काही दिवसांपूर्वी माझ्या शेजारच्या अगदी एका समवयस्क मित्राने चारचाकी वाहन खरेदी केलं. गल्लीतल्या माणसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या गोष्टीचं फार फार कौतुक वाटलं. त्याच दिवशी गल्लीतल्या बऱ्यापैकी सर्वांनी हार घालून, नारळ फोडून, नवीन वाहनाची पूजा केली. लहान मुलं गाडीभोवती आनंदाने नाचत होती. मोठी माणसं त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत होती. घरातल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच अभिमान दिसत होता. त्या क्षणी माझ्या त्या शेजारच्या मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना का कुणास ठाऊक, पण माझ्या मनाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान जाणवत होतं. खरंच... स्वप्नं पाहणं आणि ती पूर्ण करणं, यात किती मोठा आणि खडतर असा प्रवास असतो, हे फक्त तो प्रवास करणाऱ्या त्या व्यक्तीलाच चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. रात्रीची झोप गहाण ठेवावी लागते. अनेक इच्छा माराव्या लागतात. कित्येक वेळा स्वतःच्या हौशींना कुलूप लावावं लागतं. तेव्हाच कुठे एखादं स्वप्न वास्तवाच्या अंगणात उभं राहतं. माझ्या हातात आलेल्या पेढ्याकडे मी बराच वेळ पाहत राहिलो. तेवढ्यात माझ्या अंतर्मनातून कुणीतरी हळूच हाक मारली... शरदराव... अहो शरदराव... तुम्ही सुद्धा आता त्याच्या वयाचेच आहात. पण आजवर तुम्ही असं कुठलं स्वप्न पाहिलंय आणि ते सत्यात उतरवलंय, काही आठवतंय का..? हा प्रश्न साधा होता, पण उत्तर देताना मनाचा संपूर्ण इतिहास उघडावा लागत होता. मी तो पेढा मुठीत घट्ट पकडला आणि तिथून काढता पाय घेतला. माझ्या घराची पायरी गाठली. त्या पायरीवर बसून मी त्या गाडीच्या सभोवती जमलेली गर्दी पाहत बसलो, आणि नकळत माझं मन बरीच वर्षे मागे निघून गेलं. स्वप्नं म्हटलं की मला तिच्याशिवाय दुसरं काहीच आठवत नाही. नाकातला शेंबूड अंगातल्या शर्टाला पुसण्याच्या आणि ढुंगणावर फाटलेली चड्डी ठिगळं लावून वापरण्याच्या वयात मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्या वयात मला प्रेमाचा अर्थ कळत नव्हता, पण तिचं असणं, हसणं, दिसणं हेच माझ्यासाठी सर्वस्व होतं, आणि माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात नि शेवट तिला पाहूनच व्हायचा. ती दिसली नाही की कशातच मन रमायचं नाही, उगाच चिडचिड करत रहायचो. तिच्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी मी कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण नेहमीच अपयश आलं. ती समोर नसताना गोळा केलेली सगळी हिंमत ती समोर आल्या आल्या एकदमच फुस्स होऊन जायची. मी तिच्यावर प्रेम करत होतो, पण तिला माझ्या प्रेमाची कल्पनाही नव्हती. प्रेम व्यक्त करण्याइतकं धाडस माझ्याकडे कधीच नव्हतं. आणि प्रेम विसरण्याइतकं कठोर मनही नव्हतं. म्हणून मी दोन्ही गोष्टी करू शकलो नाही. फक्त वर्षानुवर्षं तिच्यावर निःशब्द प्रेम करत राहिलो. ते एकच स्वप्न उराशी घेऊन जगत राहिलो. पण प्रेम करणं आणि प्रेम मिळवणं यात खूप खूप फरक असतो, ही गोष्ट मला कधी लक्षातच आली नाही. आणि जेव्हा ती गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हा ती लग्नमंडपात बोहल्यावर उभी होती. त्या मंडपात तिच्या डोक्यावर पडणाऱ्या अक्षता दूरवर झाडाच्या आडोशाला थांबून हमसून हमसून रडत मी पाहत होतो. त्या दिवशी तिथं जमलेले लोक म्हणत होते, आज तिची एक नवीन भूमिका आणि नवीन संसार सुरू झाला. पण माझ्या आयुष्यात त्या दिवशी एक संसार सुरू झाला नव्हता, एक अख्खं आयुष्य संपलं होतं. त्या दिवसानंतर मी जगलो, पण कधीच पूर्वीसारखा जगलो नाही. काही जखमा भरून येत नाहीत. त्या फक्त आपल्या स्वभावाचा भाग बनून जातात. आजही कुणाचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहिलं की मला आनंद होतो. कारण स्वप्न पूर्ण होण्याचं सुख मला मिळालं नसलं, तरी त्याची किंमत मला माहीत आहे. आज माझ्या शेजाऱ्याच्या अंगणात चारचाकी उभी आहे. माझ्या आयुष्याच्या अंगणात मात्र अजूनही तिच्या आठवणींची सावली उभी आहे. त्याच्या हातात गाडीची चावी आहे, माझ्या हातात अजूनही न उच्चारलेले काही शब्द आहेत, जे मला फक्त नि फक्त तिच्याशीच बोलायचे होते. तो आज पेढे वाटत होता, आणि मी माझ्या मुठीत एक पेढा घट्ट पकडून, आयुष्याने अपूर्ण ठेवलेल्या स्वप्नाचा शोक करत बसलो होतो. कधी कधी वाटतं की, देव प्रत्येकाच्या वाट्याला स्वप्नं देतो. फरक इतकाच असतो की, काहींच्या स्वप्नांना पंख मिळतात, आणि काहींच्या स्वप्नांना फक्त आठवणी. बहुधा मी त्या दुसऱ्या माणसांपैकीच एक असावा. माझ्या आयुष्याचा सर्वांत मोठा पराभव हा नाही की मला ती मिळाली नाही, माझ्या आयुष्याचा सर्वांत मोठा पराभव हा आहे की तिच्यानंतर दुसरं एकही स्वप्न पाहण्याची हिंमत माझ्यात उरलीच नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂