शुक्रवार, १९ जून, २०२६

काय करावं..? ❤️‍🩹🫂

बऱ्याच दिवसांपासून त्याच्या डोळ्यांत एक न बोललेली घुसमट मला दिसत होती. तो नेहमीप्रमाणे मंदिरात यायचा, नमस्कार करायचा, दोन-चार शब्द बोलायचा आणि निघून जायचा, पण त्याच्या शांत चेहऱ्यामागे काहीतरी तुटत चाललं आहे, याची जाणीव मला प्रत्येक भेटीत होत होती. आज मात्र तो थांबला. बराच वेळ काही न बोलता उभा राहिला. मग अचानक म्हणाला, "साहेब, तिच्या आठवणी तर मी तिला परत करू शकत नाही, पण तिच्या माझ्याकडे असलेल्या काही वस्तू आणि आमच्या लग्नाच्या अल्बमचं आता मी काय करू...?"

त्याचा प्रश्न ऐकून मी क्षणभर निःशब्द झालो. कारण त्याने विचारलेला प्रश्न वस्तूंचा नव्हता, तो त्याच्या मनात अडकून पडलेल्या आयुष्याचा होता. त्या अल्बमच्या पानांमध्ये फक्त छायाचित्रं नव्हती, तर त्याची स्वप्नं होती. त्या वस्तूंमध्ये फक्त आठवणी नव्हत्या, तर त्याने जपलेला एक संपूर्ण संसार होता. त्याची सोडचिठ्ठी होऊन जवळपास वर्ष उलटलं होतं. काळ पुढे सरकत होता, ऋतू बदलत होते, त्या मंदिराच्या घंटाही रोज त्याच स्वरात वाजत होत्या, पण त्याच्या मनात मात्र वेळ जणू एका ठिकाणी येऊन थांबली होती. तो अजूनही त्या जुन्याच वळणावर उभा होता, जिथून त्याच्या आयुष्याने अचानक वेगळी दिशा घेतली होती.

खरं तर त्याला या सगळ्या गुंत्यात पडायचंच नव्हतं. त्याने संसाराला खेळ समजलं नव्हतं, तर जबाबदारी समजली होती. म्हणूनच नातं टिकवण्यासाठी त्याने स्वतःच्या इच्छा, स्वतःचा स्वाभिमान, स्वतःच्या भावना कितीतरी वेळा बाजूला ठेवल्या. प्रत्येक वेळी तडजोड केली. प्रत्येक वेळी स्वतःलाच समजावत राहिला. कदाचित पुढे सगळं ठीक होईल, या आशेवर तो जगत राहिला. पण काही नाती अशी असतात की, त्यांना वाचवण्यासाठी एकट्याने केलेले प्रयत्न अपुरे पडतात. आज तो ज्या वेदनेत जगतो आहे, ती वेदना त्याला मिळालेल्या जखमेची नाही, ती त्याने दिलेल्या प्रेमाची आहे. कारण जिथे प्रेम जास्त असतं, तिथे विरहही खोलवर जाऊन बसतो. तो अजूनही जुन्या आठवणी कुरवाळतो. जुन्या संदेशांमध्ये हरवतो. एखादं गाणं ऐकलं की थांबून जातो. एखादी जागा पाहिली की भूतकाळ त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मी त्याला अनेकदा सांगितलं की, आयुष्य थांबत नाही. माणसांनी सोडलं तरी दिवस उगवणं थांबत नाही. पण काही सत्यं अशी असतात की ती समजून घ्यायला मनाला वेळ लागतो. आणि काही जखमा अशा असतात की त्यांच्यावर औषधापेक्षा स्वीकार जास्त काम करतो. त्याने विचारलेला प्रश्न आजही माझ्या मनात घुमतो आहे. त्या वस्तूंचं काय करावं, हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या आठवणींचं काय करावं..? ज्या स्वप्नांसाठी आयुष्य पणाला लावलं, त्यांच्या राखेचं काय करावं..? आणि खरं सांगायचं तर, त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. कारण काही आठवणी जाळता येत नाहीत, फेकता येत नाहीत, परत करता येत नाहीत. त्या फक्त मनाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे ठेवाव्या लागतात. काळाच्या स्वाधीन कराव्या लागतात. कदाचित एक दिवस तोही त्या अल्बमकडे बघेल आणि डोळे पाणावणार नाहीत. कदाचित त्या वस्तूंना हात लावताना त्याच्या छातीत कळ उठणार नाही. पण तो दिवस येईपर्यंत, तो एका अशा प्रवासावर आहे जिथे सोबत फक्त आठवणींची आहे आणि समोर दिसणारा रस्ता अजूनही धूसर आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बुधवार, १७ जून, २०२६

मी आकाशात हरवलेला पाऊस बोलतोय... ❤️‍🩹🫂

आज कित्येक दिवसांनी मी स्वतःशीच बोलायला थांबलो आहे. आकाशाच्या अथांग पोकळीत तरंगत असताना खाली नजर टाकली, आणि मनात एक अनामिक वेदना दाटून आली. धरती माझी वाट पाहते आहे, अगदी एखाद्या आईने परदेशी गेलेल्या आपल्या लेकराची वाट पाहावी तशी. दूरवरच्या शेतांमध्ये काळीभोर माती निपचित पडली आहे. तिच्या अंगावर भेगांची जाळी पसरली आहे. त्या भेगा फक्त जमिनीवर नाहीत, तर माझ्या मनावरही उमटल्या आहेत. प्रत्येक भेग मला विचारते आहे, "अरे.... कधी येणार रे तू..?" पण माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. गेल्या वर्षी याच दिवसांत मी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गेल्यावर्षी या दिवसात मी किती आनंदात होतो.! ढगांच्या खांद्यावर बसून गावोगावी फिरत होतो. माझ्या प्रत्येक सरीवर मोर थुईथुई नाचत होते. लेकरं अंगणात भिजत होती. शेतकरी आकाशाकडे पाहून हसत होता. आणि मी.? मीही तेव्हा मनसोक्त बरसत होतो. पण यंदा... यंदा काहीतरी हरवलं आहे. मी रोज ढगांची सभा भरवतो. त्यांना सांगतो, "चला, निघूया. आता वेळ आली आहे, आपली माणसं आपली वाट वाट पाहत आहेत." पण ढग शांत राहतात. वारे काहीतरी कुजबुजतात आणि पुन्हा दिशा बदलून निघून जातात. मी त्यांच्यामागे धावतो. त्यांना समजावतो, प्रसंगी रागावतोही. पण माझं ऐकणार कोण.? खाली एका गावात एक म्हातारा शेतकरी रोज सकाळी घराबाहेर येतो. आकाशाकडे पाहतो. डोळ्यांवर हाताची सावली धरतो. क्षणभर माझा शोध घेतो. मग निराश होऊन परत घरात जातो. त्याच्या त्या नजरेपासून मी स्वतःला लपवू शकत नाही. एका शिवारात नुकतंच पेरलेलं बीज मातीखाली पडून आहे. त्याला वाटत असेल, "आज येईल... उद्या येईल..." पण दिवसामागून दिवस सरत आहेत. एका लहान मुलाने शाळेच्या वहीचं पान फाडून होडी बनवून ठेवली आहे. मागच्या वर्षी जिथे पाणी वाहत होतं, तिथेच तो उभा राहून माझी वाट पाहतो आहे. मला त्याच्याजवळ जायचं आहे. त्या होडीला पाण्याचा रस्ता द्यायचा आहे. पण माझेच पाय जड झाले आहेत. रात्री कधी कधी मी काळ्या ढगांच्या आड लपून रडतो. माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत. कारण ते जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. मध्येच कुठेतरी हरवून जातात. लोक म्हणतात, पाऊस दगा देतोय. पण खरं सांगू? दगा मी कुणाला दिलेला नाही. दगा तर माझ्या स्वप्नांनाच मिळाला आहे. मीही तितकाच अस्वस्थ आहे, जितकी ही तहानलेली धरती आहे, ही माणसं आहेत. आणि म्हणूनच आज मी आकाशाच्या काठावर उभा राहून स्वतःलाच एक वचन दिलं आहे, जेव्हा येईन, तेव्हा फक्त थेंब घेऊन येणार नाही. सोबत मातीचा सुगंध आणीन. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू आणीन. लेकरांच्या होड्यांसाठी वाहणारं पाणी आणीन. आणि या प्रतीक्षेने थकलेल्या पृथ्वीच्या कुशीत असा विसावेन की तिला पुन्हा माझी उणीव भासणार नाही. तोपर्यंत... मी आकाशात हरवलेला, स्वतःच्या असहाय्यतेशी झुंजणारा, आणि प्रत्येक तहानलेल्या नजरेचं ओझं छातीत घेऊन भटकणारा पाऊस बोलतोय....

प्लीज... माझी मनस्थिती, माझी झालेली अडचण, पर्यायाने माझी बाजू ही समजून घ्या, आणि मला दोष देऊ नका.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

एक अंत.. एकांत ❤️‍🩹🫂

आयुष्यात एक वेळ अशी येते की, आपण अचानक थांबून मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की आपलं म्हणावं असं फारसं कुणीच नाही. मोजके एक-दोन मित्र, काही आठवणी आणि स्वतःशी चाललेला अखंड संवाद, एवढंच आपल्या सोबतीला उरलेलं असतं. तरुणपणी ही जाणीव फारशी टोचत नाही. कारण तेव्हा आपल्याभोवती माणसांची गर्दी असते. शिक्षण, नोकरी, गाठीभेटी, गप्पा, स्वप्नं आणि धावपळ यामध्ये एकटेपणाचा आवाज दबून जातो. पण जसजसं वय पुढे सरकतं, तसतसं माणसं आपापल्या दिशांना निघून जातात. प्रत्येक जण आपल्या संसारात, जबाबदाऱ्यांमध्ये आणि संघर्षांमध्ये गुंतून जातो. जे मित्र कधीकाळी दिवसातून अनेकदा भेटायचे, ते आता महिनोन्महिने संपर्कात नसतात. त्यांचं प्रेम कमी झालेलं नसतं, फक्त त्यांच्या आयुष्याला वेगळे केंद्रबिंदू लाभलेले असतात. आणि आपण मात्र त्यांच्या आठवणींच्या ठिकाणी उभे राहून जुन्या आवाजांचा प्रतिध्वनी ऐकत राहतो. अशा वेळी अचानक मनात एक विचार चमकून जातो की, पुढे म्हातारपणात काय.? जेव्हा शरीराची ताकद कमी होईल, नवीन नाती निर्माण करण्याची ऊर्जा उरणार नाही, आणि जुन्या नात्यांची वर्तुळं आणखी विरळ होतील, तेव्हा आपल्या सोबत कोण असेल.? ही कल्पना भयप्रद वाटते. कारण माणूस केवळ अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याने जगत नाही, त्याला साक्षीदार हवे असतात. आपल्या आनंदाचे, दुःखाचे, यशाचे, अपयशाचे आणि अस्तित्वाचे. कुणीतरी असावं, ज्याला आपण अचानक फोन करू शकू, कुणीतरी असावं ज्याला आपल्या शांततेचाही अर्थ कळेल. एकाकी म्हातारपणाची भीती ही खरंतर मृत्यूची भीती नसते, ती विस्मृतीची भीती असते. आपण जगलो, हसलो, रडलो, प्रेम केलं, नाकारले गेलो, एकटे पडलो, तरीही हार मानली नाही, झगडत राहिलो, इच्छा नसतानाही जगत राहिलो, या सगळ्याची आठवण आणि जाण ठेवणारं कुणीच उरणार नाही, या शक्यतेची ती भीती असते. परंतु कदाचित आयुष्याचं एक सत्यही यामध्ये दडलं आहे. शेवटी प्रत्येक माणूस स्वतःचाच सर्वात जवळचा सोबती असतो. बाहेरची माणसं कमी-जास्त होत राहतात, पण स्वतःची साथ टिकवणं शिकणं ही आयुष्यभराची साधना असते. असं असलं तरीही कधीकधी रात्री उशिरा मनाच्या एखाद्या कोपऱ्यात हा विचार अलगद येऊन बसतो, आपल्याला खरंच शेवटपर्यंत कुणी सोबत असेल का.? आपल्याला आपल्यासारखं जपणारं कुणी भेटेल का.? हा शोध जगत राहण्याला, जगण्याचा अर्थ शोधण्याला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत भाग पाडत राहणार.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

सोमवार, १५ जून, २०२६

एक कधीही न संपणारा प्रवास.... "मूव्ह ऑन" ❤️‍🩹🫂

"मूव्ह ऑन कर" हे दोन शब्द ऐकायला जितके सोपे वाटतात, तितके ते प्रत्यक्षात जगायला मात्र सोपे नसतात. लोक सहज म्हणतात, "आता विसरून जा", "पुढे बघ", "नवीन सुरुवात कर". पण आपल्या मनाला सांगितलेलं, आपलं मन प्रत्येक वेळी ऐकतंच असं नसतं. मी अनेकदा प्रयत्न केला आहे स्वतःला समजावण्याचा. स्वतःलाच सांगितलं आहे की जे गेलं ते गेलं, जे तुटलं ते तुटलं, जे मागे सुटलं, ते सुटलं. पण आठवणींचं काय..? त्या तर नकळत माझ्या मनाच्या कोपऱ्यात बसून राहतात. काही चेहरे, काही शब्द, काही क्षण आणि काही न बोललेली, तर काही बोललेली वाक्यं सतत सोबत चालत राहतात. तसं बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आत मात्र एक वेगळीच लढाई सुरू असते. प्रत्येक दिवस स्वतःला सावरण्याचा असतो आणि प्रत्येक रात्र पुन्हा जुन्या जखमांशी सामना करण्याची. लोकांना फक्त माझं हसणं दिसतं, पण त्या हास्यामागे दडलेली वेदना कुणालाच दिसत नाही. कधी कधी वाटतं की वेळ सर्व काही भरून काढते. पण काही जखमा अशा असतात की त्या भरत नाहीत, फक्त त्यांच्यासोबत जगायची सवय होते. वेदना कमी झाली असं वाटतं, पण एखादी आठवण पुन्हा सगळं ताजं करून जाते. ज्यांनी कधी मनापासून कोणाला जपलं आहे, ज्यांनी कोणासाठी स्वतःचा एक भाग गमावला आहे, त्यांनाच या फरफटीचा खरा अर्थ समजू शकतो. कारण इथे प्रश्न फक्त एखाद्या व्यक्तीला विसरण्याचा नसतो, तर त्या व्यक्तीसोबत जोडलेल्या स्वतःच्या एका भागाला मागे सोडण्याचा असतो. मी आजही चालतोय, जगतोय, हसतोय. पण याचा अर्थ असा नाही की मी पूर्णपणे पुढे निघून गेलो आहे. काही प्रवास असे असतात की त्यांचा शेवट नसतो. आपण फक्त चालत राहतो, आठवणींचं ओझं घेऊन. म्हणूनच आता कुणी "मूव्ह ऑन कर" असं म्हणालं की मला राग येत नाही. कारण त्यांना माझ्या मनातलं युद्ध दिसत नाही. ते फक्त निकाल पाहतात, संघर्ष नाही. आयुष्याच्या काही कथा अशा असतात की त्यांना पूर्णविराम नसतो. त्या फक्त स्वल्पविराम घेत पुढे सरकत राहतात. आणि कधी कधी तर, त्या "एका कथेतून" बाहेर पडण्यासाठी अख्खं आयुष्यही अपुरं पडतं.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

आपलेच दात आणि आपलेच ओठ... ❤️‍🩹🫂

कधी कधी आपण आपल्याच भावनांच्या चक्रव्यूहात असे काही अडकतो की, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतच नाही. समोरच्या व्यक्तीची चूक असते, यात तीळमात्र शंका नसते. पण त्या क्षणी आपल्या डोक्यात संतापाचा जो काही आगडोंब उसळलेला असतो, तो आपल्याला हतबल करून सोडतो. रागाच्या भरात आपल्या तोंडून शब्दांचे असे काही बाण सुटतात, जे नंतर आपल्यालाच जखमी करत राहतात. कालांतराने जेव्हा वाद संपतो, वातावरण शांत होतं आणि मुख्य म्हणजे आपला तो अनावर झालेला राग विरून जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने ख-या यातना सुरू होतात. मनात एक अनामिक हुरहूर दाटून येते आणि मन विचारू लागते की, खरंच इतकं बोलायची गरज होती का..? आता समोरची व्यक्ती कदाचित त्या सर्व गोष्टी विसरून, अगदी सहजपणे आपल्या आयुष्यात पुढे निघून गेलेली असते, तिच्या चेहऱ्यावर एक निवांतपणा असतो. पण आपण मात्र, आपणच रचलेल्या त्या शब्दांच्या ढिगाऱ्याखाली दबले जातो. आपली आंतरिक संवेदनशीलता आपल्याला शांत बसू देत नाही. आतल्या आत एक कासावीसपणा, एक बोचणारी टोचणी आपला जीव गुदमरवून टाकते. ज्याने चूक केली तो सुखाने झोपला आहे, आणि ज्याने केवळ संताप व्यक्त केला, तो पश्चात्तापाच्या आगीत होरपळतोय, हा विरोधाभास आपल्या मनाला फार वेदना देत असतो. शब्द हे धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात, हे त्रिकालाबाधित सत्य अशा वेळी काळजात फार फार खोलवर रुततं. आपण स्वतःलाच गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करतो, स्वतःवरच चिडतो, आणि मनातल्या मनात त्या व्यक्तीची माफी मागू लागतो. आपली ही अवस्था, हा कासावीसपणा दुसऱ्या कोणामुळे नाही, तर आपल्याच चांगुलपणामुळे आणि अति संवेदनशील मनामुळे निर्माण झालेला असतो, जो समोरच्याला कधीच दिसत नाही.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

रविवार, १४ जून, २०२६

काळ.. ❤️‍🩹🫂

असं म्हणतात की काळ बदलतो तशी माणसंही बदलतात, पण कालच्या त्या छोट्याशा प्रवासात मला त्याचं जे काही रूप पाहायला मिळालं, त्याने अक्षरशः माझ्या मनाचा थरकाप उडाला. कितीतरी वर्षांनी तो मला अचानक भेटला. त्याला पाहताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. कधीकाळी अत्यंत टापटीप राहणारा, स्वतःच्या अस्तित्वाबाबत कमालीचा सजग असणारा तो रुबाबदार माणूस आज अक्षरशः ओळखताही येत नव्हता. त्याचा तो निस्तेज चेहरा, विस्कटलेले पुर्ण पांढरे झालेले केस, ती भरमसाठ वाढलेली दाढी आणि अगदीच शून्य डोळे पाहून मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एखाद्या नात्यात अतिप्रामाणिक असणं आणि गरजेपेक्षा जास्त चांगलं वागणं माणसाचं किती भयानक नुकसान करू शकतं, याचं तो एक जिवंत उदाहरण बनून माझ्या समोर उभा होता. पण खरंच तो आता जिवंत आहे का..? हाच प्रश्न माझ्या मनात राहून राहून राहून येत होता. कारण त्याच्या शरीरात जीव तर होता, पण आत्म्याचा पार चक्काचूर झाला होता. बहुतेक केवळ एक चालता-बोलता निर्जीव देह माझ्या शेजारी बसला होता. त्याला त्या अवस्थेत पाहून माझं मन नकळतपणे त्याच्या भूतकाळात हरवून गेलं. त्याचं ते हसरं घर, त्याची ती स्वप्नं आणि त्याचं ते निरागस मन सगळं काही एका क्षणात माझ्या डोळ्यांसमोरून सरकून गेलं, आणि वाटलं की, खरंच... लग्न हा एखाद्या माणसाच्या आयुष्यातील किती महत्त्वाचा आणि नाजूक निर्णय असतो. आणि याच गोष्टीची जाणीव मला काल त्याला खूप बघून प्रकर्षाने झाली. लग्न हा एकच निर्णय माणसाला एकतर स्वर्गाचं सुख देतो किंवा नरकाच्या खाईत लोटतो. त्याच्या वाट्याला दुर्दैवाने लग्नाच्या नावाखाली झालेली फसवणूक आणि क्रूर विश्वासघात आला. ज्या नात्यावर त्याने स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्याच नात्याने त्याला असं काही ओरबाडलं की त्याच्याकडे आता स्वतःचं असं काहीच उरलं नव्हतं. लग्न चुकलं की केवळ एक नातं तुटत नाही, तर माणसाचा माणसांवरचा आणि स्वतःवरचा विश्वासच उडून जातो. जेव्हा हक्काच्या माणसाकडूनच फसवणूक होते, तेव्हा माणूस आतून पार उध्वस्त होऊन जातो. काल त्याला त्या अवस्थेत पाहताना माझ्या मनाला एक अनामिक वेदना होत होती आणि मी त्याच्या त्या भूतकाळात आणखी जास्त खोलवर खेचला जात होतो.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शुक्रवार, १२ जून, २०२६

जोडवी... ❤️‍🩹🫂

कित्येक वर्षांनंतर तिने स्वतःहून पुढाकार घेतला, तेव्हा कुठे आमच्या आजवर कधीही न जुळलेल्या नात्याला नवे धुमारे फुटले आणि आमची नव्याने ओळख झाली. त्या पुनर्भेटणीच्या आनंदात तिला काय भेट द्यावी.? या मोठ्या कोड्यात मी पडलो होतो. पण नेहमीप्रमाणे तिनेच मला त्यातून मार्ग दाखवला. 'पहिली आणि शेवटची भेट, आणि ही भेटवस्तू ही' असं म्हणून तिने तिच्या हक्काने, आवडीने माझ्याकडे तिच्या सर्वात जास्त आवडीच्या चांदीच्या जोडव्यांची मागणी केली. मी त्या तिला दिल्या, आणि त्या क्षणापासून त्या केवळ वस्तू न राहता आमच्या नात्याचे एक जिवंत प्रतीक बनल्या. ती त्यांची जीवापाड काळजी घ्यायची. पायात त्या घालून जेव्हा ती घराच्या फरशीवर चालायची, तेव्हा होणारा तो नाजूक 'छम-छम' आवाज ऐकण्यात ती तासनतास हरवून जायची. तो आवाज ऐकण्यासाठी ती उगाचच घरात इकडून तिकडे फिरत राहायची आणि कधीकधी तोच गोड आवाज रेकॉर्ड करून मला मोबाईलवर पाठवायची. त्या आवाजात एक अनामिक आनंद असायचा, जो माझ्याही मनाला स्पर्श करून जायचा. एके दिवशी अंगणात फिरताना तिच्या पायातील एक जोडवी अनावधानाने कुठेतरी हरवली. ती नंतर सापडली हा भाग वेगळा, पण ती सापडेपर्यंत मात्र तिच्या जीवाला अजिबात चैन पडली नव्हती. ती हरवल्याचे मला सांगताना तिचा कंठ दाटून आला होता, तिचा आवाज थरथरत होता. जणू तिच्या आयुष्यातले खूप मोठे काहीतरी हरवले होते. पुढे जेव्हा ती जोडवी पुन्हा सापडली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या आनंदात तिच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले होते. एका छोट्याशा निर्जीव वस्तूसाठी तिच्या मनात एवढी प्रचंड प्रेम आहे, हे पाहून मी भारावून गेलो होतो. आज काळ बदलला आहे आणि परिस्थितीही. आता मी तिच्या आयुष्यातून कायमचा दूर चाललो आहे, जवळपास झालोच आहे. पण आता मात्र मला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटते की, ज्या जोडवीसाठी ती एवढी रडली होती, त्याचं निमित्त ठरलेला मी, माझ्या जाण्याने तिला काहीच फरक पडत नाहीये. तिच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत कोणतीही विषण्णता, दुःख दिसत नाहीये. एका निर्जीव वस्तूच्या हरवण्याने व्याकूळ होणारी ती, आज एका जिवंत, तिच्या हक्काच्या माणसाच्या जाण्याने एवढी शांत, निर्विकार कशी काय राहू शकते.? हा प्रश्न माझ्या मनाला आतून पोखरत आहे. कधीकधी तर या अस्वस्थतेत माझ्या मनात असा वेडा विचार येतो की, मी ती "जोडवी" असतो तर कित्ती बरं झालं असतं ना.! कमीत कमी माझ्या हरवण्याचे दुःख तर तिच्या चेहऱ्यावर दिसले असते, माझ्यासाठी तिच्या डोळ्यांत अश्रू तरी आले असते.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

गुरुवार, ११ जून, २०२६

मी मेल्यावर... ❤️‍🩹🫂

घरातल्या त्या चिमुकल्याचे निष्पाप प्रश्न ऐकले की काळजात जणू सुरी खुपसल्यासारखं होतं आहे. "काका कुठे आहे? कधी येणार? माझ्याशी खेळून कित्ती दिवस झाले, तो का येत नाहीये, माझ्याशी का खेळत नाहीये.?" या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं, हे आम्हा कोणालाच समजत नाहीये. त्या चिमुकल्या जीवाचे ते डोळे अजूनही दाराकडे लागलेले असतात, आणि आम्ही मात्र नजरा चोरून अश्रू लपवत असतो. त्याला काय ठाऊक, की ज्या काकाच्या कडेवर खेळण्यासाठी तो हट्ट करतोय, तो काका आता या जगातच उरलेला नाही. हसरा चेहरा घेऊन आमच्यात वावरणारा आमचा तो दोस्त, आतून किती उद्ध्वस्त झाला होता, याची आम्हा सर्वांना जाणीव तर होती, पण तो असं टोकाचं पाऊल उचलेल, असं आमच्या स्वप्नातही आलं नव्हतं. सतत लोकांचे टोमणे, त्यांच्या नजरेतले प्रश्नार्थक भाव आणि काही वेळा दाखवली जाणारी ती खोटी सहानुभूती त्याच्या मनाला आतून पोखरत असावी. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करताना, समाजाशी आणि नशिबाशी लढताना त्याची सहनशक्ती संपली असावी. या जगाच्या निष्ठुरतेपेक्षा त्याला मृत्यूची शांतता अधिक जवळची वाटली. स्वतःची आणि आमच्यासारख्या आप्तस्वकीयांची या रोजच्या त्रासातून कायमची सुटका करण्यासाठीच त्याने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं असावं. आज तो निघून गेला, पण मागे सोडून गेलाय कधीही न भरणारी एक मोठी जखम. त्याच्या जाण्याने त्यांच्या घरातला आणि आमच्या मित्रपरिवारातला एक हसता-खेळता कोपरा कायमचा शांत झालाय. आत्महत्येचा विचार करताना त्याच्या मनात नक्की काय आलं असेल, हा विचार करूनच अंगावर काटा येतोय. त्याने या जगाचा निरोप घेतला खरा, पण मागे राहिलेल्या त्याच्या या चिमुकल्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं बळ मात्र तो सोबत घेऊन गेला. आयुष्य इतकं स्वस्त नसतं, पण जेव्हा जगण्याची ताकद संपते, तेव्हा माणसाला हाच एक मार्ग उरल्यासारखा वाटतो, हेच या #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 चं कटू सत्य आहे.!🎭

बुधवार, १० जून, २०२६

समझो ना... कुछ तो समझो ना... ❤️‍🩹🫂

मला खरोखरच एक गोष्ट समजत नाहीये की, माझे हे अत्यंत साधे आणि किरकोळ वाटणारे शब्द वाचून तुला इतका त्रास का बरं होतो आहे, की तू मला माझं लिखाण बंद करायला सांगते आहेस. जर या शब्दांमागे तुझा छळ करण्याचा किंवा तुला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नसेल, तर मग तुझ्या मनात एवढी अस्वस्थता का निर्माण होते.? तूच एकदा शांतपणे, डोळे मिटून स्वतःच्या मनाला विचारून पहा ना की, तू मला आजवर कधी अशी कठोर वागणूक दिली आहेस का.? तू कधी माझ्या भावनांचा अनादर करून माझ्याकडे अशा प्रकारे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहेस का.? तुला तर चांगलंच ठाऊक आहे की माझं तुझ्यावर कित्ती प्रेम आहे, या जगात तुझ्याइतकं दुसरं कोणीही माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, हे माहीत असूनही तू कधी माझी अशी उपेक्षा करत आली आहेस का.? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ अशी असतील, जर तू माझ्याशी कधीच वाईट वागली नसशील, तर मग माझ्या या किरकोळ लिखाणाचा तुला त्रास कसा बरं होऊ शकतो.? जेव्हा मनात कोणताच खोट नसतो, जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला मनापासून जपलेलं असतं, तेव्हा त्याचे शब्द टोचण्याऐवजी त्यातली काळजी दिसायला हवी. पण तरीही जर तुला या लिहिण्याने त्रास होत असेल, तर याचा अर्थ एकतर तू माझ्या भावनांना अजूनही नीट समजू शकलेली नाहीस, किंवा तुझ्या मनात कुठेतरी काहीतरी अस्वस्थ करणारं दडलं आहे, जे तुला सतत तू माझी अपराधी असल्याची जाणीव करून देत आहे. माझं लिखाण हा तर फक्त माझ्या मनातल्या भावनांचा एक छोटासा आरसा आहे, ज्यामध्ये मला केवळ तुझी आणि माझी सोबत पाहायची आहे. मी जेव्हा जेव्हा लिहितो, तेव्हा त्यात केवळ तुझाच विचार असतो, मग अशा वेळी त्यात तुला त्रास देईल असं काही असणं कसं शक्य आहे.? जर तू आजवर मला कधीच दूर लोटलं नाहीस, माझ्या प्रेमाचा कधीच अवमान केला नाहीस, तर या शब्दांकडे एक साधी भावना म्हणून तू का बरं पाहू शकत नाहीस.? तू अगदी माझ्या डोळ्यांसमोर असूनही तुझ्याविना जगण्याचं हे दुःख मी वर्षानुवर्षे सहन करतो आहे, याची थोडीतरी जाण आणि माझ्या एकतर्फी प्रेमाची कदर तू करायला हवी गं. खरं तर, या किरकोळ शब्दांमधील गूढ आणि त्यामागची माझी तळमळ ज्या दिवशी तुला समजेल, त्या दिवशी तुला या लिखाणाचा त्रास होणार नाही, उलट त्यातलं अथांग प्रेम जाणवेल. म्हणूनच म्हणतो, मनावरचा हा ताण बाजूला ठेव आणि माझ्या या शब्दांकडे रागाने किंवा त्रासाने न पाहता, त्यात दडलेल्या माझ्या निखळ प्रेमाच्या भावनेने पहा, मग तुला यात अजिबात त्रास जाणवणार नाही.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

मैफिलीत तू माझ्या... 💔

आयुष्याच्या वाटेवर आधीच दुःखाचे अनेक डोंगर समोर उभे असताना, जेव्हा एखादी व्यक्ती अचानक आपल्या जीवनात येते, तेव्हा मनाला कुठेतरी आशेचा एक किरण दिसू लागतो. असं वाटतं की, आतापर्यंत भोगलेल्या वेदनांवर मायेची फुंकर घालणारं कोणीतरी आपल्याला मिळालं आहे. पण तो आनंद, तो आधार फार काळ टिकत नाही, तेव्हा होणारा पश्चाताप मनाला आतून पोखरून टाकतो. आज माझ्या मनाच्या कोपऱ्यातून एकच आर्त हाक येत आहे की, जर नंतर असं अंतर ठेवून लांबच जायचं होतं, तर मग आधी एवढं जवळ येण्याची, आपलेपणा दाखवण्याची काय गरज होती..? त्यापेक्षा तू माझ्या आयुष्यात आलीच नसतीस, तर कदाचित हे नवीन दुःख तरी वाट्याला आलं नसतं. आधीच्या दुःखांशी लढण्याची ताकद तरी शिल्लक राहिली असती. वास्तविक जीवनातील नातेसंबंध तुटणे किंवा संसार मोडणे याचं एक वेगळं दुःख असतंच, पण त्या वास्तवाचा स्वीकार माणूस कधी ना कधी करतोच. मात्र मनाच्या गाभाऱ्यात एखाद्या व्यक्तीसोबत उभारलेला काल्पनिक संसार जेव्हा कोसळतो, तेव्हा त्या ढिगाऱ्याखाली भावनांचा पूर्णपणे चक्काचूर होतो. कारण हा संसार केवळ विचारांचा नसतो, तर तो अथांग अपेक्षांचा, अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा आणि एका निखळ विश्वासाचा असतो. वास्तव जगातल्या विरहापेक्षा या काल्पनिक मानसिक विरहाची जखम खूप खोल असते, कारण ती सतत आतल्या आत ठसठसत राहते. सर्वात जास्त जिव्हारी लागणारी गोष्ट ही आहे की, ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानून बसलो, तिला कदाचित आपल्या या मानसिक स्थितीची पुसटशी कल्पनाही नसावी. किंवा कदाचित तिला या सर्व गोष्टींशी काही देणेघेणेच नसावे, हा विचार मनाला अधिक छळतो. आपली तळमळ, आपलं प्रेम आणि आपल्या भावनांची झालेली ही कोंडी एका बाजूला आणि समोरच्या व्यक्तीची उदासीनता दुसऱ्या बाजूला, हे चित्र मनाला कमालीचं अस्वस्थ करून सोडतं. हा केवळ एका नात्याचा अंत नाही, तर स्वतःच्याच विश्वासावर झालेल्या मोठ्या आघातासारखा आहे, ज्यातून सावरणं आज तरी अशक्य वाटत आहे.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

मंगळवार, ९ जून, २०२६

"असणं" आणि "दिसणं" ❤️‍🩹🫂

अचानक आलेल्या त्या एका बातमीने आज माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रोज ज्याच्यासोबत उठणे-बसणे होते, ज्याच्या सोबत प्रत्येक सुख-दुःख शेअर केले, तो माझा मित्र आज या जगात नाही आणि त्याने स्वतःचे आयुष्य संपवले, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मन सुन्नं झाले आहे आणि डोक्यात विचारांचे काहूर माजले आहे. सतत एकच प्रश्न मनाला टोचतो आहे की, त्याच्या मनात अशी कोणती खदखद चालू होती जी तो आमच्यासारख्या जवळच्या मित्रांशीही व्यक्त करू शकला नाही. त्याचे कुटुंबीय आणि आम्ही त्याचा इतका मोठा मित्रपरिवार असूनही त्याची ती मानसिक अवस्था ओळखायला इतके कसे काय कमी पडलो.? हा प्रश्न आता आम्हाला आयुष्यभर छळत राहणार आहे. तो अंतरंगातून पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे हे आम्हाला माहीत असलं तरी त्यानं त्या सर्व गोष्टींतून स्वतःला सावरलं होतं हे आम्हाला तो सतत सांगत असायचा, आणि तसं दाखवायचा ही. पण आता वाटते आहे की, ते सगळं काही तो फक्त आम्हा सर्वांच्या मनाच्या समाधानासाठी वागायचा, बोलयचा. त्याच्या मनात मात्र वेगळीच चक्र ना जाणे कधीपासून फिरतच होती, आणि मग कुठे तो या भीषण निर्णयाप्रत पोहोचला असावा. पण आता आयुष्यभर सगळ्यात जास्त वेदना या गोष्टीची होत राहणार आहे की, आत्महत्या करायच्या अगदी आदल्या रात्री तो खूप उशिरापर्यंत आमच्यासोबतच होता. नेहमीपेक्षा जास्त वेळ तो आमच्यात रमला होता. खूप हसत होता, खूप गप्पा मारत होता आणि जुन्या आठवणींना उजाळा देत होता, अधेमध्ये सतत कुठेतरी हरवत होता, आणि आम्ही हाक मारल्यावर अचानक भानावर येत होता. पण आम्हांला काय माहीत की आमचं हे असं हाका मारून त्याला भानावर आणणं हे बहुतेक शेवटचचं असेल. ते त्याचे आमच्यासोबतचे शेवटचे हसणे असेल. कसं काय आणि का कुणास ठाऊक पण त्याच्या त्या हसण्यामागे लपलेलं त्याचं ते रडू आणि वेदना आम्हांला का दिसल्या नाहीत.? त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे 'आत्महत्या' नावाचा इतका भीषण आणि काळा विचार लपला असेल, याची पुसटशी भणकही आम्हांला कशी बरं लागली नाही.? आम्ही किती अंध होतो की त्याच्या डोळ्यांतील ते शांत वादळ आम्हांला ओळखता आले नाही, अन् रोखता ही आलं नाही. आज असे वाटते आहे की कदाचित तो त्या रात्री, त्या गप्पांमधून आम्हांला शेवटचा निरोप द्यायला, आमच्या सोबतच्या शेवटच्या आठवणी सोबत घेऊन जायलाच आला होता. पण आम्ही मात्र ते समजून घेण्यास पूर्णपणे अपयशी ठरलो. आता कित्तीतरी तास उलटले आहेत. बातमी कळली तशी आजूबाजूचे जमलेले शेजारीपाजारी तर अजूनही या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीयेत, खरंतर त्यांना विश्वासाच बसत नाहीये की याने असं पाऊल उचललंच कसं.? हा असं करेल असं कधी वाटलचं नाही. नेहमी कित्ती आनंदी आणि हसता खेळता दिसायचा. पण बहुतेक इथेच त्यानं आम्हां सर्वांना फसवलं होतं. "आनंदी असणं आणि आनंदी दिसणं" यात खरंच कित्ती मोठ्ठं अंतर असतं ना.! त्याच्या वयोवृद्ध आईबाबांचा तो आक्रोश तर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही अक्षरशः इतका ह्रदयद्रावक असा आहे. आणि आम्ही मित्रपरिवार.? या विचारात अडकलो आहोत की, याला आणखी एकदा हाका मारून, पुन्हा एकदा काही क्षणांसाठी भानावर आणता येईल का.? आणि त्यानं हे असं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर आम्हाला मिळेल का.? मित्र म्हणून आमच्या वाट्याला आलेलं हे अपयश आणि हा पश्चात्ताप मात्र आता आमच्या मनाला आजन्म छळत राहणार आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

रविवार, ७ जून, २०२६

जूनचे दोन पाऊस... ❤️‍🩹🫂

जून महिना उजाडला की ब-यापैकी सर्वांच्या मनात एक अनामिक आनंद आणि उत्साह दाटून येतो. मातीचा तो पहिला सुवास, तो गारवा, रखरखत्या उन्हाळ्यानंतर मिळणारा तो दिलासा. प्रत्येका साठीच जूनचा पाऊस काहीतरी सुखनैव घेऊन येतो. माझ्याही आयुष्यात जूनचे दोन पाऊस आले. पण माझं नशीब असं की, यातल्या एकाही पावसात मला आनंदाने, मनसोक्त भिजता आलं नाही, रमता आलं नाही. नियतीने माझ्या आयुष्याचा असा काही खेळ मांडला की, त्या पावसाच्या सरी फक्त माझ्या डोळ्यांतील अश्रू बनून राहिल्या आहेत. यातला जो पहिला पाऊस आला, तो माझ्या आवडीचा, अगदी मला हवाहवासा असा होता. तेव्हा माझ्या वेड्या मनात कुठेतरी एक आशेचा किरण होता की, कदाचित हा माझा आवडता पाऊसच बहुतेक माझ्या जखमांवर फुंकर घालेल. माझं वेड कदाचित हा पाऊसच सांभाळेल, माझ्या मनाला पुन्हा उभारी द्यायला मला मदत करेल. मी आस लावून त्या आभाळाकडे पाहत राहिलो. पण हा पहिला पाऊस मात्र कमालीचा निष्ठुर निघाला. अक्षरशः दगड होता तो. तो आला, सोबतीला आभाळात काळेकुट्ट ढगही घेऊन आला, पण एक थेंबही न पाडता, तो तसाच कोरडाठाक निघून गेला. तो फक्त एक भास ठरला. मनातली तृष्णा भागवायची तर दूरच, पण तो मला आणि माझ्या आयुष्याला आणखीन अधिकच कोरडं करून गेला. त्यानंतर कालांतराने आणि नाईलाजाने मला पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागली. तो माझ्या वाट्याला आला की मी स्वतः त्याला माझ्या वाट्याला आणला, हे मात्र मला आजही न उलगडलेले कोडे आहे.हा दुसरा पाऊस नुसता पाऊस नव्हता. ते एक असं वादळ होतं ज्याने माझं सगळं काही हिरावून घेतलं. त्या पावसाच्या रौद्ररूपाने माझं उर्वरित हसतं-खेळतं आयुष्यही उद्ध्वस्त करून टाकलं. मी माझ्या मनात सजवलेलं घरदारं, संसार, त्याजोडीने पाहिलेली माझी सारी स्वप्नं आणि माझी आपली माणसं, हे सगळं काही त्या वादळी पावसाच्या पाशवी प्रवाहाने वाहून नेलं. मी फक्त पाहत राहिलो, हताश होऊन, हतबल होऊन. तो पाऊस अंगावर झेलताना आनंद नव्हता, तर सुन्न करणारी एक वेदना होती. मी माझं सर्वस्व गमावल्याची ती जाणीव मला आजही आतून पोखरून काढते आहे. त्या पावसाने मला भिजवलं नाही, तर माझ्या अस्तित्वाच्या अक्षरशः चिंध्या चिंध्या केल्या. असे हे जूनचे दोन पाऊस माझ्या वाट्याला आले. एकाने माझं सर्वस्व ओरबाडून नेऊन मला उध्वस्त केलं, तर दुसऱ्याने मला आशेच्या उंबरठ्यावर आणून तसंच तहानलेलं सोडलं. आता आज मी इथे उभा आहे, पूर्णपणे रिता होऊन. मनात ना कोणती आशा आहे, ना स्वप्नं, ना पुन्हा कोणत्या नव्या पावसाची, पावसाळ्याची आस.! तशी या पावसाची आस सगळ्यांनाच असते, पण माझ्यासाठी मात्र पाऊस म्हणजे एक न संपणारं दुःख आणि एकाकीपण बनून बाकी राहिला आहे. आणि म्हणूनच प्रत्येकवर्षी या जून महिन्यात, ही न संपणारी घुसमट, तगमग, तळमळ, तडफड ना माझ्या मनात लपून राहते, ना माझ्या या किरकोळ शब्दांत सामावते..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

शनिवार, ६ जून, २०२६

वेड्या मना.. ❤️‍🩹🫂

मी माणूस आहे. मी या पृथ्वीतलावरचा सर्वात विकसित आणि बुध्दीमान प्राणी आहे. पण तरीही कधी कधी मला माझ्या विचार करण्याच्या पध्दतीचं फार नवल वाटतं. खरंच, माणसाचं मन किती विचित्र असतं ना.! एक माणूस म्हणून मला नेहमीच असं वाटत असतं की या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त माझ्याच मनासारखा असावा. माझ्या सुखाच्या कल्पनांनुसारच निसर्गाने आणि आयुष्याने कुस बदलावी, अशी एक सुप्त इच्छा माझ्या मनात नेहमीच डोकावत असते. पण वास्तवाचं भान आलं की समजतं, निसर्गाचा आणि जीवनाचा नियम माझ्या इच्छेभोवती फिरत नाही. आज मी कडक उन्हाळ्याने होरपळून निघत असताना, चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. मनात सारखा एकच विचार चालला आहे की, कधी एकदा तो आभाळातून मुसळधार बरसतो आणि या धरणीला शांत करतो. पण मला माझीच खात्री आहे की, एकदा का तो धो-धो बरसू लागला, चिखल झाला, आणि रोजच्या जगण्यात व्यत्यय यायला लागला की काहीच दिवसांत माझ्याच तोंडून निघणार, "बस्स रे बाबा..! खूप झाला आता हा पाऊस, कधी थांबणार कोण जाणे..!?" माझा हा लहरी स्वभाव फक्त पावसापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक ऋतूच्या बाबतीत मी आजवर फक्त असाच वागत आलो आहे. थंडी आली की मला उन्हाची ऊब हवी असते आणि उन्हाळा आला की पुन्हा थंडीचे दिवस बरे होते असं वाटू लागतात. निसर्गाच्या या सुंदर चक्राचा आनंद घेण्याऐवजी, जे समोर आहे त्याला नाकारण्यात आणि जे नाही त्याची आस धरण्यातच माझा वेळ जातोय. हाच न्याय मी माझ्या वैयक्तिक आयुष्यालाही लावतो. दुःखाच्या काळात सुखाची तीव्र ओढ असणारा मी, सुख मिळालं की लगेच त्यातल्याही त्रुटी शोधू लागतो. एखादी गोष्ट मिळेपर्यंत जी घालमेल मनात असते, ती मिळाल्यानंतर काही दिवसांतच संपून जाते आणि मन पुन्हा नव्या अपूर्णतेच्या मागे धावू लागतं. कधीकधी मला स्वतःचीच गंमत वाटते आणि रागही येतो की, मला नक्की हवं तरी काय..? कोणत्याही परिस्थितीत समाधानी न राहणं आणि सतत 'अति'चा कंटाळा करणं हा माझा जणू स्वभावच बनला आहे. पण आता मला जाणीव होत आहे की, निसर्गाचा समतोल जसा प्रत्येक ऋतूच्या येण्या-जाण्यावर टिकून आहे, तसाच माझ्या #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 चा समतोलही सुख-दुःखाच्या आणि चढ-उतारांच्या चक्रावरच तर अवलंबून आहे.!🎭

गुरुवार, ४ जून, २०२६

मुक्ती.. ❤️‍🩹🫂

आज अगदी सहजच मोबाईलची 'कॉन्टॅक्ट लिस्ट' स्क्रोल करताना अचानक एका नावावर माझे बोट रेंगाळले. काही क्षण विचार केला आणि एक दीर्घ श्वास घेऊन मी ते नाव, तो नंबर मोबाईलमधून 'डिलीट' करून टाकला. स्क्रीनवर 'कॉन्टॅक्ट डिलीटेड' असा मेसेज आला आणि स्क्रीन एकदम कोरी झाली. पण खरंच..? त्या एका क्लिकने माझ्या मनातील त्या व्यक्तीच्या आठवणीही डिलीट झाल्या का..? या प्रश्नाने मला अंतर्मुख केले आणि मला जाणीव झाली की, मॅच्युरिटी किंवा परिपक्वता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे कटू सत्ये स्वीकारणे होय. आपण मोबाईल स्क्रीनवरून एखादा नंबर सहज पुसून टाकू शकतो, पण हृदयाच्या पाटीवर कोरलेली माणसं आणि त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण इतक्या सहज आपण कसे विसरणार..? आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला असं वाटतं की, एखाद्या व्यक्तीशी संबंध तोडायचे असतील, त्यांच्यावर राग व्यक्त करायचा असेल, तर त्यांचा नंबर ब्लॉक किंवा डिलीट करणे हाच सर्वात सोपा मार्ग आहे. आपण स्वतःशीच एक खोटा आव आणतो की, आता तो नंबर माझ्या फोनमध्ये नाही, म्हणजेच ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून वजा झाली आहे. पण हा निव्वळ एक भास असतो. रात्रीच्या शांततेत जेव्हा जुन्या आठवणींची वादळं मनात उठतात, तेव्हा तो नंबर मनात जसाच्या तसा जिवंत असतो. त्याचे डिजिट्स आपल्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे फिरू लागतात. मग लक्षात येते की, मोबाईलची मेमरी रिकामी करणे सोपे आहे, पण मनाची मेमरी कशी फॉरमॅट करणार..? खरं सांगायचे तर, माणसांना विसरणे एवढं सोप्पं नसतं. ज्यांच्यासोबत आपण आपल्या सुख-दुःखाचे क्षण वाटले, ज्यांच्या हसण्यात आपले जग होते, ती माणसं फक्त एक तांत्रिक प्रक्रिया करून मनातून कशी कायमची डिलीट होऊ शकतात..? नंबर डिलीट करणे हा केवळ एक तात्पुरता राग किंवा पलायनवाद असू शकतो, पण ते काही कायमस्वरूपी उत्तर नाही. उलट, नंबर डिलीट केल्यानंतरही जेव्हा त्या व्यक्तीची आठवण आल्यावर मन व्याकुळ होते, तेव्हा आपल्या स्वतःच्या हतबलतेची जाणीव अधिक तीव्रतेने होते. खरंतर खरी परिपक्वता तेव्हाच येते, जेव्हा आपल्याला हे समजते की माणसांना विसरण्यासाठी नंबर डिलीट करण्याची गरज नसते. खरी मॅच्युरिटी यात आहे की, तो नंबर समोर असूनही, त्या व्यक्तीचे नाव स्क्रीनवर चमकत असूनही, आपल्या मनात कोणतीही अस्वस्थता निर्माण होऊ नये. त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने आपल्या मनाचा ताबा सुटू नये. भूतकाळात जे काही घडले, ते आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकारून शांतपणे पुढे जाता येणे, यातच खरे शहाणपण आहे. #आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂 हे शेवटी अशाच अनेक चांगल्या-वाईट अनुभवांची गोळाबेरीज आहे. इथे प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही माणसं कायमची सोबत राहतात, तर काही जण फक्त काही अंतरापुरतेच सहप्रवासी असतात. जे सोडून गेले, त्यांच्या आठवणींना मनात ठेवून, पण त्यांच्या नंबरचा, त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा अट्टाहास न धरता जगणे शिकले पाहिजे. म्हणूनच, आता मी नंबर डिलीट करण्याच्या फंदात पडत नाही. कारण मला कळून चुकले आहे की, नाती आणि माणसं मोबाईलच्या गॅलरीत किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसतात, ती मनात असतात. आणि मनातून त्यांना मुक्त करणे, हेच खऱ्या परिपक्वतेचे लक्षण आहे.!🎭

बुधवार, ३ जून, २०२६

काही प्रश्नांना उत्तरं नसतात..! 🫂❤️‍🩹

आयुष्याचा खेळ खरंच किती विचित्र असतो ना. कधी कधी आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो, अशा वेळी अचानक एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. ती अशी असते, जी आपल्याला नेहमीच आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी हवी होती, अगदी आपल्या मनासारखी. सुरुवातीला वाटतं की हे सगळं एक सुंदर स्वप्न आहे. हळूहळू, नकळतच आपल्याला तिची इतकी सवय होऊन जाते की तिच्याशिवाय दिवसाची सुरुवात आणि शेवटही अपूर्ण वाटू लागतो. तिचा/त्याचा तो आवाज, असणं, दिलेली ती खोटी-खरी आश्वासने, सगळंच आपल्या जगण्याचा एक भाग बनून जातं. आपण तिच्यावर/त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या संपूर्ण आयुष्याची दोरी तिच्या/त्याच्या हातात सोपवून देतो. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. जेव्हा आयुष्यात सर्वात मोठ्ठं वादळ येतं, जेव्हा आपल्याला तिची/त्याची, त्यांच्या साथीची आणि आधाराची सगळ्यात जास्त गरज असते, नेमक्या त्याच वळणावर ती व्यक्ती आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून निघून जाते. ती/तो तर पाठ फिरवून निघून जातात, पण आपल्या वाट्याला मागे उरते फक्त एक अथांग रिकामेपण, एकटेपण, जे शब्दांत सांगताच येत नाही. आता आपण गर्दीत असूनही आतून पूर्णपणे एकटे पडलेले असतो. कोणाशी काही बोलायची इच्छा होत नाही, ना कुठे जायची, ना कोणाकडे मन मोकळं करायची. फक्त एकांतात मन रमू लागतं सगळं काही संपल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आतून काहीतरी कायमचं तुटून गेलंय, ज्याचे तुकडे आता कधीच एकत्र जोडले जाऊ शकत नाहीत. ज्या व्यक्तीने जगायला शिकवलं, तिच्या/त्यांच्या सोबत आपण कित्ती काही सुंदर स्वप्नं रंगविली, तीच व्यक्ती असं जिवंतपणी मारून, आपल्याला सोडून निघून जाईल असं आपल्याला कधी स्वप्नातही वाटलेलं नसतं. हा विरह, हा नकार आणि हे असं अचानक सोडून जाणं माणसाला आतून पार पोखरून जिवंतपणी मारून टाकतं. आपण फक्त जिवंत असतो, पण आपल्या जगण्यातला तो जिवंतपणा कुठेतरी हरवून गेलेला असतो. डोळ्यांसमोर फक्त तिच्या/त्याच्या आठवणींचा पसारा असतो आणि मनात एकच प्रश्न की, जर असं अर्धवट सोडूनच जायचं होतं, तर मग इतकं जवळ तरी का केलं होतं..!?🎭
#आयुष्य_वगैरे 🫂❤️‍🩹

मंगळवार, २ जून, २०२६

एकतर्फी.. 💔

प्रेम ही संकल्पना जितकी सुंदर आहे, तितकीच ती कधीकधी जीवघेणी आणि त्रासदायक ठरू शकते, याचा अनुभव मला गेल्या कित्येक वर्षांपासून येतो आहे. माझं तिच्यावर कालही प्रेम होतं, आजही आहे आणि माझ्या श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत ते तसंच राहील. कारण ते कोणत्याही अटींशिवाय आणि निस्वार्थीपणे उमललेलं माझं एक खरं भावनाविश्व होतं. पण या संपूर्ण प्रवासात एक कटू सत्य मला नेहमीच डाचत राहिलं की, माझ्या या वेड्या, अथांग प्रेमाची तिला कधी साधी जाणीवही झाली नाही, आणि त्याचं तीळमात्र कौतुकही कधी वाटलंच नाही. आता आज मी वयाच्या चाळीशीच्या उंबरठ्यावर उभा असताना, मागे वळून पाहताना जाणवतं की, या प्रदीर्घ प्रवासात मी तिला विसरण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, आणि बहुतेक माझं सारं काही इथेच तर चुकलं. तिची आठवण हाच मी माझ्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनवला. एकतर्फी प्रेमात जे व्हायला हवं किंवा जे होतं, बहुतेक तेच माझ्यासोबत ही झालं. या माझ्या एकतर्फी अथांग वेड्या प्रेमाने मला सुखापेक्षा वेदनाच जास्त दिल्या. जेव्हा भावनांची कदर होत नाही, तेव्हा मनाची होणारी तगमग शब्दातीत असते. अनेकदा या मानसिक त्रासाला कंटाळून, नैराश्याच्या गर्तेत वाहून जाताना असं वाटायचं की, सगळं काही सोडून कुठेतरी दूर निघून जावं आणि हे निरर्थक वाटणारं जीवनच संपवून टाकावं. परंतु, आज चाळीशीत आल्यावर जेव्हा मी त्या भूतकाळाकडे आणि स्वतःकडे त्रयस्थपणे पाहतो, तेव्हा मनात एक समाधान वाटतं की, मी तसा कोणताही टोकाचा आणि चुकीचा निर्णय घेतला नाही, हे बाकी बरं झालं. कारण आत्महत्येचा किंवा स्वतःला संपवण्याचा तो विचार किती चुकीचा होता, हे आज मला पूर्णपणे उमगलं आहे. आज मला कळून चुकलंय की, सगळं सगळं काही माहीत असूनही माझ्या ज्या प्रेमाने माझ्या भावनांचा, माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या निखळ मनाचा कधी आदरच केला नाही, त्या प्रेमासाठी मी स्वतःचा अमूल्य जीव देणं हा निव्वळ मूर्खपणा ठरला असता. माझ्या त्या पवित्र आणि निस्वार्थी भावनेची, तसेच माझ्या प्राणाची किंमत समजण्याची पात्रता बहुधा तिच्याकडे कधी नव्हतीच, ही जाणीव आता मला अधिक प्रगल्भ आणि खंबीर बनवून गेली आहे..!🎭

#आयुष्य_वगैरे 🫂❤️‍🩹

सोमवार, १ जून, २०२६

एकमेव मार्ग... ❤️‍🩹🫂

आयुष्यात सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो, जेव्हा आपली काहीही चूक नसताना समोरची व्यक्ती आपल्याबद्दल एक पूर्वग्रहदूषित मत बनवून बसते. आपण मनात कोणताही खोट न ठेवता, फक्त ते नातं टिकावं म्हणून समोरच्याला सतत स्पष्टीकरण देत राहतो. "माझा तो हेतू नव्हता", "माझं बोलणं नीट समजून घे", अशी विनवणी आपण पुन्हा पुन्हा करत राहतो. पण दुर्दैवं असं की, आपण जितके जास्त खुलासे करतो, तितका समोरच्याचा तो चुकीचा समज अधिक घट्ट होत जातो. त्यांना वाटू लागतं की, आपण सारखं स्पष्टीकरण देतोय म्हणजेच नक्कीच आपलीच काहीतरी चूक असणारच. हा विरोधाभास मनाला आतून पोखरून टाकतो. आणि आपला चांगुलपणाच शेवटी आपल्या अगतिकतेचं कारण बनतो. खोट्या आरोपांचे ढग जेव्हा आपल्या निष्पापपणाला झाकून टाकतात, तेव्हा होणारी घुसमट असह्य असते. प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना आपण स्वतःचाच स्वाभिमान गमावून बसतो की काय अशी भीती वाटू लागते. शेवटी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, ज्याला समजून घ्यायचंच नाही, त्याला जगातील कुठलेही शब्द पटवून देऊ शकत नाहीत. शांत राहणं म्हणजे चूक मान्य करणं नव्हे, तर कधीकधी स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि स्वाभिमानासाठी घेतलेली ती एक सन्मानजनक माघार असते. तुमच्या नितळ मनाची किंमत न समजणाऱ्या लोकांसमोर शब्दांचा अपव्यय थांबवणे, हाच या मानसिक त्रासातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

बेरंग... ❤️‍🩹🫂

आणि शेवटी आज मी तिला तो मेसेज पाठवलाच. हो... इंग्रजीत.! मला मुळात इंग्रजीत बोलायला किंवा त्या भाषेत व्यक्त व्हायला अजिबात आवडत नाही. पण इतकी...