बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६

एक कचोरी, दो समोसा... 🫂❤️‍🩹

एक कचोरी, दोन समोसा... आणि पुढे जे म्हटलं गेलं, ते ऐकून काळजात कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं झालं. गर्दीत उभं राहून, गर्दीचा भाग बनून त्या घोषणा देणं सोप्पं असतं हो, कारण गर्दीला चेहरा नसतो. पण त्या घोषणेच्या आवाजाखाली ज्यांच्या अस्तित्वाचा अक्षरशः चेंदामेंदा होतो, त्याला विचारलंय का कधी की त्यांना काय वाटतं ते..? एखाद्या पुरुषाने गुन्हा केला म्हणून संपूर्ण पुरुषजातीलाच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून द्यायचं..? हा कुठला न्याय..?

स्त्रीवर अत्याचार झाला की समाज जागा होतो, आणि व्हायलाच पाहिजे. पण म्हणून पुरुषाच्या नशिबी फक्त संशयाचा फेराच यावा..? काळ बदललाय म्हणतात, पण मला वाटतं फक्त कायद्याची आणि आरोपांची पानं बदललीत, माणसाचं मन अजूनही तिथेच अडकलंय. या तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषालाही मन असतं, तोही रडू शकतो, तोही पीडित असू शकतो, हे कटू सत्य पचवायला हा समाज आजही तयार नाही. पुरुषाच्या डोळ्यातलं पाणी म्हणजे नाटक आणि त्याच्या चेहऱ्यावरचा संताप म्हणजे क्रूरता, असा एक सोपा (गैर)समज या समाजाने बनवून टाकलाय.

लहानपणापासून एका मुलाला काय शिकवलं जातं..? रडू नकोस, तू मुलगा आहेस. खंबीर राहा. जन्माला आल्यापासून तो फक्त जबाबदाऱ्यांची ओझी वाहत असतो. कधी बापाची पत राखण्यासाठी, कधी बहिणीचं लग्न लावण्यासाठी, तर कधी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो स्वतःच्या इच्छांची होळी करत असतो. त्याचा हा त्याग, त्याचं मूक प्रेम, त्याची काळजी करण्याची ती रात्री-अपरात्री जागणारी पद्धत... हे सगळं एका घोषणेच्या आवाजात क्षणार्धात कसं काय विसरलं जातं..?

इतिहास साक्षी आहे हो, पुरुषाने नेहमीच रक्षणकर्त्याची भूमिका निभावली. पण आज स्वतःच्याच अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी त्याला पुराव्यांची गरज पडतेय. प्रेम करणारा बाप, पाठीशी उभा राहणारा भाऊ, आणि सुख-दुःखात सोबत देणारा नवरा... हे सगळे पुरुषच आहेत ना..? एकाच्या अमानवी कृत्यामुळे या सगळ्यांच्या कपाळावर अविश्वासाचा शिक्का मारणं कितपत योग्य..?

पुरुषप्रधान समाजात पुरुषालाच गृहीत धरलं जातं, ही खरी शोकांतिका आहे. त्याचं मनोगत ऐकून घ्यायला कोणाकडे वेळ नाही. कारण तो पुरुष आहे, तो सहन करेल, हीच समजूत वर्षानुवर्षे चालत आलीये. पण आता वेळ आलीये, हे ओळखण्याची की गुन्हेगाराला लिंग नसतं. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, आणि गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. शेवटी काय हो, माणुसकी जपणं महत्त्वाचं. मग तो पुरुष असो वा स्त्री. पुरुषाच्या काळजाचा तुकडाही तितकाच नाजूक असतो, फक्त तो दाखवायची सोय या समाजाने ठेवलेली नाही, एवढंच..!🎭

#आयुष्य_वगैरे 🫂❤️‍🩹

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२६

दुष्काळ... 🫂❤️‍🩹

निसर्गाची आणि सत्तेची ही वर्षानुवर्षांची युती पाहिली की माणसाच्या कल्पनाशक्तीची मर्यादाही थिटी वाटू लागते. शेतकरी सरकारला मायबाप मानतो आणि सरकार फक्त कागदावर त्याला बळीराजा म्हणून मिरवते. पण या दोन्ही शब्दांमधलं अंतर कधीही न सांधता येणारं असं आहे. दुष्काळ हा काही अचानक आभाळातून टपकणारा आणि फक्त डोळ्यांनी पाहायचा खेळ नाही, तो या काळ्या मातीतल्या माणसाच्या हाडामासाला पोखरत राहतो. पण तरीही सत्तेच्या दालनात बसलेल्यांना हा दुष्काळ म्हणजे केवळ आकड्यांची जंत्री आणि निकषांचे जंजाळ वाटते.

जेव्हा मातीची ढेकळं उन्हाने करपून जातात आणि तलाव, विहिरीं तळ गाठतात, तेव्हा बळीराजा आशेने वर पाहतो आणि नंतर मुंबई-दिल्लीकडे डोळे लावून बसतो. पण तिकडून मदतीचा हात येण्याऐवजी आधी निकषांची भलीमोठी कात्री पुढे येते. इतका पाऊस पडला पाहिजे, इतकी टक्केवारी असली पाहिजे, या गावाची पैसेवारी इतकीच आली पाहिजे, अशा अनेक तांत्रिक शब्दांच्या जंगलात शेतकऱ्याचं जगणं आणि मरणं ही हरवून जातं. स्वतःला मायबाप म्हणवून घेणाऱ्या या व्यवस्थेला आपल्याच पोराचं दुःख मोजण्यासाठी तराजू का लागतो, हा खरा प्रश्न आहे. ही क्रूर चेष्टा नाही तर दुसरं काय..? सत्तेचे पाय शेतक-याच्या बांधावर येताना नेहमीच अडखळतात. जिथं शेतकरी उघड्या आभाळाखाली शेती करतो तिथं बॅरिकेड्स लावून दुष्काळ परिस्थितीची पाहणी अन् पंचनामे केले जातात, हे या कृषीप्रधान देशाचं कित्ती मोठ्ठं दुर्दैव. 

बड्या आणि पोकळ घोषणांची भाषा जितकी सोपी आणि प्रवाही असते, तितकीच प्रत्यक्ष मदतीची कृती ही आखडती आणि कोरडी असते. निवडणुका आल्या की बळीराजाच्या नावाचा गजर होतो, त्याला देव्हाऱ्यात बसवलं जातं. निवडून सत्तेत आलो तर ७/१२ कोरा... कोरा... कोरा... अशी भंपक आणि फसवी, संधीसाधू आश्वासन दिली जातात. पण देश पोसणाऱ्या बळीराजावर संकट आल्यावर, त्याच अननदात्याच्या पदरात चार आणे टाकताना या मायबाप सरकारचा हात का थरथरतो..? तो हात इतका आखडता का होतो की शेतकऱ्याने फक्त जगण्यापुरतं आणि पुन्हा मरण्यासाठीच जिवंत राहावं, अशी व्यवस्था निर्माण केली जाते.

हा सारा एक अर्थहीन आणि पोकळ खेळ आहे, शेतकरी संकटात सापडला की त्याला मदतीची आशा दाखवून फक्त झुलवत ठेवलं जातं. वरून रुसून बसलेल्या पावसाची आणि खालून मिळणाऱ्या शासकीय मदतीची जातकुळी एकच झाली आहे, दोघेही वेळेवर कधीच येत नाहीत. शेतकरी आज केवळ एक मतदार, एक आकडा आणि निकषांच्या चौकटीत बसवला जाणारा एक मृतप्राय जीव बनून राहिला आहे. संस्कृतीच्या बाता मारणाऱ्या या समाजात, संस्कृतीचा जो मूळ निर्माता आहे, त्याचीच अशी साळसूदपणे कोंडी केली जात आहे. ही जगण्याची लढाई नसून, व्यवस्थेने शेतक-याच्या अस्तित्वाशी मांडलेला एक जीवघेणा खेळ आहे, ज्यामध्ये हरणारा पर्यायाने मरणारा हा नेहमी आधीच ठरलेला असतो.!🎭

#आयुष्य_वगैरे 🫂❤️‍🩹 

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२६

श-या दादा...‌❤️‍🩹🫂

आज गल्लीत आणखी एक नवीकोरी, चकचकीत चारचाकी दाखल झाली. गाडीचा तो अगदी काळाकुट्ट रंग आणि तिच्यावर पडलेले कोवळ्या उन्हाचे कवडसे पाहून गल्लीतल्या अनेकांच्या डोळ्यांत कुतूहल उतरलं होतं, पण माझ्या काळजात मात्र कौतुकाचा एक वेगळाच पूर आला होता. बाकी विशेष हे की, कधीकाळी माझ्या अंगाखांद्यावर यथेच्छ 'शी-सू' वगैरे केलेल्या, लहानपणी श-या दादा... श-या दादा...' या शब्दांशिवाय ज्यांचा एकही दिवस जात नव्हता, माझ्या त्या गोड, गोंडस लाडक्यांनी आज चक्क स्वतःच्या हिंमतीवर, स्वकमाईतून ती गाडी खरेदी केली आहे.

माणसाचं आणि नात्यांचं गणित कधीच रक्ताच्या चौकटीत मोजता येत नाही. रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण जी नाती आपण जगता जगता कमावतो, ती रक्तापेक्षाही जास्त गडद रंगाची होऊन जातात. हे माझे मानलेले भाऊ नि बहीण..! पण 'मानलेले' हा शब्द फक्त जगाला सांगण्यापुरता. लहानपणापासून त्यांनी मला असा काही आणि इतका जीव लावला आहे की, त्या मायेला कोणत्या एका शब्दात बांधायचं हाच मोठा प्रश्न आहे.

त्यांच्या बालपणातल्या आठवणींचा पट आजही माझ्या डोळ्यांसमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो. सकाळी झोपेतून जागं झाल्या झाल्या त्यांना त्यांच्या समोर श-या दादा हवा असायचा. सकाळचा पहिला चहा आणि रात्रीच्या जेवणाचा हरेक घासही या श-या दादाच्या सोबतीनेच. ते बालहट्ट , ती निरागस भांडणं, आणि माझ्या पाठीवर मारलेली ती लहानगी थाप, सगळं काही जसच्या तसं आठवत. आज जेव्हा त्यांनी त्या नव्या गाडीची चावी अभिमानाने माझ्या हातात ठेवली, तेव्हा त्या चावीच्या वजनापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाचं वजन मला जास्त जाणवलं. काळ किती वेगाने पुढे निघून जातो, नाही.? कालपर्यंत ज्यांना रस्ता ओलांडताना माझा हात धरावा लागायचा, आज ते आयुष्याच्या रस्त्यावर स्वतःचं स्टेअरिंग स्वतःच्या हातात घेऊन दिमाखात निघाले आहेत.

गाडीचे पूजन करताना जेव्हा हळदीकुंकवाचा पहिला टिळा लागला, तेव्हा मला जाणवलं की हे केवळ एक वाहन नाही. हे त्यांच्या अपार कष्टांचं, रात्रीचा दिवस करून मिळवलेल्या यशाचं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं एक जिवंत प्रतीक आहे. सुख हे बाजारात विकत मिळत नाही, ते अशाच काही क्षणांमध्ये गल्लीतल्या धुळीतून वाट काढत आपल्या दाराशी येऊन उभं राहतं.

माणूस मोठा होतो म्हणजे नक्की काय होतं.? तो पैशाने मोठा होतो की वयाने..? मला वाटतं, माणूस तेव्हा मोठा होतो जेव्हा तो आपल्या माणसांच्या डोळ्यांत स्वतःबद्दलचा सार्थ अभिमान पाहू शकतो. आज त्या दोघांच्या डोळ्यांत माझ्यासाठी असलेलं तेच प्रेम आणि आदर पाहून माझं मन भरून आलं होतं. नातेसंबंधांची हीच तर खरी गंमत आहे. तुम्ही त्यांना जितका जीव लावाल, त्याहून दुप्पट माया ते तुम्हाला परत करतात.

कधीकधी वाटतं, आयुष्य हे असंच असावं, छोट्या छोट्या गोष्टींतून मोठा आनंद शोधणारं. आज गल्लीत आलेली ती चारचाकी फक्त एक वस्तू नाही, तर ती एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. एका अशा प्रवासाची, जिथे स्वप्नांना पंख फुटले आहेत आणि नात्यांना अधिक घट्ट करणारी माया सोबतीला आहे. अंगाखांद्यावर खेळलेली ती लहान मुलं जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहून अशी गगनभरारी घेतात, तेव्हा पाठीशी उभा असलेला हा 'श-या दादा' जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस बनून जातो. हेच तर आहे खरं आयुष्य आहे. बरोबर ना.!? 🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

माझी वेडाबाई... ❤️‍🩹🫂

तू हे जे काही लिहित असतोस, ते लिहिणं तरी बंद कर किंवा तुझ्या लिखाणाचा गाभा तरी बदल असं मला सतत सांगणारी ती कळत नकळत स्वतःही कधी लिहू लागली, तसा प्रयत्न करू लागली हे बहुतेक तिचं तिलाही लक्षात आलं नाही. आणि या गोष्टीचं प्रत्यंतर मला तेव्हा आलं, जेव्हा तिने अगदी माझ्याच धाटणीत मला एक पत्र धाडलं. त्या पत्राची सुरुवात ही तिनं अगदी विचारपूर्वक केली होती आणि अगदी जाणीवपूर्वक ''प्रिय" असं लिहिणं टाळलं होतं, अन् शेवटही आधा अधुराच आमच्या नात्यसारखा.! असं होतं तिचं ते पत्र...

खरं सांगू तर, आजवर मी माझी स्वतःची अशी एक वेगळी दुनिया जगून घेत होते. पण जेव्हापासून तुझं लिहिणं माझ्या जगण्यात आलं, तेव्हापासून माझं सगळं भावविश्वच बदलून गेलं आहे. तुझी प्रत्येक ओळ, तुझा प्रत्येक शब्द जेव्हा जेव्हा मी वाचते, तेव्हा मला असं वाटतं की तू केवळ कागदावर लिहीत नाहीस, तर थेट माझ्या मनाच्या कोऱ्या पानावर तुझ्या भावना कोरत असतोस. तुझं ते वाचून वाचून आता माझ्याही मनात शब्दांची एक अनावर गर्दी व्हायला लागली आहे. आधी मला वाटायचं की लेखन ही फक्त तुझी कला आहे, पण आता लक्षात येतंय की ती तुझी कला नसून, तू मला लावलेला एक गोड आणि न सुटणारा लळा आहे.

तू लिहितो तेव्हा तुझ्यातला एक वेगळाच माणूस मला दिसत राहतो. तुझा तो शांतपणा, तुझी ती अगदी साधीच पण मनाला भिडणारी शब्दांची निवड आणि भावनांची ती अचूक पकड मला थक्क करून सोडते. तुझा तो वेगळा विचार करण्याचा अंदाज माझ्या मनात कुठेतरी खोलवर रुजला आहे. हे तुझं असलेलं वेड इतकं अनावर आहे की, आता मला स्वतःलाही कागद आणि पेन हातात घ्यावंसं वाटू लागलं आहे. मला सतत असं जाणवत राहतं की, ज्या प्रेमाने तू विश्वाला न्याहाळतोस आणि ते शब्दात पकडतोस, तेच प्रेम मलाही माझ्या शब्दात उतरवायचं आहे. मला नेहमी तुला सांगावंसं वाटतं की, तुझ्या या लेखनाने मला केवळ प्रभावित केलं नाही, तर माझ्या सुप्त भावनांना एक नवी वाचा दिली आहे. तुझ्याच भाषेत सांगायचे झाले तर तुझ्या या अगदीच किरकोळ अशा शब्दांची ही जादू माझ्यावर अशी काही चालली आहे की, आता मी प्रत्येक गोष्टीत तुझाच दृष्टिकोन शोधू लागले आहे.

माझ्या मनात चाललेली ही घालमेल, ही शब्दांची न संपणारी रीघ, हे दुसरं काही नसून मला तुझं आणि या शब्दांचं लागलेले वेड आहे. मी जेव्हा लिहायला घेते, तेव्हा पहिला शब्द नकळत तुझाच आठवतो. तुझी प्रेरणा घेऊन जेव्हा मी चार ओळी उतरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मला जाणीव होते की मी फक्त लिहीत नाहीये, तर मी तुझ्या शब्दप्रेमाच्या रंगात स्वतःला पूर्णपणे भिजवून घेत आहे. तुझी ही शब्दांची सावली अशीच माझ्यावर राहू दे. तुझं हे वेड माझ्या मनात असंच जिवंत राहू दे, कारण या वेडेपणातच आता मला माझा खरा आनंद आणि लिहिण्याची एक नवी ऊर्जा सापडली आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

कायमस्वरूपी... ❤️‍🩹🫂

मी नेहमीप्रमाणे घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीशी येऊन बसलोय. बाबाही आकाशवाणी सांगली केंद्र लावून ते ऐकत कुठल्यातरी तंद्रीत समाधी लावल्यासारखे खुर्चीवर बसून आहेत. आत स्वयंपाकघरात आईच्या भाकरी थापटण्याचा आवाज ऐकू येतो आहे. हळूहळू खिडकीबाहेर अंधार दाटू लागलाय आणि हातातल्या चहाच्या कपातून निघणारी वाफही हळूहळू हवेत विरून जात आहे. आणि ती हवेत विरणारी वाफ पाहत असताना मनाला वाटून गेलं की, आमचं नातंही बहुतेक या वाफे सारखंच होतं, जे आम्हा दोघांच्याही नकळत ना जाणो कधी हवेत विरून गेलं. असं अचानक आठवणीत हरवून गेलो की जीव खूप कासावीस होतो, कंठ दाटून येतो. पण.... पण ज्यांचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे अशा माणसांच्या समोर, म्हणजे आईबाबांसमोर स्वतःला असं कोसळलेलं दाखवायचं तरी कसं.? म्हणून मग हुंदका गिळून हसतमुख रहावं लागतं. पण कधीकधी मनात विचार येतो की, नक्की काय चुकलं आमचं..? प्रेम..? नाही, प्रेम तर होतंच. पण आम्हा दोघांसाठीही प्रेमाची व्याख्या वेगळी होती. माणसाला समजून घेणं सोपं असतं, पण त्याला तो आहे तसंच स्वीकारणं फार कठीण असतं. आमचंही बहुतेक काहीसं असंच झालं. ती माझ्या आयुष्यात आली ती एका मंद सुगंधी वाऱ्यासारखी, आणि अगदी जाणुनबुजून. कारण तेव्हा तिला वाटलं होतं की बहुतेक हीच ती योग्य वेळ आहे याचं आपल्यावर असलेल्या एकतर्फी प्रेमाची परतफेड करायची, याला आधार द्यायची, याला कोसळून पडण्यापासून वाचवण्याची. ती मला फक्त आधार द्यायला आली होती आणि मी मात्र मला माझं बालपणीचं प्रेम गवसलं म्हणून खूप खूप खुश होतो. तिला माझ्यामध्ये एक असा माणूस दिसत होता, ज्याच्याजवळ ती तिचं मन मोकळं करू शकेल. तिला एक 'मित्र' हवा होता. असा मित्र जो तिच्या शांततेलाही वाचा फोडेल, जो तिच्या सुखात हसेल आणि दुःखात न बोलता पाठीवर हात ठेवेल. आणि तोही कसा..? तर कायमस्वरूपी. तिच्यासाठी प्रेम म्हणजे मैत्री...‌ आणि मैत्री हेच सर्वोच्च शिखर होतं. तिला वाटायचं, जगातली सगळी नाती एका बाजूला आणि निखळ मैत्री एका बाजूला. मैत्रीत कसली बंधनं नसतात, कसले हिशोब नसतात.

पण माझा प्रॉब्लेम वेगळाच होता. मी मात्र तिच्या त्या निखळ मैत्रीच्या डोहात कधी प्रेमाचे रंग मिसळले, हे माझं मलाच समजलं नाही. कारण ते माझं पहिलं आणि एकमेव प्रेम आणि स्वप्न होतं. मला ती माझ्या आयुष्यात फक्त एक मैत्रीण म्हणून कधीच नको होती. कारण मला ठाऊक होतं की, हे शिवधनुष्य पेलणं मला कधीच जमणार नाही. मला ती माझी 'प्रेयसी' म्हणून हवी होती... अगदी कायमस्वरूपी. माझ्यासाठी तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं माझ्याकडे पाहणं, या सगळ्याचा अर्थ फक्त आणि फक्त प्रेम हाच होता. मला तिच्या आयुष्याचा केवळ एक भाग नाही, तर तिचं संपूर्ण आयुष्य व्हायचं होतं. तिच्या केसांची बट जेव्हा तिच्या गालावर यायची, तेव्हा मला ती एका मित्राच्या नजरेने बघता येत नव्हती. आणि मी तसं तिला खूप खूपदा बोलूनही दाखवलं होतं. पण ती क्षणभरासाठी लाजायची, चूप रे... चूप रे बोलायची आणि विषयांतर करून शांत व्हायची. आणि तिथेच आम्हा दोघांच्याही नकळत माझ्या अपेक्षेने जन्म घेतला होता. आम्ही दोघंही आमच्या या निनावी नात्यात स्वतःच्या जागी शंभर टक्के प्रामाणिक होतो. ती तिच्या मैत्रीत आणि मी माझ्या प्रेमात. अपेक्षा ही अशी गोष्ट आहे, जी माणसाला आतून पोखरत जाते. आमच्यातही तेच घडत गेलं. जेव्हा ती माझ्याशी दुसऱ्या कोणाबद्दल भरभरून बोलायची, तेव्हा माझा आतला प्रियकर सुळावर चढवला जायचा. आणि जेव्हा मी तिच्याकडे प्रेमाच्या हक्काने पाहायचो, तेव्हा तिच्या डोळ्यातली ती मैत्रीची निरागसता मला टोकून निघायची. तिला माझ्याकडून हक्क नको होता, विश्वास हवा होता. मला तिच्याकडून केवळ विश्वास नको होता, तर संपूर्ण समर्पण हवं होतं. आता मागे वळून पाहताना जाणवतं की, नात्यांना जेव्हा आपण नावाच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते नातं श्वास कोंडून मरायला लागतं. तिला 'मित्र' म्हणून मी हवा होतो, पण प्रियकर म्हणून मी तिच्या चौकटीत बसत नव्हतो. मला ती 'प्रेयसी' म्हणून हवी होती, पण मैत्रीण म्हणून ती माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. आम्ही एकमेकांना बदलू पाहत होतो, आणि नेमकी इथेच गल्लत झाली. तिने मला कधीच फसविलं नाही. ती सुरुवातीपासून स्पष्ट होती. मीच माझ्या मनाची समजूत घालत राहिलो की, आज नाही तर उद्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल. प्रत्येक नात्याचं एक वेगळं अस्तित्व असतं. तुम्ही जबरदस्तीने मैत्रीचं प्रेम आणि प्रेमाची मैत्री करू शकत नाही. आता आज ती तिच्या जगात सुखी आहे आणि मी माझ्या. आता सहा महिने व्हायला आलेत, पण आमचे कॉन्टॅक्ट नंबर एकमेकांकडे सेव्ह असूनही आम्ही एकमेकांना साध टेक्स्ट मेसेज ही केलेला नाही. एकमेकांची विचारपूस ही केलेली नाही. इच्छा तर फार होते, पण निर्णय दोघांनी मिळून घेतला आहे तर मग त्याची अंमलबजावणी ही काटेकोरपणे झालीच पाहिजे. किंवा ती सुद्धा अशीच माझ्यासारखीच द्विधा मनस्थितीत सापडलेली असेल आणि शेवटी काहीच न बोलता, न मेसेज करता शांत राहत असेल. पण आजही कधीकधी वाटून जातं की, जर अपेक्षा नसत्या, तर बहुतेक आम्ही आजही सोबत असू शकलो असतो काय..? याचं उत्तर कदाचित हो असेलही. पण माणसाचं मन हे अपेक्षेच्या चौकटीशिवाय जगूच शकत नाही, हेही तितकंच खरं. तिची चूक नव्हती, माझीही नव्हती. चूक फक्त वेळेची आणि आमच्या त्या 'कायमस्वरूपी' असण्याच्या हट्टाची होती.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹

🫂

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

पोट आणि खिसा...‌❤️‍🩹🫂

माणूस म्हणून जन्माला आलो, हीच मुळी पहिली चूक झाली की काय, असा संशय यायला आताशा चांगलीच जागा निर्माण झाली आहे. लहानपणापासून घरामध्ये, शाळेत आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून एकच

गोष्ट ऐकत आलो होतो की, बाबा रे, चांगलं वागावं, कुणाचं वाईट करू नये, प्रामाणिकपणा हाच खरा दागिना आहे. आपणही अगदी भोळसट आणि बावळट हे सगळं खरं मानलं. मान खाली घालून, समोर येईल त्याला नमस्कार करत, लोकांच्या सुख-दुःखात स्वतःचं काळीज ओतून चांगलं वागत राहिलो. पण या वागण्यातून शेवटी काय मिळालं, याचा हिशोब मांडायला बसलो की फक्त आणि फक्त शून्य हाती लागतो.

खरंतर सत्य हेच आहे की, या जगात फक्त चांगलं असण्याला आणि चांगलं वागण्याला कवडीचीही किंमत नाही. तुमच्याकडे जर व्यवहारीक धूर्तपणा नसेल, तर हे जग तुम्हाला अक्षरशः चघळून थुंकून टाकायला टपलेलं असतं. निव्वळ चांगुलपणाने माणसाचं पोट भरत नाही, उलट भुकेच्या वेळी तो चांगुलपणाच तुम्हाला अधिक लाचार बनवतो. रोज सकाळी उठून ज्या समाजात आपल्याला वावरावं लागतं, तो समाज नैतीकतेच्या गप्पा मारण्यात फार पटाईत आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्याला पैशाची, सत्तेची आणि स्वार्थाचीच भाषा कळते. तुम्ही किती प्रामाणिक आहात, याने किराणा मालाच्या दुकानातलं बिल चुकतं होत नाही. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे घरचं रेशन भरलं जात नाही की बँकेचा हप्ता कमी होत नाही.

ज्याला आपण आज मॅच्युरिटी किंवा शहाणपण म्हणतो, ते दुसरं तिसरं काही नसून या निष्ठुर वास्तवाचा स्वीकार करणं आहे. हा स्वीकार करताना मनाला एक प्रकारची भयंकर शिसारी येते, पण नाईलाजाने ती सहन करावीच लागते. आजूबाजूला पाहिलं की लक्षात येतं, जी माणसं कधीकाळी लायकीची नव्हती, ज्यांना कधी नीतिमत्तेचा स्पर्शही झाला नाही, ती आज सुखात लोळतायत. आणि आपण मात्र आपल्याच चांगुलपणाच्या चौकटीत अडकून, एक ना एक सगळं काही नक्कीच चांगलं होईल या भाबड्या आशेवर जगत राहिलो. चांगुलपणाचा हा मुखवटा आता इतका जड झाला आहे की, तो उतरवून फेकून द्यावासा वाटतो.

जगाच्या या बाजारात प्रत्येकजण आपापली किंमत लावून बसला आहे. तिथे तुम्ही स्वतःला फुकटच्या चांगुलपणाने विकायला गेलात, तर लोक तुम्हाला गृहीत धरतात, तुमचा वापर करून घेतात आणि काम झाल्यावर कचऱ्यासारखं फेकून देतात. केवळ चांगलं वागून पोट भरत असतं, तर आज जगातले सगळे सज्जन लोक सर्वात श्रीमंत आणि समाधानी असते. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. पोट भरण्यासाठी, या जगात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माणसाला कधीतरी आपली नखं बाहेर काढावेच लागतात. क्रूर व्हावं लागतं असं नाही, पण निदान स्वतःचा स्वार्थ ओळखण्याइतपत तरी शहाणं व्हावं लागतं.

हा जो काही उशिरा आलेला साक्षात्कार आहे, तो आतून पोखरून काढणारा असला तरी अत्यंत गरजेचा आहे. आता मला कुणाचंही कौतुक नको आहे आणि कुणाकडून खूप चांगला माणूस आहे हे प्रमाणपत्रही नको आहे. कारण आता कळून चुकलं आहे की, हे प्रमाणपत्र घेऊन कुठल्याही हॉटेलमध्ये जेवण मिळत नाही. जगण्याच्या या लढाईत शेवटी पोट आणि खिसाच तुमच्या पाठीशी उभा राहतो, तुमची तत्त्वं किंवा तुमचा चांगुलपणा नाही. आता स्वतःला या भाबडेपणाच्या चौकटीतून बाहेर काढायचंय. कारण, शेवटी स्वतःचं पोट भरल्याशिवाय जगाला तत्त्वज्ञान सांगण्यात काहीच अर्थ नसतो, हेच खरं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂


शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

यंत्रवत मानवी जीवन... ❤️‍🩹🫂

आयफोनच्या या लखलखत्या काचांमागून आणि चकचकीत शोरूमच्या दारातून बाहेर पडलेली ही रांग म्हणजे आपल्या सामूहिक मानसिक दिवाळखोरीचं ढळढळीत प्रदर्शन आहे. ही रांग पाहिल्यावर मला एकाएकी माझ्या लहानपणीच्या त्या सरकारी रेशन दुकानाचा उग्र, कोंदट वास आला. त्या काळाची आणि आजची तुलना करताना मन फार‌ कासावीस होऊन जातं. रेशनच्या दुकानातली ती रांग जगण्याच्या आदिम, नग्न संघर्षातून निर्माण झाली होती. तिथे पोटाची भूक होती, गरीबीची लाचार हतबलता होती. पण आजची ही नवश्रीमंतांची रांग..? ही तर चंगळवादाने सडलेल्या मेंदूंची आणि आत्मसन्मान हरवून बसलेल्यांची स्टेटस नावाच्या भुताने झपाटलेली रांग आहे..! काय लायकी आहे आपली..? हा निव्वळ देशी संस्कृतीचा पोकळपणा आणि पाश्चात्त्य बाजारपेठेने आपल्या गळ्यात मारलेला एक महागडा गळफास आहे. कालपर्यंत जे रेशनकार्ड आमच्या जगण्याचा आधार होतं, त्याची जागा आज या दीड लाख रुपयांच्या काचेच्या तुकड्याने घेतली आहे. त्या काळी दुकानदार वजन कमी भरेल का, रॉकेल व्यवस्थित देईल का, म्हणून आम्ही डोळ्यात तेल घालून उभे असायचो. आज ही सुटाबुटातली इंग्रजाळलेली पिढी कॉर्पोरेट मालकांच्या दारात, माझ्या रंगाचा आणि जीबीचा मॉडेल संपणार तर नाही ना..? या भीतीने लाळ गाळत उभी आहे त्या बर्गंडी रंगाने तर काय वेडच लावलं आहे म्हणं. इथं यांच्या बरगड्या दिसू लागल्या त्याचं मात्र काहीच सुख दुःख नाही. दोन्ही रांगांमधली हतबलता सारखीच आहे, पण आजची हतबलता अधिक किळसवाणी आहे कारण ती विकत घेतलेली गुलामी आहे. ज्या देशात आजही कित्येक शेतकरी निसर्गाच्या आणि कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून फाशी घेतायत, लाखो पोरांना कुपोषणानं ग्रासलंय, कोट्यवधी लोकं मोफत धान्य घेऊन आपलं जगणं जगत आहेत, त्याच देशातल्या महानगरांमध्ये एका फोनसाठी फुटपाथवर रात्र काढणारी ही पिढी पाहिली की आपल्या तथाकथित प्रगतीची शिसारी येते. ही पोरं फोन विकत घेत नाहीयेत, तर स्वतःचं उरलंसुरलं माणूसपण आणि विवेक त्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या गल्ल्यात जमा करतायत. तंत्रज्ञानाच्या नावाखाली चाललेला हा नवा सांस्कृतिक आणि आर्थिक सुळसुळाट आपल्याला कोणत्या थराला घेऊन जाणार..? रेशनच्या रांगेत किमान भुकेची प्रामाणिकता होती, पण या आयफोनच्या रांगेत फक्त आणि फक्त दिखाऊपणाची, सुखाभासाची नग्न स्पर्धा आहे. आपण जगणं विसरून फक्त उपभोगवादी यंत्र बनलोय, हेच या लांबच लांब रांगेचं अंतिम आणि कटू सत्य आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

नातं जन्मांतराचं... ❤️‍🩹🫂

माझं हे असं चाललेलं असतं सतत. शब्दांच्या मागे धावणं आणि त्यांच्यातच अडकून पडणं. माझ्या आजूबाजूची माणसं म्हणत असतात की, काय हा याचा वेडेपणा. उगाच काहीतरी लिहित असतो, गंभीरपणे विचारलं तर सारे काही मनाचे खेळ म्हणून मोकळा होतो. मुळात हे असले उद्योग करायचेच कशाला. पण त्यांना कसं कळावं की शब्दांसारखं या जगात दुसरं कोणतंच मूल नसतं. स्वतःच्या पोटच्या पोराचं एकवेळ ठीक आहे, ते तुमचं ऐकेल, नाहीतर बंड करून उठेल, निघून जाईल कुठेतरी हुंदडायला. पण हे शब्द..? हे शब्द एकदा कागदावर जन्माला आले, की ते कायमस्वरूपी तुमचेच होऊन जातात. ते कधी म्हातारे होत नाहीत. त्यांना कधीच मरणही येत नाही. ते तुमचं नाव घेऊन युगायुगांचा प्रवास करतच राहतात. म्हणूनच वाटतं, शब्दांसारखं निखळ, निष्पाप आणि अमर मूल या जगात दुसरं कोणतं असूच शकत नाही.

आणि लेखक..? लेखक हा या जगातील सर्वात अगतिक, पण तरीही सर्वात मोठा बाप आहे. बाप जसा आपल्या मुलाच्या पाठीशी उभा राहतो, त्याला घडवतो, त्याच्यावर संस्कार करतो, तसाच लेखक या शब्दांना संस्कारित करत असतो. आपली संस्कृती, आपली माती, आपल्या जगण्यातले सगळे ओरखडे तो त्या शब्दांच्या अंगावर कोरत राहतो. एखाद्या पोराला जशी भूक लागते, तशी या शब्दांनाही अर्थाची भूक लागते. लेखक स्वतःचं रक्त आटवून, स्वतःचं जगणं पणाला लावून त्या शब्दांना अर्थाचं अन्न भरवत असतो. हा बाप कधीकधी निष्ठुर वाटेल, कारण तो शब्दांची छाटणी करतो, त्यांना घासूनपुसून टोकदार बनवतो. पण त्यामागे त्याची एकच धडपड असते, माझं हे अपत्य या जगाच्या बाजारात टिकून राहिलं पाहिजे.

आजकालच्या या भिकारड्या, उथळ जगात लोक नुसतेच ओरडतात. शब्दांचा बाजार मांडलाय प्रत्येकाने. ज्याला त्याला वाटतं, आपण खूप बोलतोय, खूप लिहितोय. पण त्या लिहिण्यात मातीचा वास कुठाय..? त्यात ती अस्सल देशी जगण्याची वेदना कुठाय..? सगळेच जण कुठल्यातरी पाश्चात्त्य सिद्धांताची उसनवारी करून आपली दुकानदारी चालवताहेत. मला या सगळ्याचा उबग येतो कधीकधी. आपण आपल्याच भाषेची, आपल्याच संस्कृतीची इतकी प्रतारणा कशी करू शकतो..? भाषा ही काही नुसतं संवादाचं साधन नाहीये, ती आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली शिदोरी असते. ती शिदोरी नीट जपून, पुढच्या पिढीच्या हातात सुपूर्द करणं हेच तर या बापाचं, म्हणजेच लेखकाचं खरं कर्तव्य असतं.

जेव्हा मी लिहायला बसतो, तेव्हा मला माझ्या अवतीभवतीचे सगळे कोलाहल बंद झाल्यासारखे वाटतात. मला दिसतात ती फक्त ही माझी मुलं... माझे शब्द.! ते माझ्याकडे डोळे लावून बघत असतात, जणू काही विचारताहेत, बाबा, आज आम्हाला कुठल्या जगात घेऊन जाणार.? मग मी त्यांच्या अंगावरून मायेने हात फिरवतो. मग ते शब्द नुसते शब्द राहत नाहीत. ते त्यांचं खरंखुरं आयुष्य जगायला लागतात. ते रडतात, ते हसतात, ते बंड करतात. मी कदाचित उद्या नसेन, माझं हे म्हातारं होत चाललेलं शरीर थकलेले असेल, पण माझे हे शब्द, हे माझं मूल या विश्वाच्या पाठीवर कायम जिवंत राहील. हीच तर एका लेखकाची खरी कमाई असते.

या जगात बापाचं स्थान नेहमीच उपेक्षित राहिलंय. आईचं मोठेपण सगळीकडे गायलं जातं, आणि ते अगदी योग्यच आहे. पण बापाचं ते आतल्या आत जळणं, त्याचं ते मूकपणे कुटुंबाला सावरणं कोणाला दिसत नाही. लेखकही असाच असतो. तो समाजाच्या सगळ्या जखमा आपल्या छातीवर झेलतो, आतल्या आत कुढतो, पण जगासमोर आणतो ते फक्त त्याचे शब्द. हे शब्द म्हणजेच त्याचं अपत्य, जे त्याच्या नंतरही त्याचं अस्तित्व जिवंत ठेवतं. म्हणूनच मी पुन्हा म्हणेन, शब्दांसारखं दुसरं कोणतंच पवित्र मूल नाही आणि या शब्दांना जन्म देणाऱ्या लेखकासारखा दुसरा कोणताच थोर बाप नाही. हे नातं जन्मांतराचं आहे, ते कधीच तुटणार नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

होय... मी माधुरी उर्फ महादेवी बोलतेय... ❤️‍🩹🫂

रात्र झालीय..‌ आजूबाजूला थोडाफार उजेड आहे.. आज का कुणास ठाऊक, पण अधूनमधून कानावर पडणारी रातकिड्यांची किरकिर मला फार भयावह वाटते आहे.. आणि मी माझ्या पायला बांधलेल्या एका दोरीकडे पाहण्यात हरवून गेलेली आहे. होय, मी माधुरी. लोक मला प्रेमाने, श्रद्धेने महादेवी म्हणतात. काल मध्यरात्री माझं कोल्हापुरात, माझ्या जुन्या नांदणी मठात परत स्वागत झालं. फुलांचा वर्षाव झाला, आरत्या ओवाळल्या गेल्या, फटाके वाजले आणि शेकडो लोकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. माणसांचा हा उत्सव पाहून मला एकाच वेळी हसूही येत होतं आणि डोळ्यांतलं पाणी लपवावंसंही वाटत होतं. कारण या माणसांना वाटतंय की माझी घरवापसी वगैरे झाली आहे, पण मला माहिती आहे की माझं पुन्हा एकदा भयाण बंदीवासात आणि पर्यायाने जीवघेण्या एकाकी आयुष्यात रूपांतर झालं आहे.

वनतारा मध्ये जाण्यापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं..? तब्बल तीन दशकं मी एकाच सिमेंटच्या गोठ्यात, एका जागी साखळदंडाने बांधलेली उभी होते. पायात किरकोळ जखमा, वेदनांनी शरीर पोखरलं होतं. सणासुदीला, मिरवणुकीत पाठीवर अंबाऱ्या ठेवून चालताना माणसांना फक्त माझं वैभव दिसत होतं, पण माझ्या मनाला शरीराला होणा-या अदृश्य वेदना मात्र कोणालाही दिसत नव्हत्या. मी एक जिवंत प्राणी असूनही त्या मठात केवळ एक धार्मिक वस्तू बनून राहिले होते. एकाकीपण काय असतं, हे मला त्या अंधाऱ्या खोलीने शिकवलं होतं. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने मला गुजरातच्या वनतारा मध्ये नेण्यात आलं. तिथं गेल्यावर पहिल्यांदा मला कळलं की, पायात साखळदंड किंवा एखादी जाडजूड दोरी बांधलेली नसणं म्हणजे काय असतं.‌! तिथे मातीचा स्पर्श माझ्या पायांना झाला. आजूबाजूला हिरवेगार वृक्ष, पाण्याचे मोठे तलाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारखेच इतर सवंगडी मला भेटले. तिथल्या डॉक्टरांनीही नांदणी मठाप्रमाणेच माझ्या जखमांवर मलम लावला, माझ्या पायांवर उपचार केले. पण का कुणास ठाऊक, उपचार घेत असताना इथं फार फार वेगळा अनुभव येत होता, मनाला पर्यायाने शरीराला फार फार बरं वाटत होतं. मोकळं आकाश कसं असतं आणि हवेतली झुळूक अंगावर घेताना किती आनंद होतो, हे मला तिथे उमगलं. मी विसरूनच गेले होते की निसर्गाने मला जंगलाचा राजा बनवलं आहे, माणसांच्या मठातली शोभेची बाहुली नाही. तिथला तो बदल मला हवाहवासा वाटत होता, कारण तिथं माझ्या अस्तित्वाला आदर होता, वासना नव्हती.

पण माणसाचं मन फार विचित्र असतं. त्याला दुसऱ्याचं सुख बघवत नाही, विशेषतः तेव्हा, जेव्हा त्या सुखावर त्याचा ताबा नसतो. मी नांदणी मठात सुखी नव्हते असं काही नाही, पण आता मात्र मला इथं वनतारा मध्येच राहावंसं वाटू लागलं होतं. पण माझ्या या मनस्थितीची, माझ्या मताशी कोणालाही काहीही देणंघेणं नव्हतं. मग राजकारण म्हणा किंवा आणखी काही म्हणा, मला त्या मोकळ्या वातावरणातून पुन्हा त्या बंदीवासात आणण्यासाठी इकडे कोल्हापुरात आंदोलने सुरू झाली. मोर्चे निघाले, उपोषणं झाली. कुणी याला अस्मितेचा प्रश्न बनवला, तर कुणी याला राजकीय रंग दिला, तर कुणी याला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव म्हणून मोकळं झालं. मला माणसासारखं बोलता येत नसल्याने मी हा सगळा पोरखेळ शांतपणे पाहत होते. आमची हत्तीण आम्हाला परत द्या, म्हणून घोषणाबाजी ही झाली. मला सांगा, मी तुमची मालमत्ता कधीपासून झाले..? निसर्गाने मला जन्माला घालताना तुमच्या नावाचा सातबारा माझ्या कपाळावर लिहिला होता का..?

तब्बल ४०९ दिवसांनंतर कोर्टाच्या आणि कमिटीच्या आदेशाने मला परत आणण्यात आलं. राजकारण्यांनी याचे श्रेय लाटायला सुरुवात केली. मठात माझ्यासाठी स्विमिंग पूल बांधला, सोयी केल्या असं सांगितलं जातंय. पण खरं सांगू..? त्या सोयी माझ्या सुखासाठी नाही, तर माणसांनी स्वतःचा हट्ट पूर्ण केल्याच्या समाधानासाठी आणि दाखवण्यासाठी केल्या आहेत. खरंच... जर मला बोलता आलं असतं, तर मी त्या मिरवणुकीत, त्या गर्दीत ओरडून विचारलं असतं की, का आणलंत मला परत..? तुमच्या देवाच्या दर्शनाला माझ्या पायातल्या बेड्यांची गरज का लागते..? तुमची भक्ती माझ्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी कशी आणि कधी झाली..? पण मी बोलू शकत नाही. मी मुकी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा गुपचूप उभी आहे. पाठीवर फुलांचा वर्षाव झेलत, पायात पुन्हा तोच अदृश्य धागा बांधून. माणसाने मला मठाची #महादेवी तर बनवलं, पण माझं हत्ती असण्याचं जिवंतपण , मला हवंहवंसं वाटणारं माझं स्वातंत्र्य मात्र कायमचं हिरावून घेतलं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

न पाठवलेलं पत्र... ❤️‍🩹🫂

 प्रिय 🌼🌼🌼

खूप खूप प्रेम ❤️🫂

हे पत्र तुला कधी मिळेल, किंवा मी ते कधी पाठवू शकेन का, ते काय माहीत नाही. पण आज मनातली घुसमट कागदावर उतरवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून हा खटाटोप..! 

खरं सांगू... आज तुझी खूप खूप आठवण येतेय गं. माझ्या समोर मोबाईल पडलाय. त्यात तुझा नंबर सेव्ह आहे. आणि तो नंबर मी आज शेकडो वेळा पाहिला असेल, पण स्क्रीनवर बोट टेकवून 'कॉल' करण्याची हिंमत काही केल्या होत नाहीये. खरंच... तंत्रज्ञानाने माणसाला किती जवळ आणलंय ना..? बोटाच्या एका स्पर्शाने मी तुझ्याशी जोडला जाऊ शकतो. पण मनाच्या ज्या अंतरावर आपण आज जाऊन पोहोचलोय, तिथून मागे फिरणं आता केवळ अशक्य वाटतंय.

या सगळ्याला कारणीभूत आहे, आपल्यात झालेला तो अबोल्याचा करार.!

त्या दिवशी आपण दोघांनी किती सहज ठरवून टाकलं की यापुढे एकमेकांशी बोलायचं नाही. जणू काही शब्दांचे पूल तोडले की भावनांचे प्रवाह आपोआप सुकतील.! माणूस नाती तोडू शकतो, पण आठवणींना कसं विसरणार..? आणि बहुतेक म्हणूनच आज त्या कराराची आभासी पण खरीखुरी बंधनं माझ्या काळजाला अक्षरशः कापून काढत आहेत.

मला तुझ्याशी खूप खूप बोलावंसं वाटतंय. अगदी काहीही... पूर्वीसारखं निरर्थक, पण तरीही आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणारं. आज दिवसभरात काय घडलं, हवामान कसं आहे, किंवा अगदी सहज एखादा जुना विनोद... जे आपण तासनतास बोलत बसायचो. पण आता तुझ्या त्या मोबाईल नंबरकडे बघताना हाताला कंप सुटतो. हा कसला अहंकार आणि हा कसला स्वाभिमान, जो एका फोन कॉलपेक्षाही मोठा ठरतोय..?

कधी कधी मनात येतं, तूही अशीच मोबाईल हातात धरून बसली असशील का..? त्या पलीकडच्या शांततेत तुझाही श्वास कोंडत असेल का..? की तू या कराराचं पालन माझ्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणे करते आहेस..? काही वेळा संवाद संपतो, तिथेच खरी घुसमट सुरू होते.

हा अबोला म्हणजे एक प्रकारची शिक्षा आहे, जी आपण स्वतःच स्वतःला सुनावली आहे. आपण दोघंही एकाच समुद्राच्या दोन वेगवेगळ्या किनाऱ्यावर उभे आहोत. पाणी तेच आहे, लाटाही तशाच आहेत, पण मधलं अंतर कापायची हिंमत मात्र आपल्यात नाहीये.

माहिती नाही हा अबोला कधी आणि कसा संपणार. पण आज, या क्षणी, तुझी आठवण माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात दाटून आली आहे. तुला फोन करण्याचा विचार करतो, हात फोनकडे जातो, आणि अचानक मी पुन्हा हात मागे घेतो. त्या कराराच्या भिंती इतक्या उंच आणि बळकट असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं गं.

तू जिथे आहेस, तिथे सुखी असावीस आणि नक्की असशीलच. पण मनातली ही हुरहूर आणि हा न लावलेला फोन... बहुतेक माझ्या आयुष्यातील एक कायमचा अनुत्तरीत प्रश्न बनून राहणार, हे मात्र नक्की.

फक्त तुझाच...

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

माझं सर्वस्व तू..... ❤️‍🩹🫂

या जगाचा एक नियम आहे, माणसाला स्वतःचं मन वाचता येत नाही आणि समोरच्याला ते कधी कळत नाही. तिने मला जेव्हा तो प्रश्न विचारला ना, तेव्हा काही क्षणांसाठी माझा श्वास काळजात अडकून पडल्यासारखं वाटलं मला. तिचा तो प्रश्न अगदी साधा होता, असा कसा रे तू..? वर्षानुवर्षे इतका कसा काय अगदी साचेबद्ध जगत आला आहेस..? तुझी काही स्वप्नं, महत्त्वाकांक्षा वगैरे आहेत की नाही रे..? हा प्रश्न ऐकताना चेहऱ्यावर हसू आणणं, हे या जगातलं सगळ्यात कठीण काम असावं. माणूस स्वतःचे अश्रू लपवू शकतो, पण स्वतःची शून्य अवस्था लपवू शकत नाही. माझी नेमकी तीच अवस्था झाली होती.

मी किती दुर्दैवी ना..? ज्या व्यक्तीला मी माझ्या जगण्याचं केंद्र मानलं, जिच्या अस्तित्वाभोवती माझ्या आयुष्याचा आख्खा परिघ फिरत राहिला, तीच मला माझ्या महत्त्वाकांक्षेबद्दल विचारत होती. ज्या डोळ्यांत मी माझं संपूर्ण आयुष्य पाहिलं, त्याच डोळ्यांना माझ्यातली स्वप्नं दिसली नाहीत.

माझं चुकलं कुठे..? मी तिलाच माझं एकमेव स्वप्न मानलं, हीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली काय..? तिला वाटलं की मी साचेबद्ध जगतोय. सकाळी उठणे, कामावर जाणे, संध्याकाळी परतणे हा दिनक्रम तिला साचेबद्ध वाटला. पण तिला कसं सांगू की, या रोजच्या रहाटगाडग्यातून तावूनसुलाखून निघताना, माझं मन फक्त तिच्या एका सुहास्य चेहऱ्यासाठी धडपडत होतं. माझी महत्त्वाकांक्षा काय होती..? तर तिच्या आयुष्यातला प्रत्येक कठीण प्रसंग सोपा करणे. माझं स्वप्न काय होतं..? तर तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही सुटू नये, एवढंच. पण प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी जास्त झाली की लोकांना तिची किंमत उरत नाही. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना, तसंच काहीसं होतं हे. 

मी तिच्यासाठी उपलब्ध राहिलो, म्हणून मी साचेबद्ध झालो. मी तिच्या सुखाचा विचार केला, म्हणून मी महत्त्वाकांक्षाहीन झालो. कधी कधी वाटतं, माणसाने स्वतःसाठी जगावं. पण ज्याला स्वतःची वेगळी ओळखच निर्माण करायची नव्हती, ज्याला फक्त कुणाच्या तरी हसण्याचं कारण व्हायचं होतं, त्याने आता कुठे जावं..? तिच्या या प्रश्नाने मला आरशासमोर उभं केलं. पण त्या आरशात मला माझा चेहराच दिसला नाही, कारण तिथेही तिचीच प्रतिमा उमटली होती. तिच्या या प्रश्नावर मी गप्प राहिलो. कारण काही प्रश्नांची उत्तरं नसतात, आणि असली तरी ती शब्दांत मांडता येत नाहीत. 

काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशी भांडताही येत नाही आणि ज्यांच्याशिवाय जगताही येत नाही. तिला वाटलं मी गप्प बसलो कारण माझ्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. पण तिला काय माहीत, मी त्या क्षणी माझ्या आतल्या आत कोसळत चाललेल्या एका साम्राज्याचा शांत प्रेक्षक होतो. माझं ते साम्राज्य, ती स्वतःच होती. आजवर वाटायचं की प्रेम माणसाला पूर्ण करतं. पण आज कळलं, अतिप्रेम माणसाला इतकं रिकामं करून टाकतं की, समोरचा माणूस जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करतो, तेव्हा तुमच्याकडे स्वतःचा बचाव करायला साधे शब्दही उरत नाहीत. 

तिने विचारलेली ती स्वप्नं, त्या महत्त्वाकांक्षा... आता मी कुठून आणू..? माझं जे काही होतं, ते तर तिच्याच नावावर लिहून मोकळा झालो होतो ना मी..! आता शिल्लक उरला आहे तो फक्त हा कोरडा साचा, आणि त्यात कोंडलेला फक्त आणि फक्त तिच्याचसाठी वेडा असणारा एक श्वास.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

कोंडमारा... ❤️‍🩹🫂

खरं सांगू का, माणसाच्या सगळ्यात जवळ असतं ते त्याचं स्वतःचं माणूस. अगदी एका हाताच्या अंतरावर. इतकं जवळ की मनात विचार यायच्या आधी तो समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसावा. पण जेव्हा त्याच माणसाला सांगावं लागतं की, अरे, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, तेव्हा समजायचं की अंतर हाताचं नाही, तर युगांचं पडलंय. नाती ही जोडायची असतात, ओढायची नसतात. मी मात्र ती ओढत राहिलो, अगदी प्रामाणिकपणे. पण प्रामाणिकपणाचा एक नियम आहे, तो दोन्ही बाजूंनी असावा लागतो. एका बाजूने चालणारा प्रामाणिकपणा नातं टिकवू शकत नाही, तो फक्त एकतर्फी अट्टाहास ठरतो. मी माझ्या परीने या नात्यातली गुंतवणूक शंभर टक्के ठेवली. प्रेम दिलं, विश्वास दिला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा वेळ दिला. मला वाटलं होतं, शब्दांशिवाय समजेल तुला माझं मन. पण इथे तर ओरडून सांगितलेला श्वासही तुझ्या कानांपर्यंत पोहोचत नाहीये. माणूस नात्यात कधी हरतो माहितीये..? जेव्हा त्याला हक्काच्या माणसासमोरही स्वतःचा कमकुवतपणा सिद्ध करावा लागतो. 'मला त्रास होतोय' हे सांगणं म्हणजे याचक होण्यासारखं आहे. आणि प्रेमात भीक मागून मिळालेला श्वास काय कामाचा..? नाती ही मोकळा श्वास घेण्यासाठी असतात, गळा आवळण्यासाठी नाही. पण आजकाल आपली सोय इतकी महत्त्वाची झाली आहे की, बाजूच्या माणसाचा कोंडमारा पाहायला कुणाकडे वेळच नाही. मी तुला दोष देत नाहीये, कदाचित दोष माझाच आहे. मीच अपेक्षांचं एक असं जाळं विणलं, ज्यामध्ये मी स्वतःच अडकून पडलो. तुला वाटलं मी सुखात आहे, कारण मी कधी तक्रार केली नाही. पण सुखाचा आव आणणं आणि खरोखर सुखी असणं, यात फार मोठा फरक असतो. एका हाताच्या अंतरावर राहूनही जर आपण एकमेकांचे नि:श्वास ऐकू शकत नसू, तर त्या सहवासाला काय अर्थ आहे.? हा एकतर्फी प्रवास आता थांबवायला हवा, असं मन सारखं सांगत असतं. पण बुद्धी आणि मनाच्या या लढाईत नेहमी मनच हरतं. कारण मनाला नात्याची ओढ असते आणि बुद्धीला वास्तवाची जाण. मी आजही त्याच हाताच्या अंतरावर उभा आहे, या आशेने की कधीतरी तुझी नजर माझ्याकडे वळेल. पण वास्तव हेच आहे की, मी एकटाच या नात्याचा डोलारा सांभाळतो आहे. एकतर्फी नातं निभावणं म्हणजे जळत्या घरात पाण्याचा हंडा घेऊन बसण्यासारखं आहे, घर तर जळतच असतं, फक्त आपण विझवण्याचा आभास निर्माण करतो.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

आपली माणसं... ❤️‍🩹🫂

एक माणूस म्हणून जगताना आपण किती वेडे असतो ना. ज्यांना आपण अगदी जीवापाड जपतो, त्यांच्या सुखात आपलं सुख शोधत राहतो. त्यांच्या डोळ्यातलं साधं पाणीही आपल्याला सहन होत नाही, म्हणून आपण स्वतःचे डोळे कोरडे ठेवून हसायला शिकतो. त्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःच्या आनंदाचे दररोज लचके तोडत राहतो. पण गंमत बघा, एके दिवशी जेव्हा अगदी अकस्मात आपल्याभोवती गर्द गर्द काळोख पसरतो, तेव्हा आपल्याला आपण जीवापाड जपलेली, जीव लावलेली ही माणसं कुठेच दिसत नाहीत. आणि हे असं नेहमीच घडत असतं, पण आपण मात्र आपली माणसं.. आपली माणसं म्हणून दुर्लक्ष करत राहिलेले असतो. अशावेळी निराश मनात विचार येऊन जातो की, आपण ज्यांच्यासाठी काळजाचं पाणी केलं, त्यांना आपली साधी काळजी असेलच असं काही नसतं.! आपण ज्यांच्यासाठी उपलब्ध असतो, ते आपल्याला फक्त गृहीत धरत असतात. हा विचार सुरुवातीला मनाला टोचतो, काळीज चिरत जातो. आपण ज्यांच्या दुःखात धावून गेलो, ते आपल्या एकाकीपणाच्या वेळी कुठेच नाहीयेत, ही जाणीव फार त्रासदायक. माणूस समजून घेतला की जगणं सोपं होतं, आणि माणसाकडून अपेक्षा ठेवणं सोडलं की आयुष्य सुंदर होतं. खरंतर ही समज सहजासहजी आणि लवकर येत नाही, आणि जेव्हा येते तेव्हा समजून जावं की मॅच्युअर होण्याकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. ही मॅच्युरिटी म्हणजे काही वय वाढणं नव्हे, तर नात्यांचा पोकळपणा उघड्या डोळ्यांनी स्वीकारण्याचं धाडस.! मला आता राग येत नाही कोणाचा, ना कोणती तक्रार उरलीये. मी कोणासाठी काय केलं, हे महत्त्वाचं नाहीच, मी ते मनापासून केलं, हा माझा आनंद होता. समोरच्याने त्याची किंमत नाही ठेवली, हा त्याचा स्वभाव झाला. आपण कोणाच्या आयुष्यात हक्काची जागा निर्माण करू शकत नाही, जर समोरच्याला तिथे आपल्याला ठेवायचंच नसेल. बरोबर ना.!?

ऋतू बदलतात तशी माणसंही बदलतात, हे निसर्गाचं चक्र आहे. आपण मात्र हट्टाला पेटून जुन्याच पानांना झाडावर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आता मी ठरवलंय, स्वतःला जपायचं. दुसऱ्यांच्या काळजीपोटी स्वतःचा जीव जाळणं आता थांबवायचं. याचा अर्थ असा नाही की मी प्रेम करणं सोडून देईन. प्रेम तर मी करेन, पण आता त्यात अपेक्षेचा ओझं नसेल. कोणी विचारपूस केली तर ठीक, नाही केली तरी मी माझ्या आनंदात मग्न राहीन. शेवटी, आयुष्य हे स्वतःच्या अटींवर जगायचं असतं. दुसऱ्यांच्या प्रतिसादावर जर आपलं सुख अवलंबून असेल, तर आपण कधीच सुखी होऊ शकणार नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

आतला आवाज... ❤️‍🩹🫂

खरं सांगायचं तर गळ्यात आधीच शेकडो पिढ्यांचे सुतळीचे तोडे बांधून फिरणाऱ्या या समाजात, माणसाने स्वतःच्या मनस्थितीनुसार लिहिणं हाच एक मोठा गुन्हा ठरवला गेलाय. पण मला त्याची पर्वा नाही. जशी मनस्थिती असेल, तसंच मी लिहित जातो. समोर कागद दिसला की मनातली जी काही तळमळ, जशी आहे तशीच्या तशी, कधी सुसाट तर कधी अगदीच संथ पण जिवंतपणे उतरवणं एवढंच मला ठाऊक आहे. आता या माझ्या लिहिण्याला कोणी निगेटिव्ह म्हणतं, कोणी पॉझिटिव्ह म्हणतं, कोणी फालतुगिरी म्हणतं, तर कुणी रिकामटेकड्याचे बिनकामी उद्योग असंही म्हणतं. कुणी कुणीतरी तर आपापल्या सिद्धांतांची मोजपट्टी लावून फुटकळ समीक्षाही करून टाकतं. कुणाला ते कमालीचं आवडतं, तर कुणाच्या सुशिक्षित, पांढरपेशा अभिरुचीला ते अजिबात आवडत नाही. परंतु मला या दोन्ही टोकांच्या माझ्या गालावर धडाधड पडणा-या थपडांशी काहीही देणंघेणं नसतं. या असल्या पोकळ शिक्क्यांनी लेखकाचं मूळ देशी संचित कधीच बदलत नसतं. आपल्याकडे ही जी एक सोकावलेली मध्यमवर्गीय अभिरुची आहे ना, तिला सगळं काही कसं अगदी गुळगुळीत, शिस्तबद्ध आणि नजरेला आणि कानाला रूचेल असं त्यांच्या सोयीचं पाहायची, ऐकायची सवय झाली आहे. थोडे जरी खरेखुरे, उघडेबंब शब्द आले की यांची संस्कृती धोक्यात येते. पण लेखक म्हणजे काही कोणाच्या दिवाणखान्यातली शोभेची बाहुली नाही, की जिने लोकांच्या आवडीनिवडीनुसारच स्वतःचे सूर लावावेत. मी लिहितो कारण मला माझं मन हलकं करायचं असतं. ही जी काही रोजची जगण्याची फरपट आहे, अवतीभवतीचा हा जो विद्रूप काळ आहे, त्यातून येणारी घुसमट कुठेतरी प्रसवली पाहिजे म्हणून मी व्यक्त होतो. हा म्हणजे माझा एक निव्वळ आत्मशोध आहे, एक प्रकारचा जगण्याचा, जगणं शोधण्याचा, जगण्याचा आनंद शोधण्याचा खटाटोप आहे. कोणाचे रंजन करण्यासाठी किंवा कोणाकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी हा प्रयत्न नाहीच मुळी. आता एखाद्याला वाटेल की, काय मुर्ख माणूस आहे हा, किती हा याचा विक्षिप्तपणा. पण हा विक्षिप्तपणा नाहीये, हा माझा खरेपणा आहे, माझा स्वभाव आहे. मनात जे आलं ते आहे तसंच, कोणतीही रंगरंगोटी न करता आहे तसं जगासमोर मांडणं यातच खरी हिंमत असते. लोक आपापल्या पूर्वग्रहांचे चष्मे लावून तुमच्या लेखनाचे अर्थ लावत बसतात. ज्याचा चष्मा जसा, त्याला तसा रंग दिसणार. त्यामुळे, जग काय म्हणतं याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक राहणं हेच लेखकाचं खरं कर्तव्य ठरतं. मन हलकं करण्यासाठी लिहिलेली एक साधी ओळही, एखाद्या पुरस्कारप्राप्त जाडजूड कादंबरीपेक्षा कैक पटीने श्रेष्ठ असते. कारण तिच्यात जिवंत माणसाच्या रक्ताचा आणि कष्टाचा वास असतो, पोकळ शब्दांचा बडेजाव नसतो. म्हणून जमेल तसं व्यक्त होत रहावं, आपल्याच अटींवर, आपल्याच भाषेत.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

सत्य...‌आपलं‌ आपलं ❤️‍🩹🫂

वय वाढत जाईल तसं आपली बाजू योग्य असूनही वाद घालत राहण्याची इच्छा हळूहळू मरत जातेय, ही जाणीव मला आतून पोखरत नाहीये, तर शांत करत जातेय. तरुणपणी रक्ताला उसळी असायची, समोरचा चुकत असेल तर त्याचे कान उपटून, तर्कशास्त्राचे शंभर दाखले देऊन आपणच कसे बरोबर आहोत, हे सिद्ध करण्यात एक अळवावरचा आनंद असायचा. जग बदलण्याची, माणसांना सुधारण्याची एक अनाठायी घाई असायची. पण आता जशीजशी डोक्यावरची पांढरी विरळ होत चाललीय, तसतसं लक्षात यायला लागलंय की, प्रत्येक जण आपापल्या अज्ञानाचा आणि पूर्वग्रहांचा एक किल्ला लढवत असतो. मी माझा कल्ला करून त्या किल्ल्याच्या भिंती पाडू शकत नाही. समोरच्याचा मूर्खपणा हा त्याचा अधिकार आहे आणि त्यात ढवळाढवळ न करणं हेच माझं शहाणपण आहे, हे मला आता मनोमन पटलंय. माझं सत्य हे काही विश्वाचं अंतिम सत्य नाहीये, आणि समोरच्याचं असत्य हे त्याचं तात्कालिक जगणं आहे. मग उगीच शब्दांना धार लावून, गळा सुकेपर्यंत ओरडून काय साध्य होणार..? वाद जिंकून माणूस हरण्यापेक्षा, वादातून संन्यास घेऊन स्वतःची, स्वतःच्या मनाची शांतता टिकवणं आता मला जास्त सोयीचं वाटू लागलं आहे. माझ्या आजूबाजूचे लोक आता मला कदाचित थकलेला, हरलेला किंवा भित्रा वगैरे म्हणतील ही, किंवा तसं समजतील ही. पण हा माझा पराभव नाहीये, हा माझ्या जगण्यातून आलेला तुटलेपणा आहे, जो आता मला निवांतपणाकडे घेऊन जातोय. आता मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज उरलेली नाही. मी योग्य आहे, हे फक्त माझं मला माहीत असणं माझ्यासाठी पुरेसं आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

अधुरं स्वप्न... ❤️‍🩹🫂

काही दिवसांपूर्वी माझ्या शेजारच्या अगदी एका समवयस्क मित्राने चारचाकी वाहन खरेदी केलं. गल्लीतल्या माणसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या गोष्टीचं फार फार कौतुक वाटलं. त्याच दिवशी गल्लीतल्या बऱ्यापैकी सर्वांनी हार घालून, नारळ फोडून, नवीन वाहनाची पूजा केली. लहान मुलं गाडीभोवती आनंदाने नाचत होती. मोठी माणसं त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत होती. घरातल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच अभिमान दिसत होता. त्या क्षणी माझ्या त्या शेजारच्या मित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना का कुणास ठाऊक, पण माझ्या मनाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान जाणवत होतं. खरंच... स्वप्नं पाहणं आणि ती पूर्ण करणं, यात किती मोठा आणि खडतर असा प्रवास असतो, हे फक्त तो प्रवास करणाऱ्या त्या व्यक्तीलाच चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. रात्रीची झोप गहाण ठेवावी लागते. अनेक इच्छा माराव्या लागतात. कित्येक वेळा स्वतःच्या हौशींना कुलूप लावावं लागतं. तेव्हाच कुठे एखादं स्वप्न वास्तवाच्या अंगणात उभं राहतं. माझ्या हातात आलेल्या पेढ्याकडे मी बराच वेळ पाहत राहिलो. तेवढ्यात माझ्या अंतर्मनातून कुणीतरी हळूच हाक मारली... शरदराव... अहो शरदराव... तुम्ही सुद्धा आता त्याच्या वयाचेच आहात. पण आजवर तुम्ही असं कुठलं स्वप्न पाहिलंय आणि ते सत्यात उतरवलंय, काही आठवतंय का..? हा प्रश्न साधा होता, पण उत्तर देताना मनाचा संपूर्ण इतिहास उघडावा लागत होता. मी तो पेढा मुठीत घट्ट पकडला आणि तिथून काढता पाय घेतला. माझ्या घराची पायरी गाठली. त्या पायरीवर बसून मी त्या गाडीच्या सभोवती जमलेली गर्दी पाहत बसलो, आणि नकळत माझं मन बरीच वर्षे मागे निघून गेलं. स्वप्नं म्हटलं की मला तिच्याशिवाय दुसरं काहीच आठवत नाही. नाकातला शेंबूड अंगातल्या शर्टाला पुसण्याच्या आणि ढुंगणावर फाटलेली चड्डी ठिगळं लावून वापरण्याच्या वयात मी तिच्या प्रेमात पडलो होतो. त्या वयात मला प्रेमाचा अर्थ कळत नव्हता, पण तिचं असणं, हसणं, दिसणं हेच माझ्यासाठी सर्वस्व होतं, आणि माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात नि शेवट तिला पाहूनच व्हायचा. ती दिसली नाही की कशातच मन रमायचं नाही, उगाच चिडचिड करत रहायचो. तिच्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी मी कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण नेहमीच अपयश आलं. ती समोर नसताना गोळा केलेली सगळी हिंमत ती समोर आल्या आल्या एकदमच फुस्स होऊन जायची. मी तिच्यावर प्रेम करत होतो, पण तिला माझ्या प्रेमाची कल्पनाही नव्हती. प्रेम व्यक्त करण्याइतकं धाडस माझ्याकडे कधीच नव्हतं. आणि प्रेम विसरण्याइतकं कठोर मनही नव्हतं. म्हणून मी दोन्ही गोष्टी करू शकलो नाही. फक्त वर्षानुवर्षं तिच्यावर निःशब्द प्रेम करत राहिलो. ते एकच स्वप्न उराशी घेऊन जगत राहिलो. पण प्रेम करणं आणि प्रेम मिळवणं यात खूप खूप फरक असतो, ही गोष्ट मला कधी लक्षातच आली नाही. आणि जेव्हा ती गोष्ट माझ्या लक्षात आली, तेव्हा ती लग्नमंडपात बोहल्यावर उभी होती. त्या मंडपात तिच्या डोक्यावर पडणाऱ्या अक्षता दूरवर झाडाच्या आडोशाला थांबून हमसून हमसून रडत मी पाहत होतो. त्या दिवशी तिथं जमलेले लोक म्हणत होते, आज तिची एक नवीन भूमिका आणि नवीन संसार सुरू झाला. पण माझ्या आयुष्यात त्या दिवशी एक संसार सुरू झाला नव्हता, एक अख्खं आयुष्य संपलं होतं. त्या दिवसानंतर मी जगलो, पण कधीच पूर्वीसारखा जगलो नाही. काही जखमा भरून येत नाहीत. त्या फक्त आपल्या स्वभावाचा भाग बनून जातात. आजही कुणाचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहिलं की मला आनंद होतो. कारण स्वप्न पूर्ण होण्याचं सुख मला मिळालं नसलं, तरी त्याची किंमत मला माहीत आहे. आज माझ्या शेजाऱ्याच्या अंगणात चारचाकी उभी आहे. माझ्या आयुष्याच्या अंगणात मात्र अजूनही तिच्या आठवणींची सावली उभी आहे. त्याच्या हातात गाडीची चावी आहे, माझ्या हातात अजूनही न उच्चारलेले काही शब्द आहेत, जे मला फक्त नि फक्त तिच्याशीच बोलायचे होते. तो आज पेढे वाटत होता, आणि मी माझ्या मुठीत एक पेढा घट्ट पकडून, आयुष्याने अपूर्ण ठेवलेल्या स्वप्नाचा शोक करत बसलो होतो. कधी कधी वाटतं की, देव प्रत्येकाच्या वाट्याला स्वप्नं देतो. फरक इतकाच असतो की, काहींच्या स्वप्नांना पंख मिळतात, आणि काहींच्या स्वप्नांना फक्त आठवणी. बहुधा मी त्या दुसऱ्या माणसांपैकीच एक असावा. माझ्या आयुष्याचा सर्वांत मोठा पराभव हा नाही की मला ती मिळाली नाही, माझ्या आयुष्याचा सर्वांत मोठा पराभव हा आहे की तिच्यानंतर दुसरं एकही स्वप्न पाहण्याची हिंमत माझ्यात उरलीच नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

तुझी खूप आठवण येतेय गं.. ❤️‍🩹🫂

खरंतर ती माझ्या आयुष्याचा भाग नसतानाच, मी तिच्या इतका जास्त आहारी गेलो होतो की, कालांतराने ती जेव्हा खरोखरच माझ्या आयुष्याचा भाग झाली, तेव्हा माझ्याकडे मी तिला द्यावं असं काहीच उरलं नव्हतं. माझं सर्वस्व मी ती माझ्या आयुष्यात येण्याआधीच तिच्या नावावर करून बसलो होतो. माणसाने स्वतःसाठी स्वतःजवळ काहीतरी शिल्लक ठेवावं, पण प्रेमाच्या गणितात मात्र हा नियम लागू होत नाही.

जेव्हा कधी तिचा कॉल यायचा, तेव्हा मी फक्त तिला ऐकत रहायचो. तिच्या त्या बोलण्यात मी कुठेही नसायचो. तिच्या विश्वातल्या गोष्टी, तिच्या चिंता, तिचे आनंद या सगळ्यात माझा उल्लेखही नसायचा. पण तिला जे काही बोलावंसं वाटतंय, ते ती फक्त मला सांगायची, म्हणून मी ते तिचं बोलणं ऐकतच रहायचो, अगदी तासनतास. मला तिचे शब्द नाही, तर तिच्या अस्तित्वाचा तो आवाज ऐकायचा असायचा.

आणि जेव्हा कधी आमची भेट व्हायची, तेव्हा मी तिला फक्त डोळेभरून पाहत राहायचो. पाहणं आणि डोळेभरून पाहणं यात खूप फरक असतो. ती कधीच नजरेला नजर भिडवून बोलत नसायची. कदाचित तिला माझ्या नजरेतली ती अथांगता पेलवत नसावी. आणि मी मात्र फक्त तिच्या डोळ्यात टक लावून पाहत राहायचो.

माझं असं वेड्यासारखं पाहणं तिलाही जाणवायचं. तेव्हा ती हसून, थोडी सुखावून म्हणायची की, असं पाहत जाऊ नकोस रे, मला कसंतरी होतं. तिचं ते 'कसंतरी होणं' म्हणजेच तर प्रेम असतं. आणि मग लाजेने लाल होऊन ती दुसरीकडे पाहत बसायची. आणि मी..? मी पुन्हा तिच्याकडेच पाहत राहायचो.

तिच्या न पाहण्यातही मला तीच दिसायची. कधी कधी आमच्यात संवाद कमी आणि शांतताच जास्त असायची. पण ती शांतताही किती बोलकी होती, हे फक्त मलाच ठाऊक होतं. ती माझ्या आयुष्यात येऊनही मी रिकामा होतो, कारण तिला देण्यासाठी माझं 'मी'पण मी केव्हाच हरवून बसलो होतो.!🎭

#गंध_आठवणींचा #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...