एक अतिशय सामान्य #मिरजकर माणूस... जो तुमच्या माझ्या मनातले विचार मांडतो..! #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
गुरुवार, १४ मे, २०२६
काहीतरी वेगळं..
न सुटलेलं कोडं... ❤️
१४ मे,२०२१ ❤️
१४ मे २०२१. हा दिवस माझ्या आयुष्यातील एक सोनेरी पान बनून आला होता, ज्याने माझ्या आयुष्याच्या उजाड वाळवंटात सुखाची पहिली सर आणली होती. या दिवशी ती स्वतःहून माझ्या आयुष्यात आली होती, आणि बघता बघता तिच्यामुळे माझे संपूर्ण जगच बदलून गेले होते. त्यानंतरची ती दीड-दोन वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदी असा काळ होता. तेव्हा एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा आमचे बोलणे झाले नाही किंवा आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. याच वर्षीची २०२१ ची ती दिवाळी तर तिने माझ्यासाठी कायमची संस्मरणीय करून ठेवली. तेव्हा ती दिवाळीसाठी माहेरी आली होती, आणि आम्हा दोघांचं फोनवर बोलणं सुरु असतानाच अचानक तिचे वडील तिच्यासमोर आल्यावर जवळपास अर्धा पाऊण तास तिने माझ्याशी 'अहो' म्हणून बोलणं सुरूच ठेवलं होतं. त्यावेळी तिने मला 'अहो' म्हणून मारलेली ती हाक माझ्या काळजात कायमची कोरली गेली आहे. तिची ती जवळीक, ते कौतुक आणि तिचे माझ्याशी प्रेमळ, खट्याळ वागणे मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले होते. पण मला हे हवंहवंसं वाटणारं सुख इतक्या लवकर संपेल, असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कालांतराने काळाच्या ओघात सगळच बदललं, आणि तिच्या ज्या प्रेमाने मला जगवले, त्याच प्रेमाने मला अचानक एकाएकी परके करून टाकलं. तिने जाणूनबुजून, मुद्दामहून मला स्वतःपासून दूर केलं आणि नंतर तिने तशी कबुलीही दिली.
आज ती तिच्या नव्या जगात, नव्या माणसांमध्ये अगदी सुखाने आणि आनंदाने हरवून गेली आहे, आणि या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे. कारण ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली होती, तेव्हा ती खूप एकाकी पडल्याचं आणि उदास असल्याचं मला जाणवलं होतं. पण आता ती माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिला कदाचित तिने मागे सोडलेल्या वादळाची तिला पुसटशी जाणीवही नसावीच बहुतेक. पण मी? मी मात्र ती माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी जितका एकटा आणि उद्ध्वस्त होतो, आज त्याच्या कैकपटीने अधिक उद्ध्वस्त झालो आहे. मन अगदी छिन्नविच्छिन्न झाले आहे. ती माझ्या आयुष्यात आली तेव्हाची वेळ आणि आत्ताची वेळ यात तसा काहीच बदल झालेला नाहीये, पण का कुणास ठाऊक, आता मात्र सतत तिच्या बोलण्यात असुरक्षितता वाटत असल्याची जाणीव होत होती. आणि कधीकधी तर ती स्वतः तसं बोलूनही दाखवायची. असं अचानक नेमकं काय झालं होतं, ते मात्र ती काहीच सांगत नव्हती. का कुणास ठाऊक, पण आता तिला मी अगदी नको नकोसा झालो आहे, माझी सावलीही कदाचित तिला नको असेल, हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. पण तरीही माझं हे वेडं मन मात्र अजूनही तिच्याच प्रेमात आकंठ बुडालेले आहे. ज्या व्यक्तीने मला जगण्याची नवी उमेद दिली, तिनेच आज मला अशा वळणावर आणून सोडलं आहे, जिथे फक्त अंधार आहे. आता पुढे काय होईल, काय होणार, कसं व्हायचं माझं, या प्रश्नांची नेमकी आणि समाधानकारक अशी उत्तरं ही माझ्याकडे नाहीयेत. माझ्या अंतरात आत केवळ तिच्या आठवणींची जळती जखम आणि डोळ्यांत न सुकणारे अश्रू घेऊन मी रोज स्वतःशीच लढतो आहे. मला माझं हे आयुष्य आता फक्त एक ओझं वाटू लागलं आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
जीव हा... ❤️
बुधवार, १३ मे, २०२६
शेवटी एकतर्फीच.. ❤️🩹🫂
हवाहवासा अवकाळी... ❤️
आता आमच्यात कायमस्वरूपी अबोला असला तरीही तिच्या आठवणींचा गारवा माझ्या मनात आजही तसाच जिवंत आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत ती माहेरी येईल की नाही, हे मला ठाऊक नाही. पण तिच्या येण्याशी जोडलेलं या अवकाळी पावसाचं गणित माझ्या मनाला अजूनही वेड लावतं. आमची ओळख झाल्यापासूनचा हा एक अजब नियमच बनलाय. ती आली की किंवा ती येईल त्या दिवशी हमखास पाऊस येतोच. म्हणूनच आज जरी आमचा संवाद तुटलेला असला, तरी तिची वाट पाहण्यात एक वेगळीच नशा आहे, मजा आहे. ती आल्यावर नेहमीप्रमाणे लपून-छपून तिला पाहणं आणि त्या जुन्या, सुंदर दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून जाणं मला आजही हवंहवंसं वाटतं. तो उन्हाळा, तो अवकाळी पाऊस आणि तिच्या आठवणींचा तो सुगंधी सडा.! या सगळ्यात चिंब भिजून स्वतःला विसरून जाण्यात जी मजा आहे ना, ती मला जगातील इतर कोणत्याही संवादापेक्षा कितीतरी पटीने अधिक मोठी आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
बंधन..
आठवणींचा चक्रव्यूह...
मंगळवार, १२ मे, २०२६
माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त तू ❤️
अदृश्य धागा.. 👩❤️👨
अनुत्तरित प्रश्न..
सोमवार, ११ मे, २०२६
अबोला..
प्रेयसी ❤️
माझीही गोष्ट हीच आहे...
काल माझी एक पोस्ट वाचून इथल्या एका मित्राने कमेंट केली की, फार काही फरक नाही, आपल्या दोघांची गोष्ट जवळपास एकसारखीच आहे. आणि तेव्हा सहज मनात एक विचार येऊन गेला की, खरंच तर आहे, आपण सगळीजण सामान्य माणसं, आणि सामान्य माणसाचं आयुष्य थोड्याफार फरकाने अगदी एकसारखंच तर असतं. आपण वरवर कितीही वेगळे दिसत असलो, तरी आपल्या सर्वांच्या संघर्षाचा आणि आनंदाचा गाभा मात्र एकच असतो. त्याच मध्यमवर्गीय स्वप्नांची गोळाबेरीज, रोजची धावपळ आणि संध्याकाळी घराकडे वळताना मनावर असणारं उद्याच्या चिंतेचं थोडंसं ओझं. कधीतरी वाटतं की आपण एकटेच हे सगळं भोगतोय, पण जेव्हा कुणी म्हणतं ना, 'माझीही गोष्ट हीच आहे', तेव्हा जाणवतं की आपण एकाच अथांग प्रवासाचे सहप्रवासी आहोत. हे 'सारखेपण' आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतं आणि हीच सामान्यता आपल्या जगण्याला एक वेगळीच सुरक्षितता अन् ऊब देते. अखेरीस सामान्य माणसाच्या साध्या गोष्टीतच आयुष्याचं खरं तत्त्वज्ञान दडलेलं असतं. बरोबर ना.!?🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
रविवार, १० मे, २०२६
निष्ठा
विसावा..
दिवसाच्या त्या लख्ख प्रकाशात जगाला हवं तसं वागण्यासाठी आपण सगळेच आपल्या चेहऱ्यावर एक अदृश्य मुखवटा चढवून फिरत असतो. कोणासाठी तरी हसणं, कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करणं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या या शर्यतीत आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. पण जसजशी संध्याकाळ होते आणि हळूहळू अंधार दाटून येतो, तसं आपल्या मनावरचं ते ओझं अलगद हलकं व्हायला लागतं. रात्रीचा तो गर्द अंधार भीतीदायक नाहीतर, एका जुन्या मित्रासारखा वाटायला लागतो, जो आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारायला नेहमीच तयार असतो. त्या शांततेत आपल्याला कोणालाही काही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही की खोटं हसावं लागत नाही. त्या काळोखात आपण आपले डोळे मिटून स्वतःच्या मनाशी संवाद साधू शकतो. ती गर्द अंधारी रात्र म्हणजे केवळ विश्रांतीची वेळ नाही, तर ती स्वतःला पुन्हा मिळवण्याची एक संधी असते. तिथे आपण आपल्या जखमा, आपले अश्रू आणि आपले खरे विचार मुक्तपणे मांडू शकतो. शेवटी, हाच तो काळ असतो जेव्हा आपण जगासाठी 'कोणीतरी' असण्यापेक्षा स्वतःसाठी 'स्वतः' असतो. पुन्हा एकदा नव्या दिवसाचा एक नवा मुखवटा चढवण्यासाठी लागणारी ताकद ही गर्द अंधारी रात्रच आपल्याला तिच्या मायेच्या उबदार मिठीत देत असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
शेवट की सुरुवात..? 💔❤️🩹
१० मे. आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अशी जखम आहे जी कधीच भरून येणार नाही, असं मला वाटलं होतं. कारण आजच्याच दिवशी माझं तुला आपलं करण्याचं स्वप्न काचेसारखं विखुरलं होतं. तुझ्यापासून दूर होण्याच्या त्या क्षणी माझ्या जगाचा अंत झाला असं वाटलं होतं, पण त्याच अंधारात मला माझ्या प्रेमाच्या खऱ्या शक्तीची जाणीव झाली. तू माझी होऊ शकली नाहीस, हे वास्तव स्वीकारताना माझ्या मनाने एक वेगळीच उंची गाठली. माझं तुझ्यावरचं प्रेम हे तुला मिळवण्यासाठी नव्हतंच, तर ते केवळ तुझ्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी होतं. तू माझी झाली नाहीस म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल इतकं ते तकलादू नक्कीच नव्हतं. उलट, तुला न मिळवताही तुझ्यावर तितक्याच निष्ठेने प्रेम करत राहण्यात एक वेगळं समाधान मला गवसलं. प्रेम म्हणजे केवळ हक्क गाजवणं नसतं, तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणं असतं, हे मला त्या दिवशी उमजलं. म्हणूनच आज तू जिथे कुठे असशील, तिथे सुखात असावीत हीच माझी एकमेव प्रार्थना आहे, आणि यातच माझ्या प्रेमाचं सार्थक आहे. तुझे आनंदाचे क्षण हेच माझ्या जगण्याचे आधार बनले आहेत. तुझ्या सुखातच माझं सुख मानणं, हीच माझ्या प्रेमाची सर्वोच्च पायरी आहे आणि ती मी आयुष्यभर जपणार आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂
बेरंग... ❤️🩹🫂
आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...
-
आता सारं काही जवळपास संपल्यातच जमा होतं. तरीही का कुणास ठाऊक, पण त्यादिवशीच्या तुझ्या हसण्यामागचं कोडं काही केल्या मला सुटत नव्हतं. त्यादिवश...
-
टाळ, मृदंग आणि तबल्याची जुगलबंदी एकसारखी सुरूच होती. सोबतीला ढगांचा ढोलही ताल धरू लागला होता. या सर्वांच्या तालावर वीज आणि वारा सुसाट वेगान...