आयुष्यात एक वेळ अशी येते की, आपण अचानक थांबून मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की आपलं म्हणावं असं फारसं कुणीच नाही. मोजके एक-दोन मित्र, काही आठवणी आणि स्वतःशी चाललेला अखंड संवाद, एवढंच आपल्या सोबतीला उरलेलं असतं. तरुणपणी ही जाणीव फारशी टोचत नाही. कारण तेव्हा आपल्याभोवती माणसांची गर्दी असते. शिक्षण, नोकरी, गाठीभेटी, गप्पा, स्वप्नं आणि धावपळ यामध्ये एकटेपणाचा आवाज दबून जातो. पण जसजसं वय पुढे सरकतं, तसतसं माणसं आपापल्या दिशांना निघून जातात. प्रत्येक जण आपल्या संसारात, जबाबदाऱ्यांमध्ये आणि संघर्षांमध्ये गुंतून जातो. जे मित्र कधीकाळी दिवसातून अनेकदा भेटायचे, ते आता महिनोन्महिने संपर्कात नसतात. त्यांचं प्रेम कमी झालेलं नसतं, फक्त त्यांच्या आयुष्याला वेगळे केंद्रबिंदू लाभलेले असतात. आणि आपण मात्र त्यांच्या आठवणींच्या ठिकाणी उभे राहून जुन्या आवाजांचा प्रतिध्वनी ऐकत राहतो. अशा वेळी अचानक मनात एक विचार चमकून जातो की, पुढे म्हातारपणात काय.? जेव्हा शरीराची ताकद कमी होईल, नवीन नाती निर्माण करण्याची ऊर्जा उरणार नाही, आणि जुन्या नात्यांची वर्तुळं आणखी विरळ होतील, तेव्हा आपल्या सोबत कोण असेल.? ही कल्पना भयप्रद वाटते. कारण माणूस केवळ अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याने जगत नाही, त्याला साक्षीदार हवे असतात. आपल्या आनंदाचे, दुःखाचे, यशाचे, अपयशाचे आणि अस्तित्वाचे. कुणीतरी असावं, ज्याला आपण अचानक फोन करू शकू, कुणीतरी असावं ज्याला आपल्या शांततेचाही अर्थ कळेल. एकाकी म्हातारपणाची भीती ही खरंतर मृत्यूची भीती नसते, ती विस्मृतीची भीती असते. आपण जगलो, हसलो, रडलो, प्रेम केलं, नाकारले गेलो, एकटे पडलो, तरीही हार मानली नाही, झगडत राहिलो, इच्छा नसतानाही जगत राहिलो, या सगळ्याची आठवण आणि जाण ठेवणारं कुणीच उरणार नाही, या शक्यतेची ती भीती असते. परंतु कदाचित आयुष्याचं एक सत्यही यामध्ये दडलं आहे. शेवटी प्रत्येक माणूस स्वतःचाच सर्वात जवळचा सोबती असतो. बाहेरची माणसं कमी-जास्त होत राहतात, पण स्वतःची साथ टिकवणं शिकणं ही आयुष्यभराची साधना असते. असं असलं तरीही कधीकधी रात्री उशिरा मनाच्या एखाद्या कोपऱ्यात हा विचार अलगद येऊन बसतो, आपल्याला खरंच शेवटपर्यंत कुणी सोबत असेल का.? आपल्याला आपल्यासारखं जपणारं कुणी भेटेल का.? हा शोध जगत राहण्याला, जगण्याचा अर्थ शोधण्याला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत भाग पाडत राहणार.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂