहुतेक माझं सारं काही इथेच तर चुकलं. तिची आठवण हाच मी माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनवला. एकतर्फी प्रेमात जे व्हायला हवं किंवा जे होतं, बहुतेक तेच माझ्यासोबत ही झालं. या माझ्या एकतर्फी अथांग वेड्या प्रेमाने मला सुखापेक्षा वेदनाच जास्त दिल्या. जेव्हा भावनांची कदर होत नाही, तेव्हा मनाची होणारी तगमग शब्दातीत असते. अनेकदा या मानसिक त्रासाला कंटाळून, नैराश्याच्या गर्तेत वाहून जाताना असं वाटायचं की, सगळं काही सोडून कुठेतरी दूर निघून जावं आणि हे निरर्थक वाटणारं जीवनच संपवून टाकावं. परंतु, आज चाळीशीत आल्यावर जेव्हा मी त्या भूतकाळाकडे आणि स्वतःकडे त्रयस्थपणे पाहतो, तेव्हा मनात एक समाधान वाटतं की, मी तसा कोणताही टोकाचा आणि चुकीचा निर्णय घेतला नाही, हे बाकी बरं झालं. कारण आत्महत्येचा किंवा स्वतःला संपवण्याचा तो विचार किती चुकीचा होता, हे आज मला पूर्णपणे उमगलं आहे. आज मला कळून चुकलंय की, सगळं सगळं काही माहीत असूनही माझ्या ज्या प्रेमाने माझ्या भावनांचा, माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या निखळ मनाचा कधी आदरच केला नाही, त्या प्रेमासाठी मी स्वतःचा अमूल्य जीव देणं हा निव्वळ मूर्खपणा ठरला असता. माझ्या त्या पवित्र आणि निस्वार्थी भावनेची, तसेच माझ्या प्राणाची किंमत समजण्याची पात्रता बहुधा तिच्याकडे कधी नव्हतीच, ही जाणीव आता मला अधिक प्रगल्भ आणि खंबीर बनवून गेली आहे..!🎭

#आयुष्य_वगैरे 🫂❤️‍🩹

लोकप्रिय पोस्ट